विशेष वृत्त 180
बोलक्या प्रतिक्रियांमधून मराठी भाषेबद्दल व्यक्त झाल्या भावना
नांदेड दि. 14 फेब्रुवारी :- मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानंतर होत असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाबद्दल नांदेडकरांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. नवकथाकरांपासून तर मराठीच्या प्राध्यापकांपर्यंत सर्वांनाच मराठी भाषेच्या अभिजात दर्जाचा अभिमान आहे. नांदेडच्या मुलखातून मोठ्या संख्येने मराठी साहित्यिक दिल्लीच्या संमेलनात सहभागी होणार आहे.
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने उत्सव अभिजात मराठीचा हा उपक्रम सुरू केला आहे .
या अंतर्गत माध्यमांच्या सर्व आयुधातून दिल्ली येथे होणाऱ्या मराठी साहित्य संमेलनाच्या संदर्भातील नागरिकांच्या भावना व्यक्त केल्या जात आहे. काही बोलक्या प्रतिक्रिया खास मराठीप्रेमी वाचकांसाठी..
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर पहिल्यांदाच महाराष्ट्राबाहेर दिल्लीत 98 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. मराठी साहित्यिक, लेखक, वाचकांसाठी हा ऐतिहासिक क्षण ठरणार आहे. नवोदीत कवी, कथाकार, कांदबरीकार, लेखक यांना हक्काचे व्यासपीठ मिळणार आहे.
मराठी भाषेला जागतीक कीर्ती मिळावी, जगाच्या कानाकोपऱ्यात माय मराठीचा जल्लोष व्हावा, यासाठी हे साहित्य संमेलन महत्वाचे ठरणार आहे. यासाठी अनेक साहित्यिक, लेखक, प्रकाशक यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहे.
या साहित्य संमेलनात साहित्य, भाषा आणि संस्कृती यांचे चिंतन होणार असून, विविध चर्चासत्रे, परिसंवाद आणि ग्रंथप्रदर्शन आयोजित केले जाणार आहेत. 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अनुषंगाने नांदेड येथील प्रसिध्द साहित्यिक, प्रकाशक, लेखक यांनी आपल्या प्रतिक्रीया व शुभेच्छा दिल्या आहेत.
सावित्रीबाई फुले महिला अध्यापक महाविद्यालय, सिडको येथील सहाय्यक प्राध्यापक आम्रपाली रामराव भद्रे यांनी मराठी माणसाने मराठी माणसासाठी एकत्र येणे ही काळाची गरज आहे. दिल्ली येथे 98 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाने हे दाखवून दिले आहे.
महाराष्ट्रात सर्व विद्यार्थ्यांच्या पालकांनी आपल्या पाल्यांना मराठीतूनच शिक्षण दिले पाहिजे. प्रत्येक मराठी माणसाने आपल्या पाल्यांना मराठी कवी संमेलने, कार्यक्रमांना आवर्जून नेले पाहिजे. यामुळे मुलांमध्ये मराठी भाषा अधिक वृध्दींगत होईल आणि त्यांना आवड निर्माण होईल. मराठी भाषा अधिक संवर्धित करण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे त्यांनी व्यक्त केले.
श्री. निर्मलकुमार सुर्यवंशी, प्रकाशक, निर्मल प्रकाशन :- मी नांदेड येथून मागील 50 वर्षापासून मराठी वाडमयीन 800 पुस्तके प्रकाशित केले आहेत. यावर्षी मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला आहे. तो मिळणे ही बाब आमच्या सारख्या मराठी भाषिकांना आनंदाची व अभिमानास्पद बाब आहे. पुणे व इतर शहरातून अनेक प्रकाशक 98 व्या मराठी साहित्य संमेलनासाठी जाणार असून जिल्हा पातळीवरुनही अनेक प्रकाशक, लेखक, साहित्यिक दिल्लीला जाणार आहेत. नांदेड येथील निर्मल प्रकाशनही याठिकाणी जावून स्टॉल लावणार असल्याचे त्यांनी सांगितले.
श्री. राम तरटे, ग्रामीण कथाकार :- मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर पहिल्यांदाच दिल्लीला आखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. हे 98 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन निश्चितपणे मराठी भाषिक, लेखक, वाचकांना ऐतिहासिक ठरणार आहे. हे संमेलन नवोदित साहित्यिकासाठी एक नवी वाटचाल किंवा त्याला प्रस्थापित होण्यासाठीचा एक नवा मार्ग असणार आहे. या साहित्य संमेलनामुळे नवोदित कवि, कथा कांदबरीकार लेखकांना एका व्यापक व्यासपीठ मिळून, एका नवीन युगाला सुरवात होणार आहे असे मत ग्रामीण कथाकार राम तरटे यांनी व्यक्त केले.
या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने मराठी भाषेला अधिकाधिक जागतिक दर्जा मिळावा. जगाच्या कानाकोपऱ्यात माय मराठीचा जल्लोष, गजर व्हावा, जागतिक पातळीवर किर्ती मिळावी. याबाबत ग्रामीण कथाकार राम तरटे यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी अनेक वर्षापासून संघर्ष सुरु होता. तो संघर्ष आता संपुष्टात आला. मराठी भाषेतील विद्वान, लेखकांनी, साहित्यिकांनी यासाठी सातत्याने दिल्लीपर्यत पाठपुरावा केला. यामुळे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देवून सन्मान मिळाला आहे.
नारायण शिंदे, लेखक :- नांदेड मधील ज्येष्ठ साहित्यिक लेखक नारायण शिंदे यांनी दिल्लीत होणाऱ्या संमेलनाबद्दल आनंद व्यक्त केला आहे.मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळालेला असून तो केंद्र शासनाने दिला आहे, आणि त्याच ठिकाणी साहित्य संमेलन होत आहे. याबाबत विशेष आनंद आहे. 98 व्या आखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला नांदेड येथून अनेक साहित्यिक जाणार आहेत. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी जे यश मिळालेले आहे हे यश या संमेलनाच्या सहभागामधून वृध्दींगत होणार आहे. कै. यशवंतराव चव्हाणांनी मराठी भाषा संवर्धनासाठी अनेक महामंडळे स्थापन केली. या साहित्य संमेलनाच्या माध्यमातून त्यांची आठवण केली जाईल असे मत नारायण शिंदे यांनी व्यक्त केले. या संमेलनाला येणाऱ्यांना मराठी भाषिक ग्रंथ पाहाण्यास व वाचण्यास उपलब्ध होणार आहेत. एकूणच नांदेड मधील मराठी साहित्यिकांमध्ये दिल्लीच्या साहित्य संमेलना बद्दल उत्सुकता दिसून येत आहे.
00000
No comments:
Post a Comment