Friday, February 14, 2025

  वृत्त क्रमांक 179

राज्यस्तरीय महसूल क्रीडा स्पर्धेची नांदेडमध्ये जय्यत तयारी

कसून सराव, मैदानाचे अद्यावतीकरण, व्यवस्थाचे नियोजन
नांदेड दि. 14 फेब्रुवारी :- राज्यस्तरीय महसूल क्रीडा स्पर्धेच्या जय्यत तयारीला नांदेडमध्ये सुरू झाली आहे एकीकडे महसूल विभागातील कर्मचारी आपले काम सांभाळून मैदानी तयारी करत आहे तर दुसरीकडे अडीच हजारावर येणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या स्वागतासाठी प्रशासन कामाला लागले आहे क्रीडा विभागाने मैदानाच्या अद्यावतीकरण केले असून जिल्हा व महानगरपालिका प्रशासन स्वच्छतेच्या कामाला प्राधान्य देत आहे.
नांदेड येथे 21 ते 23 फेब्रुवारी 2025 रोजी छत्रपती संभाजीनगर विभागाच्यावतीने राज्यस्तरीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन श्री. गुरु गोबिंदसिंघ जी स्टेडियम येथे करण्यात आले आहे. या राज्यस्तरीय स्पर्धेचे उदघाटन राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते होणार आहे.


या क्रीडा व सांस्कृतीक स्पर्धांना महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव, विभागीय आयुक्त, नोंदणी मुद्रांक महानिरीक्षक, जमाबंदी आयुक्त पुणे, सर्व अपर आयुक्त, सर्व जिल्हाधिकारी तसेच छत्रपती संभाजीनगर, कोकण, पुणे, नागपूर, अमरावती, नाशिक या महसूल विभागातील तसेच नोंदणी व मुद्रांक विभाग आणि जमाबंदी आयुक्त, पुणे अशा 7 विभागातील जवळपास दोन ते अडीच हजार पुरुष व महिला खेळाडू उपस्थित राहणार आहेत.



यामध्ये संचलन, क्रिकेट, कबड्डी, व्हॉलीबाल, फुटबॉल, खो-खो, रिले, महिला थ्रो-बॉल आणि जलतरण या सांघिक खेळ प्रकाराचा समावेश आहे. तसेच बुद्धीबळ, कॅरम, टेबल टेनिस, बॅडमिंटन, लॉन टेनिस, 100,200,400 मीटर धावणे, लांब उडी, उंच उडी, गोळा, भाला, थाळी फेक, रिंग टेनिस आणि 45 वर्षावरील 3 कि.मी.चालणे इत्यादी वैयक्तिक 82 प्रकारच्या खेळातील मैदानी सामने श्री गुरुगोविंदसिंघजी स्टेडीयम, इंदिरा गांधी मैदान, पिपल्स कॉलेज, सायन्स कॉलेज या मैदानावर तर जिल्हा क्रीडा संकुल आणि महानगरपालिकेच्या इनडोअर हॉल मध्ये इनडोअर प्रकारचे तसेच कै.शांताराम सगणे या जलतरणिकेमध्ये सर्व जलतरणाचे सामने होणार आहेत. मैदानी खेळाव्यतिरिक्त सर्व 7 विभागाच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन यशवंत कॉलेजच्या मैदानावर सायंकाळी 6 ते 10 वा.दरम्यान करण्यात आले आहे. उत्कृष्ट गायन, अभिनय, वैयक्तिक नृत्य, वेशभूषा, नक्कल, वादक, निर्मिती, दिग्दर्शक, कलाप्रकार, निवेदक, नाटीका इत्यादी कला प्रकारचा समावेश आहे.
नांदेड येथे होणाऱ्या राज्यस्तरीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेची जय्यत तयारी जिल्हाधिकारी राहूल कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे. अपर जिल्हाधिकारी पी.एस.बोरगांवकर यांचे सनियंत्रणात आणि निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, सर्व संघटनांचे पदाधिकारी हे या स्पर्धेच्या तयारीसाठी अहोरात्र परिश्रम घेत आहेत. तसेच नांदेड येथील महसूल अधिकारी, कर्मचारी या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी सराव करीत आहेत. या सरावासाठी ते मैदानावर सकाळ, संध्याकाळ सराव करीत आहेत.
00000

No comments:

Post a Comment

'आम्ही असू अभिजात ' संमेलन गीताला नांदेडचा संगीत साज ! आनंदी विकास यांनी संगीतबद्ध केले अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे गीत #नांदेड द...