वृत्त क्रमांक 194
नवोदय विद्यालयात दोन दिवसीय कार्यशाळा उत्साहात
वनस्पती वर्गीकरण, पर्यावरण आणि पर्यावरणीय शास्त्रावर विद्यार्थ्यांचा भरघोस प्रतिसाद
नांदेड, दि १८ फेब्रुवारी : पीएम श्री.जवाहर नवोदय विद्यालय, शंकर नगर, नांदेड येथे १७ व १८ फेब्रुवारी २०२५ रोजी "वनस्पती वर्गीकरण, पर्यावरण आणि पर्यावरणीय शास्त्र" या विषयावर दोन दिवसीय कार्यशाळा अत्यंत उत्साहात संपन्न झाली.
SEER भारत फाऊंडेशन आणि शरदचंद्र कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाच्या वनस्पतीशास्त्र विभागाच्या संयुक्त विद्यमाने तसेच जवाहर नवोदय विद्यालय, शंकर नगर, नांदेड यांच्या सहकार्याने ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवणे आणि पर्यावरण संवर्धनाबाबत जागरूकता निर्माण करणे. हा या कार्यशाळेचा प्रमुख उद्देश होता. ८वी, ९वी आणि ११वीच्या विद्यार्थ्यांसाठी विशेषरित्या आयोजित या उपक्रमामध्ये पुष्पबंधांचे विविध प्रकार प्रत्यक्ष दाखवण्यात आले.
विद्यार्थ्यांना परिसरात थेट निरीक्षण करून पर्यावरणविज्ञान व वनस्पतीशास्त्र याबद्दल सखोल ज्ञान मिळावे, यासाठी शालेय आवारात क्षेत्रभ्रमणही करण्यात आले.
या कार्यशाळेत प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. सचिन के. तिप्पट (प्राध्यापक व विभाग प्रमुख, पर्यावरणशास्त्र विभाग, श्रीमती नरसम्मा कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, किरण नगर, अमरावती), डॉ. एस. एस. पाटील आणि श्री. दर्शन तळहांडे (वनस्पतीशास्त्र विभाग, शरदचंद्र कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय) यांनी विद्यार्थ्यांना मौलिक मार्गदर्शन केले. त्यांच्या मार्गदशनामुळे विद्यार्थ्यांना वनस्पती वर्गीकरण आणि पर्यावरणविषयक संकल्पना अधिक स्पष्टपणे समजल्या.
SEER भारत फाऊंडेशनने विद्यार्थ्यांसाठी विशेष शैक्षणिक साहित्य आणि कीटचे वितरण केले. त्यांच्या वतीने अशा नाविन्यपूर्ण उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक जिज्ञासा आणि पर्यावरणीय भान वाढवण्याचा सतत प्रयत्न केला जात आहे. या उपक्रमास शरदचंद्र कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाच्या वनस्पतीशास्त्र विभागाचा मोठा पाठिंबा मिळाला, ज्यामध्ये प्राचार्य डॉ. के. हरिबाबू आणि उपप्राचार्य व वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. एस. एस. पाटील यांचे महत्त्वाचे योगदान लाभले.
कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनामागे जवाहर नवोदय विद्यालय, शंकर नगर, नांदेडचे प्राचार्य श्री. एस. जी. मांडले यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच, श्री. एन. एन. घमे (PGT जीवशास्त्र) आणि श्री. मोहित (PGT गणित) यांचेही सहकार्य लाभले. श्री. एन. एन. घमे सर अशा नाविन्यपूर्ण उपक्रमांच्या आयोजनासाठी सतत आग्रही असतात आणि ते स्वतः जीवशास्त्राचे शिक्षक असल्याने हा कार्यक्रम विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावा आणि त्यातून त्यांची पर्यावरण आणि आपल्या आसपासच्या वनस्पतींबद्दल जागरूकता निर्माण व्हावी यासाठी त्यांनी या कार्यक्रमाची संकल्पना राबवली.
SEER भारत फाऊंडेशनचे सचिव श्री. शुभम धर्माळे तसेच प्राचार्य के. हरीबाबू म्हणाले, "विद्यार्थ्यांमध्ये STEM (विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित) विषयांबद्दलची आवड निर्माण करण्यासाठी आम्ही भविष्यात अधिकाधिक अशा उपक्रमांचे आयोजन करत राहू."
ही कार्यशाळा अत्यंत प्रेरणादायी ठरली, विद्यार्थ्यांनी यात सक्रिय सहभाग घेतला आणि वैज्ञानिक शिक्षण व पर्यावरण संवर्धनाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकले. कार्यशाळेच्या समारोप कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी त्यांच्या अनुभवांचे सादरीकरण केले आणि त्यांनी मिळवलेल्या ज्ञानाचा उपयोग भविष्यात कसा करता येईल, यावर चर्चा करण्यात आली. सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे वितरित करण्यात आली, ज्यामुळे त्यांना प्रोत्साहन मिळाले.
0000
No comments:
Post a Comment