Monday, October 7, 2024

 वृत्त क्र. 910

निवडणूक विषयक सोपविलेली कामे गांभीर्याने करा : जिल्हाधिकारी


75 टक्के मतदानाचे उदिष्ट ; स्वीपच्या माध्यमातून जनजागृती

निवडणूक कामकाज व प्रशिक्षणात हलगर्जी केल्यास कारवाई


नांदेड दि. 7 ऑक्टोबर : विधानसभा निवडणूक 2024 कामकाजासाठी विविध कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. या कक्षात नोडल अधिकारी व कर्मचारी यांना निवडणूक कामासाठी नियुक्त्या करण्यात आल्या असून नियुक्त अधिकारी -कर्मचारी यांनी निवडणूक विषयक सोपविलेली कामे गांभीर्याने पार पाडावीत, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिजीत राऊत यांनी दिले.

आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरातील नियोजन भवनात विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 विषयक अधिकारी-कर्मचारी यांचे प्रशिक्षण आयोजित केले होते. यावेळी ते बोलत होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर, उपजिल्हाधिकारी राजकुमार माने, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, नियुक्त नोडल अधिकारी, कर्मचारी आदीची उपस्थिती होती.

विधानसभा निवडणूक 2024 कार्यक्रमाच्या अनुषंगाने स्वीपच्या माध्यमातून जास्तीत जास्त मतदानाची टक्केवारी वाढविण्याच्या दृष्टीने उदिष्ट पूर्ण करणे आवश्यक असून यासाठी सर्वानी प्रयत्न करावेत ,असे निर्देश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिले. तसेच निवडणूक कालावधीत पोलीस, वस्तु व सेवा कर विभाग, आयकर विभाग, एसएसटी व एफएसटी पथकांनी निवडणूक कालावधीत करण्यात येणाऱ्या कारवायाबाबत सर्वांनी मिळून काम करावे असेही त्यांनी यावेळी सांगितले. निवडणूक विषयक कामकाजात प्रत्येक अधिकारी कर्मचारी यांनी नेमून दिलेली कामे गांभीर्याने करावीत तसेच प्रशिक्षणास गैरहजर राहणाऱ्यांची गंभीर दखल घेण्यात येईल असेही निर्देश त्यांनी दिले.

यावेळी अपर जिल्हाधिकारी पाडुरंग बोरगावकर यांनी विधानसभा निवडणूक 2024 बाबत निर्गमित आदेशात नमूद अधिकारी-कर्मचारी यांनी पार पाडावयाच्या जबाबदाऱ्यांची माहिती यावेळी दिली. तसेच स्वीप, प्रशिक्षण, निवडणूक कालावधीत कायदा व सुव्यवस्था, मतदार यादीत नाव नोंदविणे, नाव काढणे, अवैध दारु वाटप नियंत्रण, ईव्हीएम कक्षाचे कामकाज, निवडणूक कामासाठी अधिकारी-कर्मचारी निवड करणे, टपाली मतदान, एसएसटी व एफएसटी पथकाला प्रशिक्षण घेणे याबाबतच्या कामाचा आढावा त्यांनी यावेळी घेतला.

निवडणूक विभागाचे उपजिल्हाधिकारी राजकुमार माने यांनी निवडणूक आदेशाप्रमाणे करावयाच्या कार्यवाहीबाबत सविस्तर माहिती दिली.
00000



No comments:

Post a Comment

वृत्त क्र.   पालकमंत्री अतुल सावे यांचा नांदेड दौरा   नांदेड दि. 24 जानेवारी :- राज्याचे इतर मागास बहूजन कल्याण , दूग्धविकास , अपारंपारि...