Tuesday, February 18, 2025

 विशेष लेख / 

98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनानिमित्त प्रकाशनार्थ

बदलती माध्यमं आणि बदलणारी भाषा

भाषा ही माणसाला मिळालेली सर्वात मोठी देणगी होय. भाषा ही संस्कृतीची वाहक आहे.भाषेशिवाय मानवी अस्तित्व आणि मानवी संस्कृती यांची कल्पनाही करणे अशक्य. मानवी जीवनातील आणि अर्थातच मानवी संस्कृतीतील संचित भाषेच्या माध्यमातूनच एका पिढीतून दुसऱ्या पिढीत संक्रमित झाले आहे. 

भाषा कुठून येते ? आपण ' मातृभाषा ' असा शब्दप्रयोग करतो तेव्हा आईची जी भाषा ती मुलाची भाषा असा अर्थ आपल्याला अभिप्रेत असतो काय ? लहान मुल त्याच्या परिसरातील भाषा आत्मसात करते.ते वाढत जाते , तसा त्याच्या परिसराचा विस्तार होतो आणि त्याचा त्याच्या भाषेवर परिणाम होतो. आमच्या छत्रपती संभाजीनगरला ( औरंगाबाद ) राहणारे लोकं घराबाहेर पडले की अगदी सहज हिंदी बोलतात.आपण ज्या विक्रेत्याकडून भाजी घेत आहोत , तो ग्रामीण भागातून आलेला आपल्यासारखाच मराठी माणूस आहे , याचा जणू विसरच पडतो आणि ' मेथी क्या भाव है ? ' असा प्रश्न हाती भाजीची जुडी घेत सहजपणे विचारतो !

प्रश्न भाषेचा असल्याने आणि भाषा ही मूलतः वैयक्तिक असल्याने काही व्यक्तिगत अनुभव नमूद करायला हवेत.साधारण पस्तीस  वर्षांपूर्वी पुण्यात राहणाऱ्या मित्राने मला बजावले होते की , पुण्यात रिक्षावाल्याशी हिंदीत बोलायचे नाही ! हिंदीत बोलणारा माणूस पुण्यातील नाही म्हणजे नवखा आहे , असे रिक्षावाल्यांच्या लगेच  लक्षात येते आणि मग त्यातील एखादा जवळच्या अंतरासाठी दूरचा रस्ता जवळ करू शकतो असे त्या मित्राचे सांगणे होते.दुसरा अनुभव दिल्लीतील.तेथे राहणारे माझे एक आप्त मला म्हणाले की त्यांच्या परिचयाच्या अन्य मराठी माणसांच्या तुलनेत माझी हिंदी चांगली आहे. या आप्तांना चांगल्या वाटलेल्या माझ्या हिंदीचे कारण माझे  छत्रपती संभाजीनगर  (औरंगाबाद ) येथील वास्तव्य म्हणजे माझा परिसर हे आहे.वक्तृत्व आणि वादविवाद स्पर्धांसाठी मार्गदर्शन करणारे प्रा. वसंतराव कुंभोजकर विद्यार्थ्यांना सांगत की , मराठी शब्दोच्चारांवर लक्ष द्यायला हवे. हिंदीत ' ण ' नाही पण मराठीत तो आहे आणि त्याचा उच्चार  ' न ' पेक्षा वेगळा आहे ! ही सगळी उदाहरणे भाषेचे परिसराशी असलेले नाते सांगणारी आहेत. कोणतेही व्याकरण शिकण्यापूर्वी भाषा आत्मसात करण्याची मानवी क्षमता नैसर्गिक असल्याचे भाषाशास्त्रज्ञ सांगतात.

परिसरात माणसं असतात तशी माध्यमं असतात. आज तर माध्यमांचे प्रकार आणि त्यांची संख्या वाढती आहे.ही सारी माध्यमं आपल्या समोर आणून ठेवणारा मोबाईल आपल्या तर नेहमीच हाती असतो. त्याने आपला जणू सारा परिसरच व्यापला आहे. यातील बराच भाग आभासी असतो आणि तो खऱ्याखुऱ्या परिसरापासून आपल्याला नेहमी दूर नेतो , हेही लक्षात घ्यावे लागते. आपला परिसर माध्यमांनी व्यापलेला असल्याने माध्यमांच्या भाषेचा विचार करावा लागतो.

