Thursday, September 2, 2021

 

जिल्ह्यातील सर्व गणेश मंडळांनी कोरोना लसीकरण शिबीरासाठी पुढाकार घ्यावा  

-         जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर 

नांदेड (जिमाका), दि. 2 :-  कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर उद्भवलेल्या परिस्थितीचा विचार करुन याही वर्षी गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याबाबतचे निर्देश राज्य शासनाने दिले आहेत. या मार्गदर्शक तत्वानुसार नांदेड जिल्ह्यातील सर्व गणेश मंडळांना कोरोना लसीकरण शिबीर, मलेरीया, डेंग्यू आदी साथीच्या आजारांबाबत जनजागृती सारखे उपक्रम राबविण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले. गणेशोत्सवासंदर्भात आज त्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात शांतता समितीची बैठक संपन्न झाली. या बैठकीत आमदार राजेश पवार, निवासी उपजिल्हाधिकारी प्रदिप कुलकर्णी, अप्पर पोलीस अधिक्षक निलेश मोरे, उपविभागीय अधिकारी माने, तहसिलदार किरण अंबेकर, नायब तहसिलदार राजेश लांडगे आदी उपस्थित होते. 

जिल्ह्यातील सर्व तालुकापातळीवर आणि नांदेड महानगरपालिका क्षेत्रासाठी लसीकरण आयोजित करण्यासाठी संबंधित यंत्रणांना या बैठकीत निर्देश देण्यात आले. यात नांदेड महानगरपालिका क्षेत्रासाठी मनपा आरोग्य विभाग, संबंधित विभागातील पोलीस निरीक्षक, महानगरपालिका इतर विभाग यांच्या मार्फत सर्व गणेश मंडळांच्या यादीनुसार मोठ्या गणेश मंडळाने 18 वर्षावरील किमान 1 हजार 100 नागरीकांच्या लसीकरणासाठी पुढाकार घेण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. यासाठी आवश्यक ते सहकार्य मनपा करेल. नगरपालिका क्षेत्रात संबंधित उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, नगरपरिषद मुख्याधिकारी, संबंधित पोलीस निरीक्षक हे त्यांच्या कार्यक्षेत्रात गणेश मंडळांना लसीरकण शिबिरासाठी मदत करतील. ग्रामीण क्षेत्रासाठी संबंधित  तहसिलदार, गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र येथील वैद्यकिय अधिकारी, पोलीस पाटील यांच्यामार्फत गणेश मंडळांना लसीकरण शिबिरासाठी योग्य ते सहाय्य केले जाईल. जिल्हा आरोग्य अधिकारी हे लस उपलब्धतेबाबत मागणी प्रमाणे नियोजन करतील. तर मनपा उपायुक्त, जिल्हा प्रशासन अधिकारी (नगरपालिका प्रशासन) व उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) यांच्यामार्फत लसीकरण शिबिराचा आढावा व त्यासाठी आवश्यक ते सहकार्य करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी स्पष्ट केले. 

समाजाला उपयोगी असलेल्या उपक्रमांचे आयोजन करण्याचा वारसा महाराष्ट्राला गणेशोत्सवाने दिलेला आहे. कोविड-19 सारख्या आव्हानात्मक काळात जिल्ह्यातील विविध गणेश मंडळे गतवर्षी प्रमाणे याही वर्षी गणेशोत्सव  हा दिलेल्या नियमानुसार, निर्देशानुसार सुचनांचे काटेकोर पालन करुन लसीकरणासाठी पुढाकार घेतील, अशा विश्वास जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी व्यक्त केला.

00000




No comments:

Post a Comment

वृत्त क्र.   93 दहावी परीक्षेच्या ऑनलाईन प्रवेशपत्राबाबत सूचना   नांदेड दि. 23 जानेवारी :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्ष...