Monday, January 8, 2024

 वृत्त क्र.  28

 

महासंस्कृती महोत्सवाला लोकाभिमूखतेची

जोड देण्यासाठी जिल्हा प्रशासन कटिबद्ध

- जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

 

·         महासंस्कृती महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी जिल्ह्यातील कलावंताचा निर्धार

 

नांदेड (जिमाका) दि. 8 :- महासंस्कृती महोत्सव हा एकात्मता, सामाजिक सौहार्द यासह आपल्या जिल्ह्यातील वैशिष्ट्यपूर्ण असलेल्या कला संस्कृतीच्या संवर्धनासाठी एक महत्त्वाचा महोत्सव आहे. हा महोत्सव नावारूपास आणणे आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. या महोत्सवात जिल्ह्यातील वैशिष्ट्यपूर्ण ठरलेल्या कलांच्या सादरीकरणासाठी विशेष राखीव वेळेद्वारे अधिकाधिक कलावंतांना व्यासपीठ उपलब्ध करून देऊ, असे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी सांगितले.

 

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या अनुषंगाने राज्यातील विविध प्रांतातील संस्कृतीचे आदान-प्रदान, स्थानिक कलाकारांसाठी व्यासपीठ, लुप्त होत चाललेल्या कला व संस्कृतीचे जतन व संवर्धन, तसेच स्वातंत्र्य लढ्यातील ज्ञात-अज्ञात लढवय्यांची माहिती इ. बाबी जनसामान्यापर्यत पोहोचविण्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात 15 जानेवारी ते 15 फेब्रुवारी 2024 या कालावधीत पाच दिवसीय महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन केले जाणार आहे. या महोत्सवाला लोकाभिमूख करण्यासह स्थानिक कलावंतांच्या याबाबत काही सूचना असल्यास त्या नियोजनाच्यादृष्टिने समजून घेण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे आज बैठक नियोजन भवन येथे आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत जिल्हाधिकारी अभिजीत राऊत बोलत होते.

 

या बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, सुरेश जोंधळे, ज्येष्ठ शाहीर रमेश गिरी, बापु दासरी, नाट्यकर्मी लक्ष्मण संगेवार, जयंत वाकोडकर, आनंदी विकास, विजय निलंगेकर, राधिका वाळवेकर, डॉ. राम चव्हाण, मंजूर हाश्मी, डॉ. वैशाली गोस्वामी, ॲड गजानन पिंपरखेडे, डॉ. विद्या झिने, डॉ. बालाजी पेनूरकर, चित्रकार कविता जोशी, वसंतराव बारडकर, विजय होकर्णे, दिनेश कवडे, शिवाजी टाक, मिना सोलापूरे आदी उपस्थित होते.

 

महासंस्कृती महोत्सवात महाराष्ट्राची संस्कृती दर्शविणारे तसेच शिवचरित्रावर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम यासह पोवाडा, भारुड, गोंधळगीत इ. सारखे लोककलेतील विविध प्रकार समाविष्ट असणार आहेत. स्थानिक दुर्मिळ व लुप्त होत चाललेल्या लोककला, संस्कृती, विविध स्थानिक महोत्सव/सण/कार्यक्रम आणि देशभक्ती गीत याबाबत बैठकीत सहभागी कलावंतांनी मौलिक सूचना केल्या. बैठकीचे संचलन निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांनी केले.

00000









No comments:

Post a Comment

निवडणुकीच्या लगबगीत माध्यमांच्या प्रतिनिधींसोबत जिल्हाधिकाऱ्यांनी संवाद साधला.जिल्हाधिकारी अभिजीत राऊत हे नांदेड लोकसभापोटनिवडणुकीत निवडणूक ...