Friday, September 23, 2016

लेख

पशुसंगोपन व्यवसायाच्या प्रोत्साहनासाठी विविध योजनांचा आधार

नैसर्गिक आपत्ती, अनियमित पर्जन्यमान यासारख्या अनेकविध कारणाने कृषी उत्पादनात घट होते, त्यातूनच शेतकरी अडचणीत सापडतो. अशावेळी शेतीला जोडधंदा व पुरक व्यवसाय केला तर शेतकऱ्यांना आधार मिळतो. म्हणून राज्य शासनाने पशुसंगोपन, शेळीपालन व कुक्कूट पालन व्यवसाय करणाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध कल्याणकारी योजना सुरु केल्या आहे. नांदेड जिल्ह्याने या योजनाची प्रभावी अंमलबजावणी करुन शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिलेला आहे. त्याविषयी….

शेतीला जोडधंदा पुरक व्यवसाय म्हणून पशुसंगोपन , शेळीपालन कुक्कूटपालन व्यवसाय करण्यात येतो.  पशुपालन व्यवसाय करुन स्वयंरोजगार निर्मिती होते. मानवी आहरासाठी दुध दुग्धजन्य पदार्थ, मांस, अंडी , लोकर इत्यादी तसेच शेतीसाठी शेणखत यासाठी पशुधनाचे अनन्य साधारण महत्व आहे. त्यामुळे आता पशुसंगोपन करणे हा जोडधंदा किंवा पुरक व्यवसाय राहता स्वत:चे वेगळेपण सिद्ध करीत आहे.
दारिद्रयरेषेखालील कुटुंबासाठी, अत्यल्प अल्प कुंटुंबातील पशुपालकांसाठी पशुसवंर्धनाच्या विविध योजना रोजगाराचे मुख्य साधन निर्माण झाले आहे. पशुपालकांनी स्वत:कडील पशुचे जातीने लक्ष देवून पालन पोषण करणे आगत्याचे आहे. त्यांना वेळेवर लसीकरण, औषधोपचार वेळेच्यावेळी करुन घेण्यासाठी जिल्हयाचे ठिकाणी पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय  तसेच तालुक्याचे ठिकाणी तालुका लघु पशुवेद्यकीय सर्व चिकित्सालये अर्धापूर, कंधार, देगलूर, नायगाव धर्माबाद या 5 ठिकाणी कार्यरत आहेत. याशिवाय स्थानिक स्तरावरील श्रेणी एकचे 74 पशुवैद्यकीय दवाखाने व श्रेणी-2 चे  104 पशुवैद्यकीय दवाखाने असे एकूण 184 पशुवैद्यकीय संस्था जिल्ह्यात कार्यान्वित आहेत.
जनावरांना घटसर्प, फ-या, लाळखुरकुत तसेच शेळया मेंढयाना आंत्रषिार , पीपीआर कुक्कूट वर्गीय पक्षांना लासोटा, राणीखेत, कोंबडयाची देवी इत्यादी ससंर्गजन्य आजार होत असतात. या जिवघेण्या आजारापासून संरक्षण व आर्थिक उत्पन्नाला बाधा येवू नये यासाठी पशुपालकांनी काळजी घेतली पाहिजे. रोगप्रतिबंधक लसीचे लसीकरण करुन घेणे आवश्यक आहे 
पशुपालकांसाठी राज्य शासनाने पशुधन विमा योजना ही देखील एक वरदान ठरणारी योजना आहे. नुकताच 1 ऑगस्ट 2016 ते 15 ऑगस्ट 2016 या कालावधीत पशुधन विमा पंधरवाडा साजरा करण्यात आला. यामध्ये पशुपालकांकडील दुभत्या जनावराचा तसेच शेळया मेंढया इत्यादीचा विमा काढण्याची मोहिम राबविण्यात आली. पशुपालकांनी स्वताकडील बहुमुल्य जनावरांचे नुकसान टाळण्यासाठी पशुधन विमा करणे आगत्याचे आहे. यामुळे पशुपालकांना नुकसान भरपाई विमा कंपनीकडून तात्काळ मिळू शकेल.
शेतक-यांचे दारात कृत्रिम रेतनाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. पशुधनाची वंशावळ टिकून रहावी यासाठी अनुवंशीक सुधारणा हा महत्वाकांक्षी कार्यक्रम राबविण्यात येत आहे. अधिक दुध उत्पादन देणा-या गाई म्हशीची नोंदणी ऑनलाईन पध्दतीने करण्यात येते. तसेच त्यांना उच्च वंशावळीच्या रेतनापासून कृत्रिम रेतनाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. त्यापासून जन्मलेल्या कालवडीसाठी 5 हजार रुपये धनादेशाद्वारे देण्यात येतात.
पशुपालकाकडे असलेल्या जनावरांना हिरवा चारा, कडबा हा बारीक कुटी करुन खाऊ घालणेसाठी 50 टक्के अनुदानावर 500 लाभार्थीना 2 एचपी विदयुत चलित कडबाकुटी यंत्राचे वाटप सन 2015-16 मध्ये करण्यात आले व सन 2016-17 मध्ये 500 कडबाकुटी यंत्राचे वाटप करण्यात येणार आहे. यामुळे वाया जाणा-या वैरणीची 40 टक्के बचत होईल.
जिल्ह्यात या वर्षातील आतापर्यत  पाऊस चांगला झालेला आहे. निसर्गाची साथ मिळालेली आहे. पावसाचे पाणी टिकवून ठेवणे त्याचा काटकसरीने वापर करणे गरजेचे आहे. ज्यामुळे किमान खरीप रब्बी या दोन हंगामामध्ये पिकांची लागवड चांगल्या प्रकारे होऊन अन्नधान्याचे व जनावरासाठी सकस चारा मुबलक प्रमाणात उपलब्ध होऊ शकेल. उन्हाळयातील चा-याची कमतरता भासू नये म्हणून मुबलक होणा-या चा-याचे उत्पादनातून मुरघास तयार करणे फायदयाचे ठरेल. यासाठी प्लास्टीकच्या चारा बॅगचाही वापर करता येईल. अतिरिक्त वैरणीचे उत्पादन मुरघासचे रुपात साठवून ठेवता येईल त्याचा वापर उन्हाळयाच्या दिवसात तसेच चा-याची कमतरता असलेल्या दिवसात करता येऊ शकेल.
शहरातील पशुपालकासाठी जमिनी अभावी वैरण उत्पादन घेणे शक्य नसते अशावेळी शहरानजिकच्या पशुपालकांकडून हिरवी, वाळलेली वैरण कुटी करुन विक्री करणे हा देखील व्यवसायरुपाने करता येवू शकेल उत्पन्नात वाढ करता येईल. शेतीला पुरक ठरणारा हा पशुसंवर्धन व्यवसाय शेतकऱ्यांसाठी जोडधंदा म्हणून ओळखला जात आहे. या पूरक व्यवसायासाठी मिळणाऱ्या सोयी-सुविधा आर्थिक मदत, शेतकऱ्यांचा त्यामध्ये असणारा सहभाग या सर्व बाबींचा विचार केला तर नजिकच्या कालावधीत पशुसंवर्धन हा जोड व्यवसाय न रहाता मुख्य व्यवसाय म्हणून नावारुपास येईल.  
-         दिलीप गवळी,
जिल्हा माहिती अधिकारी नांदेड

0000000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...