जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात रानभाजी महोत्सवाचे सोमवारी आयोजन
नांदेड (जिमाका) दि. 6 :- जागतिक अदिवासी दिनानिमित्त सोमवार 9 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वा. जिल्हाधिकारी कार्यालय परीसरात रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे उद्घाटन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा श्रीमती मंगाराणी अंबुलगेकर यांच्या हस्ते होणार आहे. या महोत्सवात सर्व प्रकारच्या रानभाज्या कर्टुली, शेवगा, घोळ, चवळी, बांबूचे कोंब, दिंडा, टाळका, पिंपळ, मायाळ, पाथरी, अळु, कपाळफोडी, कुरडू, उंबर, चिवळ, भुई आवळी इ. कंदभाज्या व सेंद्रीय हिरव्या भाज्या, फळभाज्या व फूलभाज्या व ड्रँगन फ्रुट रानफळांची व शेतकऱ्यांनी विविध उत्पादीत केलेला माल, सेंद्रीय उत्पादने, गुळ, हळद, लाकडी घाण्याचे करडीचे तेल, गहू, सर्व डाळी व भुईमुगच्या शेंगा, मुगाच्या शेंगा व केळीचे वेफर्सचे प्रदर्शन व विक्री होणार आहे. कोवीड-19 च्या नियमांचे पालन करुन या रानभाजी महोत्सवाचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे यांनी केले आहे.
या महोत्सवास आमदार बालाजीराव कल्याणकर, आमदार मोहन हंबर्डे, जिल्हा परीषदेचे कृषी सभापती बाळासाहेब रावणगावकर, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा पदिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी, वर्षा ठाकूर-घुगे, कृषि विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
मानवी आरोग्यामध्ये सकस अन्नाचे अनन्यसाधारण
महत्व आहे. सकस अन्नामध्ये विविध भाज्यांचा समावेश होतो. सध्याच्या
परिस्थितीमध्ये रानातील म्हणजेच जंगलातील तसेच शेत शिवारातील नैसर्गिकरित्या
उगवल्या जाणाऱ्या रानभाज्या, रानफळांचे महत्व व आरोग्यविषयक माहिती सर्वसामान्य नागरिकांना होणे
आवश्यक आहे. रानभाज्यांचा समावेश हा त्या-त्या भागातील शेतकऱ्यांचे आहारात होत
असतो. रानभाज्यांमध्ये विविध प्रकारचे शरीराला आवश्यक असणारे पौष्टिक अन्नघटक
असतात. या रानभाज्या नैसर्गिकरित्या येत असल्यामुळे त्यावर रासायनिक किटकनाशक
/ बुरशीनाशक फवारणी करण्यात येत नाही. त्यामुळे रानभाज्या पुर्णपणे नैसर्गिक
असल्याने या संपत्तीचा योग्य वापर आवश्यक आहे. शहरी लोकांमध्ये याबाबत जागृती
होणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी जिल्हयात रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात
येणार आहे. या महोत्सवामधून शहरातील ग्राहकांनी थेट शेतकऱ्याकडून रानभाजी खरेदी
करावी, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी तथा प्रकल्प
संचालक (आत्मा) रविशंकर चलवदे यांनी केले आहे. शेतकरी गट व महिला गटांचा सक्रिया
सहभाग या महोत्सवात असणार आहे. हा महोत्सव सोमवारी सकाळी 10 ते सायंकाळी 6
वाजेपर्यत सुरु राहणार आहे, अशी माहिती जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांनी
प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
00000
No comments:
Post a Comment