कोणे एकेकाळी ( हा कोणे एकेकाळ फार लांबचा नाही ! ) माध्यमांचे विश्व म्हणजे दैनिके , नियतकालिके , आकाशवाणी आणि दूरदर्शन असे होते. ( आकाशवाणी आणि दूरदर्शन हे शब्द रेडिओ आणि टेलिव्हिजन या शब्दांचे मराठी प्रतिशब्द नव्हेत.पण माध्यमांनी त्या अर्थाने ते रूढ केले आहेत. ' झेरॉक्स ' हा शब्दही असाच रूढ झाला आहे. मागच्या पिढीत वनस्पती तुपासाठी ' डालडा ' हा शब्दही असाच रुढ झाला होता.) जेव्हा माध्यमाचे विश्व मर्यादित होते , तेव्हा त्यांच्यातील स्पर्धाही मर्यादित होती. ( माणसाची झोप ही आमची प्रतिस्पर्धी आहे , असे म्हणणाऱ्या ' नेटफ्लिक्स ' चा काळ तेव्हा कल्पनेतही नव्हता !) एकूण जीवनाला आजच्या सारखी गती नव्हती. ' सर्वात आधी आणि सर्वांच्या पुढे ' हा आजचा जीवनमंत्र तेव्हा माध्यमांनी स्वीकारलेला नव्हता. तेव्हा तंत्रज्ञान आजच्या इतके गतीमान नव्हते आणि त्याच्या गतीची मर्यादा स्वीकारली गेली होती.माध्यमे तंत्रज्ञानप्रधान नव्हती.तेथे काम करणारे आणि वाचक ( ग्राहक नव्हे !) महत्वाचे होते.वाचकांची जडणघडण आपण करू शकतो , ही भूमिका तेव्हा रूढ होती म्हणूनच काही दैनिके राशिभविष्य छापत नव्हती. काही दैनिके आसाम ऐवेजी असम , पंतप्रधान ऐवेजी प्रधानमंत्री , मध्यपूर्व ऐवेजी पश्चिम आशिया , उत्तरपूर्व ऐवेजी इशान्य असे शब्द जाणीवपूर्वक उपयोगात आणत.त्या काळातील भाषा ही बहुतेकवेळा प्रमाणभाषेशी नाते सांगणारी होती. मराठी शब्द कटाक्षाने वापरण्याकडे कल होता.आज एका बाजूला कम्प्युटर हा शब्द वापरला जातो आणि त्याच वेळी डेटा या शब्दासाठी विदा हा शब्द रूढ करण्याचा प्रयत्न सुरू असतो आणि यात विसंगती आहे , असे कोणालाही वाटत नाही. हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट यांना अनुक्रमे उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय हे रूढ झालेले शब्दही वापरले जात नाहीत. काही वेळा मुख्य न्यायाधीश आणि सरन्यायाधीश असा फरक केला जात नाही. दिनांक ऐवजी तारिख , सप्ताह ऐवेजी आठवडा असे सोपे शब्द रुजवण्यासाठी प्रयत्न झाले , याचा आता विसर पडला आहे. हे घडत आहे याची अनेक कारणे आहेत. वर्तमानपत्रांच्या जगात पूर्वी बातमी असो की लेख , ते संपादकीय संस्कार केल्यानंतरच पुढे पाठवले जात. वार्ताहर , मुख्य वार्ताहर ,उपसंपादक , मुख्य उपसंपादक , वृत्तसंपादक...अशा पायऱ्या तेव्हा केवळ नामाभिधानासाठी अस्तित्वात नव्हत्या तर त्यांची स्वतंत्र कार्ये निर्धारित होती.आज ही पदं अस्तित्वात आहेत पण त्यांची दैनंदिन कार्ये बदलेली दिसतात. हा बदल तंत्रज्ञानातील बदलासोबत आला.तंत्रज्ञान गती आणि स्पर्धा घेऊन आले. त्याने माध्यमांचे स्वरूप बदलले. मुद्रितशोधक हद्दपार झाला.बातमीदार असो की लेखक , तोच त्याच्या मजकूराचा अनेकदा उपसंपादक ठरू लागला. जी दैनिके वेगळी जिल्हा पाने देतात , त्या पानांत या स्थितीचे प्रतिबिंब सहज दिसते.याचा परिणाम भाषेवर झाला. काहींनी नव्या पिढीशी नाते जोडायचे म्हणून त्या पिढीच्या भाषेशी नाते जोडण्याचा व्यावहारिक आग्रह धरला.त्याला कधी तात्विक रूप दिले. त्यातून भाषेचे रूप आणखी पालटले. महानगरातील भाषेत जशी इंग्रजी आणि हिंदीची सरमिसळ झालेली असते तशीच भाषा दैनिकातून डोकावू लागली. महानगरात राहणारी नवी पिढी इंग्रजी माध्यमातून शिकते.त्याच पिढीतील प्रतिनिधी आज वेगवेगळ्या माध्यमातून काम करतात.मग वटहुकूम आणि शासन निर्णय , विधेयक आणि कायदा यात फरक केला जात नाही. मराठीत क्रियापदांचे अनेकवचनी रूप असते , आदरार्थी अनेकवचन उपयोगात आणण्याची पद्धत आहे अशा बाबींचा विसर पडतो.

