नागपूर मधील डिजीधनच्या निमित्ताने
शुक्रवारी जिल्हा-तालुका-ग्रामस्तरीय कार्यक्रम
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या भाषणाचे थेट प्रक्षेपण
नांदेड दि. 10 :- प्रधान मंत्री नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत नागपूर येथे शुक्रवार
14 एप्रिल 2014 रोजी देशातील शंभरावा डिजीधन मेळावा होणार आहे. यानिमित्त
जिल्ह्यातील तालुका तसेच ग्रामस्तरापर्यंत रोकडरहित (कॅशलेस) व्यवहारांच्या
जनजागृतीबाबत कार्यक्रम, विविध उपक्रमांचे नियोजन करण्यात येत आहेत. त्यासाठी
प्रभारी जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात
आज बँक अधिकाऱ्यांची आढावा बैठक संपन्न झाली.
बैठकीस निवासी
उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक विजय उशीर
यांच्यासह विविध बँकाचे अधिकारी, प्रतिनीधींची उपस्थिती होती.
बैठकीत प्र. जिल्हाधिकारी
श्री. पाटील यांनी गावपातळी, तालुकास्तर, उपविभागीय आणि जिल्हास्तरावरील डिजीधन
उपक्रमांच्या आयोजनाबाबत निर्देश दिले. प्रत्येक गावातील नागरी सुविधा केंद्र,
ग्रामपंचायतींमध्ये, तसेच सेतू केंद्र, तालुकास्तरावर आणि उपविभागस्तरावर कार्यक्रमांचे
आयोजन करण्यात येणार आहे. तालुकास्तरावरील कार्यक्रमांत बँक अधिकारी कॅशलेस
व्यवहारांबाबत सादरीकरण, माहिती देतील. काही व्यापारी, व्यावसायिकांना प्वाईंट ऑफ
सेल्स (पीओएस) मशिन्सचे वितरणही या दिवशी करण्यात येणार आहे. जिल्हास्तरावरही
कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. यामध्ये विविध व्यापारी, व्यावसायीक,
उद्योजक यांच्या संघटना, त्यांचे पदाधिकारी यांनाही निमंत्रित करण्यात येणार आहे.
यानिमित्ताने आयोजित विविध स्पर्धांचे, कॅशलेस व्यवहारांबाबत उल्लेखनीय काम करणारे
घटक, आधार सिडींग, मोबाईल सिंडीग आणि मोबाईल बँकींगबाबत जास्तीत जास्त
प्रचार-प्रसार करणाऱ्या घटकांनाही सन्मानित करण्यात येणार आहे. यानिमित्ताने काही
स्पर्धांचेही आयोजन करण्यात आले आहे.
शुक्रवार 14 एप्रिल रोजी
सकाळी दहा ते बारा या वेळेत या डिजीधन उपक्रमांचे सर्वत्र आयोजन करण्यात येईल.
त्यानंतर दुपारी 12 वाजता नागपुरातील कार्यक्रमातून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी
संबोधीत करतील. त्यांच्या या भाषणाचेही थेट प्रक्षेपण, दूरचित्रवाणी,
वेबकास्टिंगच्या माध्यमातून प्रक्षेपण करण्यात येणार आहे. या सर्व कार्यक्रमासाठी
संबंधित घटकांनी वेळेत नियोजन करावे, विविध उपक्रमांचे आयोजन करावे, तसेच
कार्यक्रमात जास्तीत जास्त नागरिक सहभागी होतील, यासाठी प्रयत्न करावेत असे निर्देशही बैठकीत देण्यात आले.
0000000
No comments:
Post a Comment