Tuesday, January 24, 2017

राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त जागृती फेरीस
उत्स्फुर्त प्रतिसाद; स्पर्धांचे पारितोषिक वितरण संपन्न
             जिल्हाधिकारी काकाणी यांनी दिली मतदानाची प्रतिज्ञा
नांदेड दि. 25 :- भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार दरवर्षी 25 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा केला जातो. यानिमित्त आज जिल्हा निवडणूक कार्यालयाच्यावतीने जिल्हास्तरीय कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. तत्त्पुर्वी काढण्यात आलेल्या मतदार जागृती फेरीस उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांच्या हस्ते मतदार जागृती फेरीचे उद्घाटन करण्यात आले. सायन्स कॅालेजच्या पुरणमल लाहोटी सभागृहात जिल्हाधिकारी काकाणी यांच्या अध्यक्षतेखाली फेरीचा समारोप तसेच मतदार जागृती मोहिमेतील विविध स्पर्धांचे पारितोषिक वितरण संपन्न झाले. जिल्हाधिकारी काकाणी यांनी उपस्थितांना मतदानाबाबत प्रतिज्ञा दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणातून मतदार जागृती फेरीस सुरवात झाली. जिल्हाधिकारी काकाणी यांच्या हस्ते फेरी मार्गस्थ करण्यात आली. मनपा आयुक्त समीर उन्हाळे, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी पद्माकर केंद्रे, अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक संदिप डोईफोडे, निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी अंकुश पिनाटे, उपविभागीय अधिकारी प्रदीप कुलकर्णी, उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, तहसिलदार पी. के. ठाकूर यांच्यासह जिल्हा क्रिडा अधिकारी गंगालाल यादव आदींची उपस्थिती होती. या फेरीत विविध क्रीडा संघटनांचे पदाधिकारी, महाविद्यालय, शाळांचे विद्यार्थी आदींनी सहभाग घेतला. जिल्हाधिकारी कार्यालय, शिवाजी चौक, वजिराबाद चौक, शिवाजीनगर, महात्मा ज्योतीबा फुले पुतळा परिसर-आयटीआय चौक ते  सायन्स कॅालेज या मार्गावरून फेरी काढण्यात आली. सायन्स कॅालेजच्या पुरणमल लाहोटी सभागृहात फेरीचा समारोप झाला.
           
अध्यक्षीय भाषणात जिल्हाधिकारी काकाणी म्हणाले की, लोकशाही बळकट करण्यासाठी निवडणूक प्रक्रीया आणि त्यामधील मतदानाचे अनन्य साधारण महत्त्व आहे. अन्य शिक्षणाबरोबरच या मतदान प्रक्रियेत सहभागी होण्याबाबत लोकशिक्षण होणे महत्त्वाचे आहे. त्यादृष्टीने तरुणांचा या प्रक्रियेतील सहभाग महत्त्वपुर्ण राहणार आहे. तरुण मतदारांनी केवळ आपल्या मतदानाच्या अधिकारापुरता विचार न करता, अवती-भवतीच्या मतदानास पात्र नागरिकांना प्रोत्साहीत करणे आवश्यक आहे. तंत्रज्ज्ञानाच्या वापरामुळे मतदार म्हणून नोंदणी आणि अनुषांगीक माहिती सहज सुलभ उपलब्ध होते. त्यासाठी आपलं नांदेड हे ॲपही वापरता येऊ शकते. सोशल माध्यम, माहिती तंत्रज्ज्ञानाचा वापर लोकशाही बळकट करण्यासाठीच्या या मोहिमेतही करता येईल.
या समारोपाच्या समारंभात सुरवातीला दिपप्रज्वलन झाले. राणी लक्ष्मीबाई विद्यालयाच्या विद्यार्थींनीनी स्वागत गीत सादर केले. उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्री. पिनाटे यांनी प्रास्ताविक केले. नांदेड तहसील कार्यालयाने तयार केलेल्या मतदार जागृतीविषयक पुस्तिकेचेही मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन झाले. मतदार जागृती मोहिमेंतर्गत समाविष्ट श्री गुरुगोबिंदसिंघजी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची नाटीका प्रथम क्रमांकाची विजेते ठरली. या नाटीकेचेही सादरीकरण करण्यात आले. विविध मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांचा सत्कार तसेच नवमतदारांना मतदान ओळखपत्रांचेही वितरण करण्यात आले. तसेच मतदार जनजागृती मोहिमेतील चित्रकला, निबंध आदी स्पर्धांतील विजेत्यांना तसेच त्यांच्या परीक्षक आदींनाही सन्मानीत करण्यात आले.
मतदार जागृतीसाठी योगदान देणाऱ्या वृत्तपत्रांची निवड करण्यात आली आहे, त्यापैकी दैनिक उद्याचा मराठवाडाचे  उपसंपादक किरण कुलकर्णी यांना प्रशस्तीपत्रक प्रदान करण्यात आले. यावेळी प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. केंद्रे यांनी संसदीय लोकशाही प्रणालीतील मतदानाचे महत्त्व विशद केले. राजेश कुलकर्णी यांनी फेरीचे तसेच समारंभाचे सुत्रसंचालन केले. नायब तहसीलदार स्नेहलता स्वामी यांनी आभार मानले.
000000


No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...