कोणतीही भाषा स्थिर असू शकत नाही आणि भाषेने अन्य भाषांमधील शब्द स्वीकारण्यास काही प्रतिबंध असू शकत नाही.पण असे शब्द स्वीकारताना आपल्या मूळ भाषेला रजा देण्याची गरज नाही.बँकेला बँक म्हणावे पण चेक साठी धनादेश हा शब्द सर्वांना समजतो ना ? 

आपल्या भाषेविषयी मराठी माणूस जागरूक नाही , ही विदारक वस्तुस्थिती आहे. मागे नगरला ( आजचे अहिल्यानगर ) साहित्य संमेलन झाले तेव्हा सुप्रसिद्ध दिग्दर्शक बासू भट्टाचार्य म्हणाले होते की , कलकत्ता शहरात सहा महिन्यांपेक्षा अधिक काळ राहायचे असेल तर बंगाली भाषा शिकावीच लागते.पण महाराष्ट्रात तशी परिस्थिती नाही.येथे पिढ्यानपिढ्या राहणारी माणसं मराठी नव्हे तर त्यांची मातृभाषा आणि हिंदी / इंग्रजी बोलत राहू शकतात.राहतात.

असे म्हणतात की ही विदारक वस्तुस्थिती ते सांगत होते तेव्हा सभामंडपातील प्रेक्षक टाळ्या वाजवत होते

आपल्याकडील माध्यमात याच अवस्थेचे प्रतिबिंब पडले आहे. त्यामुळे अनेकदा माध्यमातून कानी पडणारी किंवा वाचनात येणारी मराठी ही अनेकदा मराठी वळणाची राहिलेली दिसत नाही. त्यातून मग ' धन्यवाद ' मानतो ' / ' मानते ' यासारखे शब्दप्रयोग रूढ होतात. आभार मानले जातात आणि धन्यवाद दिले जातात हे लक्षात घेतले जात नाही.

आपल्याकडे दूरचित्रवाणीचा झपाट्याने विस्तार होत असताना एका मान्यवरांनी असे लिहिले होते की , पाश्चात्य देशात ' मुद्रण संस्कृती ' रुजल्यानंतर तेथे टेलिव्हिजन आला.आपल्याकडे मुद्रण संस्कृती रुजण्यापूर्वीच टेलिव्हिजन आला आणि विस्तारत असून त्याचे काही दुष्परिणाम संभवतात.भाषेच्या बाबतीत हे दुष्परिणाम आपण आता अनुभवत आहोत.

