Wednesday, September 13, 2017

निवडणूक आचारसंहितेची
प्रभावी अंमलबजावणी करावी
                              - राज्य निवडणूक आयुक्त सहारिया
           मतदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी व्यापक प्रमाणात जनजागृती करावी
नांदेड दि. 13 :- ग्रामपंचायत व नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या निवडणुका निर्भय, मुक्त व पारदर्शक वातावरणात पार पाडणेसाठी निवडणूक आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी करावी. तसेच मतदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी व्यापक प्रमाणात जनजागृती करावी, असे आदेश राज्य निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया यांनी आज येथे दिले.

नांदेड येथील जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणातील डॉ. शंकरराव चव्हाण नियोजन भवन सभागृहात ग्रामपंचायत व नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका निवडणूक संदर्भात आढावा बैठक राज्य निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी राज्य निवडणूक आयोगाचे सचिव शेखर चन्ने, जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मिना, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे, मनपा आयुक्त गणेश देशमुख, अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
राज्य निवडणूक आयोगाने ग्रामपंचायत व नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यामुळे आदर्श आचारसंहिता लागू झाल्याने त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यावर अधिकाऱ्यांनी भर द्यावा, असा सक्त सुचना देण्यात आलेल्या आहेत. या निवडणुका संदर्भात आयोगाने दिलेल्या सूचना नुसार कार्यवाही करावी. निवडणूक संदर्भातील कामात निष्काळजीपणा व कुचराई करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यावर कठोर कारवाई केली जाईल, असेही श्री. सहारिया यांनी सांगितले.
          कायदा व सुव्यवस्थेसंबंधी आढावा घेताना वस्तू अथवा पैसाच्या स्वरुपातील प्रलोभनाला आळा घालणे, अवैध दारु वाहतुकीवर व वाटपावर नजर ठेवणे, असे सांगून श्री. सहारिया म्हणाले की मतदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी व्यापक प्रमाणात मतदार जागृती मोहिम हाती घ्यावी. थेट सरपंच पदासाठी पहिल्यांदा मतदान होत आहे. बहुसदस्यीय पद्धतीनुसार आवश्यक तेवढे मते देणे याबाबत देखील मतदार जागृती करण्यात यावी. दिव्यांग मतदारांना मतदान करता यावे यासाठी व्हीलचेअर, रॅमची व्यवस्था करणे, मतदान केंद्रे सर्व सुविधेने अद्यावत व अधुनिक असावेत. लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पद्धतीनेच या निवडणुकीची प्रक्रिया राबविण्यावर भर दिला पाहिजे, अशा सूचनाही श्री. सहारिया यांनी यावेळी दिल्या.  
यावेळी राज्य निवडणूक आयोगाचे सचिव शेखर चन्ने म्हणाले की, निवडणुकीशी संबंधीत यंत्रणांनी अधिक सतर्क राहून निवडणुका निर्भय वातावरणात पार पाडाव्यात. मतदार जागृती बरोबर मतदारांना व्होटर स्लीपचे वाटप करावे. निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना ऑनलाईन अर्ज भरावयाचे असल्याने त्यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करुन दयाव्यात. सिंगल विंडो सिस्टीम सुरु करुन उमेदवारांना आवश्यक परवानगी देण्यात याव्यात. यासारख्या विविध सुचना त्यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुका संदर्भातील माहिती देतांना मतदान केंद्रे निश्चित केले आहे, मतदान यंत्रेही पुरेसे आहेत, निवडणुकीसाठी अधिकारी, कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अवैध मद्यविक्री व मद्यवाहतुकीस आळा घालण्यासाठी उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत. मतदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी मतदान जनजागृती करण्यात येत आहे. ग्रामपंचायती निवडणुका निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन कटीबद्ध आहे, असेही त्यांनी सांगितले. तर मनपा आयुक्त गणेश देशमुख यांनी नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका निवडणुक संदर्भात माहिती  दिली. पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मिना यांनी निवडणूक विषयी आपल्या विभागाची माहिती दिली.
प्रारंभी उपजिल्हा निवडणूक अधिकारी सौ. अनुराधा ढालकरी यांनी प्रास्ताविक केले तर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे यांनी आभार मानले.
या बैठकीस ग्रामपंचायत व नांदेड वाघाळा शहर महापालिकेचे निवडणुक निर्णय अधिकारी, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, निवडणूक निरीक्षक, उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, राज्य उत्पादन शुल्क, बॅक, आयकर विभाग, पोलीस, वस्तु व सेवाकर विभाग, महावितरण आदी विभागांचे अधिकारी उपस्थित होते.  

000000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...