Monday, October 24, 2016

रब्बी हंगामासाठी बी-बियाणे उपलब्धतेबाबत
काटेकोर नियोजन व्हावे- जिल्हाधिकारी काकाणी
हंगामातील पीक क्षेत्रवाढीसाठी प्रयत्न करण्याचेही निर्देश
नांदेड, दि. 24 :- आगामी रब्बी हंगामासाठी प्रामुख्याने हरभरा, भुईमूग आणि ज्वारी या पिकांच्या क्षेत्रवाढीसाठी प्रयत्न व्हावेत. रब्बा हंगामासाठी शेतकऱ्यांसाठी आवश्यक अशा बियाण्याच्या उपलब्धतेबाबत कृषि विभागाने काटेकोर नियोजन करण्यात यावे. बी-बियाण्यांच्याबाबत शेतकऱ्यांना अडचणी येऊ नयेत, त्यांच्या पुरेश्या उपलब्धतेबाबत वेळीच नियोजन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांनी आज येथे दिले. श्री. काकाणी यांच्या अध्यक्षतेखाली रब्बी हंगामाच्या नियोजनांसाठी कृषि विभाग आणि बी-बियाणे पुरवठादारांची बैठक संपन्न झाली. या बैठकीत ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हाधिकारी यांच्या निजी कक्षात बैठक झाली.
बैठकीत बी-बियाण्याच्या उपलब्धतेबाबत शेतकऱ्यांपर्यंत पोहचून, अनुदानित बियाण्याची उपलब्धता आणि खुल्या बाजारातील बियाणे याबाबतही मार्गदर्शन करावे, असेही निर्देश जिल्हाधिकारी श्री. काकाणी यांनी दिले.
बैठकीस जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॅा. तुकाराम मोटे, मोहिम अधिकारी ए. जी. हांडे, तंत्र अधिकारी एस. बी. शितोळे, बी-बियाणे खत विक्रेता संघटनेचे अध्यक्ष मधुकर मामडे, महाबीजचे व्यवस्थापक के. एल. सावंत तसेच राष्ट्रीय बिज निगम, कृभको यांचे प्रतिनिधीही उपस्थित होते.
रब्बी हंगामात हरभरा, भुईमूग आणि ज्वारी यांच्या क्षेत्रवाढीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन द्यावे. हरभरा  बियाण्याच्या उपलब्धतेबाबत अनुदानित आणि खुल्या बाजारातील विक्री याबाबत पारदर्शकता ठेवण्यात यावी, असे जिल्हाधिकारी श्री. काकाणी यांनी निर्देशित केले. रब्बी हंगामासाठी बियाणे उपलब्धतेबाबत महाबीज, कृषि विभाग, घाऊक विक्रेते आणि तालुकास्तरावरील यंत्रणांनी संपर्क-समन्वय ठेवावा. जेणेकरून शेतकऱ्यांची अडचण होणार नाही. त्यासाठी वेळोवेळी माहितीची देवाण-घेवाण करावी, असेही त्यांनी सांगितले. खतांचा पुरवठा आणि त्यांच्या उपलब्धतेबाबतही यावेळी चर्चा झाली.
हरभऱ्याचे अनुदानित बियाण्याचे वाटपात अडचणी येऊ नयेत यासाठी प्रथम येणाऱ्यास प्रथम या तत्त्वावर आणि सात-बारा, आधार कार्डच्या नोंदी घेऊन प्रति शेतकरी तीस किलोचे वाटप करण्यात येत आहे. हरभऱ्याच्या अनुदानित बियाण्याचा दर ऐंशी रुपये प्रतिकिलो असा आहे. तर खुल्या बाजारातील विक्रीबाबत शेतकऱ्यांनी संबंधित छापील किंमतीची खात्री करून बियाणे घ्यावे. बियाणे खरेदीची पावती घ्यावी व ती जपून ठेवावी. बी-बियाणे व खतांच्या दुकानात कृषि तसेच विविध यंत्रणांच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचे दूरध्वनी क्रमांक लावण्यात आले आहेत. त्यामुळे बी-बियाण्याच्या उपलब्धतेबाबत अडचणी आल्यास संबंधितांकडे किंवा तालूका कृषि अधिकारी, पंचायत समितीच्या कृषि अधिकारी, कृषी सहायक यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहनही कृषि विभागाच्यावतीने बैठकी दरम्यान करण्यात आले.
जिल्ह्यातील रब्बीचे क्षेत्रात अडीच लाख हेक्टरपर्यंत वाढ व्हावी, त्यातही पिक-पद्धतीत अमुलाग्र बदलासाठी मार्गदर्शन आणि समुपदेशन करण्यात यावे, अशी अपेक्षाही जिल्हाधिकारी श्री. काकाणी व्यक्त केली.

0000000

No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...