मुद्रीत माध्यम हे शब्दप्रधान आहे. नभोवाणीचे माध्यम शब्दच आहे. टेलिव्हिजनचे माध्यम कॅमेरा आहे. लिहिले जाणारे शब्द आणि टिपले जाणारे दृश्य यात अंतर असणार हे उघड असले तरी ते माध्यमांचा परस्परांवर परिणाम होऊ नये म्हणून आवर्जून लक्षात घेणे फार आवश्यक आहे. क्रिकेटच्या सामन्याचे दूरचित्रवाणीवरून होणारे थेट प्रक्षेपण , नभोवाणीवरून त्याच सामन्याचे प्रसारित होणारे धावते वर्णन आणि त्याच सामन्याचा दुसऱ्या दिवशी प्रसारित होणारा वृत्तांत यात फरक असणे स्वाभाविक आहे.असाच फरक या तीन माध्यमातून येणाऱ्या अन्य बाबींबद्दल असायला हवा. बोलण्याची भाषा आणि लिहिण्याची भाषा यात असणाऱ्या फरकाची जाणीव ठेवणे ही प्राथमिक गरज आहे.आपल्याकडे जेव्हा एखाद्या महत्वाच्या घडामोडीचे तपशील दूरचित्रवाणी वाहिन्यांवर दाखवले जातात तेव्हा कॅमेरा त्याचे दृश्य टिपण्याचे काम त्याच्या यांत्रिक क्षमतेने आणि वेगाने करीत आहे  , मानवी तोंडातून निघणारे शब्द त्याच्याशी स्पर्धा करू शकत नाहीत याचा निवेदकांना / बातमीदारांना विसर पडलेला दिसतो.  वर्तमानपत्रातही हे घडत असल्याचे हल्ली अनुभवास येते.तपशिलाच्या पसाऱ्यात नेमकेपणा हरवून जातो.हा माध्यमांचा परस्परांवर होत असलेला परिणाम आहे.असाच परिणाम मांडणीतही होत असल्याचे अनुभवास येते. छोट्या पडद्यावर एकाच वेळी निवेदक / वार्ताहर दिसतो , त्यांचा ज्यांच्याशी संवाद सुरू असतो तेही दिसतात , जे काही दाखवले जात आहे , त्याच्याशी निगडीत शब्दांकन दिसत असते , ' स्क्रोल ' सुरू असतो , कोपऱ्यात तपमान वगैरे दिसत असते.हे सारे रंगीत असते. वर्तमानपत्रातही मांडणीत अनेकदा अशी गर्दी दिसते.तेथे पुरेसे अंतर राखणारी कोरी जागा अर्थपूर्ण ठरते याचा विसर पडत चाललेला आहे.

आपल्याकडे वाहिन्या बहुभाषक असणे अपरिहार्य आहे.त्याचेही भाषेवर दुष्परिणाम होत आहेत. हिंदीत ' खुलासा ' हा शब्द ज्या अर्थाने वापरला जातो , त्या अर्थाने तो मराठीत उपयोगात आणला जात नाही. पण हल्ली हा ' खुलासा ' मराठीत ऐकू येत असला तरी तो हिंदीतील आहे , हे लक्षात घ्यावे लागते ! अशी किती तरी उदाहरणे देता येतील. हल्ली लहान मुलं त्यांच्या संभाषणात खूप हिंदी शब्द वापरत असतात.त्याचा उगम ते पाहतात त्या ' कार्टुन शो ' मध्ये आहे. आपल्याकडील लग्नसमारंभातील मराठीपण जसे हळूहळू हरवत आहे , तसेच भाषेचेही होत आहे ! कौटुंबिक नात्यातील मराठी संबोधने बाजूला पडत असून भाऊजी या शब्दाची जागा जिजाजी , मेहुणा या शब्दाची जागा साला या शब्दांनी घेतली आहे.

एकेकाळी वर्तमानपत्रांनी परिभाषेत भर घातली.आता व्यवहारात रूढ झालेले मराठी शब्द बाजूला सारून तेथे इंग्रजी / हिंदी शब्दांचा उपयोग सुरू आहे , याचा पदोपदी अनुभव येतो. 

एकीकडे माध्यमातील नवी पिढी कार्यक्षम आणि तंत्रस्नेही असल्याचा अनुभव येत असतानाच त्यांचा मराठी शब्दसंग्रह मर्यादित होत असल्याचे जाणवते.याचे कारण या पिढीत मराठी साहित्याचे वाचन कमी झाले आहे , हे असावे. 

इंग्रजी माध्यमातून होणारे शिक्षण , बहुभाषक परिसरात संपर्कासाठी सहजपणे उपयोगात आणली जाणारी हिंदी , माध्यमांना आलेले तंत्रज्ञानप्रधान व्यवसायाचे रूप , उसंत न देणारी वाढती स्पर्धा या आणि अशा काही कारणांमुळे आजच्या माध्यमात दिसणारी भाषा विचित्र रूप धारण करीत आहे. माध्यमांचा समाजमनावर होणारा परिणाम लक्षात घेता माध्यमांकडून उपयोगात आणली जाणारी भाषा महत्वाची ठरते. ती निष्कारण कठीण , बोजड नको तशीच स्वतःचे अस्तित्व सहजपणे विसरणारीही नको.ती पुढे जाणारी , स्वागतशील हवी आणि तिचे नाते तिच्या मुळांशी हवे. 

राधाकृष्ण मुळी 

निवृत्त संचालक

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय



No comments:

Post a Comment

वृत्त क्र.  77 9 मराठी भाषेकडून राष्ट्राच्या सांस्कृतिक निर्माणाचे महान कार्य -प्रधानमंत्री नरेंद्र मोदी राजधानीत अखिल भारतीय मराठी साहित्य ...