शेतकऱ्यांना शेतमाल विक्रीसाठी
जागा उपलब्ध
व्हावी यासाठी प्रयत्नशील
-
पालकमंत्री अशोक चव्हाण
शेतकरी ते ग्राहक थेट विक्री अभियानाचे पालकमंत्री
अशोक चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन
नांदेड, (जिमाका), दि. 27 :-शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने उत्पादित केलेल्या शेतमालाला योग्य भाव मिळावा यासाठी महाराष्ट्र शासनाच्या विकेल ते पिकेल धोरणाअंतर्गत संत शिरोमणी सावता माळी रयत बाजार अभियान हे अत्यंत दिशादर्शक आहे. ज्याची मागणी आहे ते आपल्या शेतात पिकवून बाजारपेठेत त्या शेतमालाच्या विक्रीचे कसब शेतकऱ्यांनी अंगीकारल्यास निश्चितच अधिकचा लाभ होईल, असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केले.
प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून कृषी विभागाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात आयोजित करण्यात आलेल्या तीन दिवसीय रयत बाजाराचे उद्घाटन पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी आमदार अमर राजूरकर, आमदार मोहन अण्णा हंबर्डे, आमदार बालाजीराव कल्याणकर, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ मंगाराणी अंबुलगेकर, सभापती कृषी बाळासाहेब रावणगावकर,माजी आमदार हनुमंत पाटील बेटमोगरेकर,जिल्हाधिकारी डॉ. विपीन ईटनकर,मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर घुगे, यांच्यासह अधिकारी कर्मचारी शेतकरी ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात रयत बाजारासाठी जवळपास 60 स्टॉलची उभारणी करण्यात आली आहे.जिल्ह्यातील विविध तालुक्यातील यशस्वी शेतकऱ्यांची तसेच रयत बाजारात सहभागी शेतकऱ्यांचा यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात पालकमंत्री यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर जिल्ह्यातील विविध शेतकऱ्यांनी आपल्या शेतीत राबविलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांची यशोगाथेची पुस्तिकेचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विमोचन करण्यात आले.
यावेळी विविध स्टॉलला मान्यवरांनी भेटी देऊन शेतकऱ्याची आणि त्याच्या शेतमालाची आस्थेवाईकपणे पाहणी करून व चर्चा करून त्यांनी समाधान व्यक्त केले. या समारंभात जिल्ह्यातील अनेक शेतकरी बांधवांनी आपल्या शेतातील मालासह मोठ्या प्रमाणावर उपस्थिती नोंदवली. या शेतीमालाव्यतिरिक्त रेशीम उद्योग, मत्स्यव्यवसाय, गांडूळ खत, महिला बचत गट यांच्यामार्फत उत्पादीत उत्पादने मोठ्या प्रमाणावर ठेवण्यात आली आहेत. तसेच फळे, भाजीपाला विविध प्रकारचे धान्य, डाळी, मध, गूळ, ओल्या भुईमूग शेंगा, रसवंती असे अनेक शेती उत्पादने त्याचबरोबर सफेद मूसळी, ड्रॅगन फ्रुट, स्ट्रॉबेरी, अशी नाविन्यपूर्ण उत्पादने विक्रीसाठी उपलब्ध आहेत.
या उपक्रमास अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला असून मोठ्या प्रमाणावर या सर्व शेतीमालाची विक्री झाली. ग्राहकांना ताजा माल मिळाला आणि थेट विक्रीमुळे शेतकऱ्यांनासुद्धा अधिकचा दर मिळून फायदा झाला.
हा उपक्रम या पुढेही दिनांक
29 जानेवारीपर्यंत हा बाजार जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात सुरू राहणार असल्याची
माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवीशंकर चलवदे यांनी सांगितले. या उपक्रमाला आमदार
माधवराव पाटील जवळगावकर, आमदार राजेश पवार, सौ. पवार यांनीही भेट दिली.
0000
No comments:
Post a Comment