Friday, October 17, 2025

वृत्त क्रमांक  1111

“हिंद-की-चादर” श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या  350 व्या शहीदी समागम वर्षानिमित्त नांदेड येथे होणाऱ्या कार्यक्रमाचा आढावा 

16 नोव्हेंबर रोजी नांदेड येथे भव्य कार्यक्रमाचे आयोजन  

जिल्हा प्रशासन आणि क्षेत्रीय समितीच्या  समन्वयातून कार्यक्रमाचे होणार यशस्वी आयोजन : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

नांदेड, दि. 17 ऑक्टोबर :- “हिंद-की-चादर” श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या 350 व्या शहीदी समागम वर्षानिमित्त येत्या 16 नोव्हेंबर रोजी नांदेड येथे भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. त्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने  जिल्हा प्रशासन व क्षेत्रीय समितीच्या समन्वयाने कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनावर भर देण्यात येणार असल्याचे  जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी सांगितले. आज जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे आढावा बैठक संपन्न झाली यावेळी ते बोलत होते. 

बैठकीस मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी रामेश्वर नाईक, पोलीस अधिक्षक अबिनाश कुमार, निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर, अतिरिक्त पोलीस अधिक्षक सुरज गुरव, मनपाचे अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम, गुरुद्वारा बोर्डाचे अधीक्षक हरजितसिंग कडेवाले, कार्याध्यक्ष सरजित सिंग गील, क्षेत्रीय आयोजन समितीचे अध्यक्ष व सचिव, विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी आदीची उपस्थिती होती.

नांदेड येथील या कार्यक्रमासाठी छत्रपती संभाजीनगर, नांदेड, परभणी, जालना, लातूर, धाराशीव, हिंगोली, बीड, नंदुरबार, धुळे, जळगाव या जिल्ह्यातील भाविकांचा समावेश राहणार आहे. या जिल्ह्यातून श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या शहीदी समागम वर्षानिमित्त नांदेड शहरात सुमारे 3 ते पाच लाख भाविक उपस्थित राहण्याची शक्यता आहे. येणाऱ्या भाविकांची कोणत्याही प्रकारच्या गैरसोय होवू नये तसेच योग्य नियोजनाप्रमाणे कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन व्हावे यासाठी विविध समित्या स्थापन केल्या आहेत. या समित्यांच्या नोडल अधिकाऱ्यांनी त्यांना सोपविलेली जबाबदारी योग्यरितीने पार पाडावी, याबाबत वारंवार आढावा घेण्यात येईल अशी माहिती रामेश्वर नाईक यांनी दिली. तसेच त्यांनी कार्यक्रमाच्या अनुषंगाने निर्गमित आदेशानुसार करण्यात येणाऱ्या तयारीच्या कामाचा आढावा घेतला.

या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजन व व्यवस्थापनासाठी अप्पर जिल्हाधिकारी पी. एस. बोरगावकर यांच्या संनियंत्रणात शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या समित्या गठीत करण्यात आल्या आहेत. यात जागरण व्यवस्थापन समिती, मैदान व्यवस्थापन समिती, मंडप व्यवस्थापन समिती, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थापन समिती, सुरक्षा व्यवस्थापन समिती, स्वयंसेवक व्यवस्थापन समिती, अतिथी स्वागत व्यवस्थापन समिती, लंगर,भोजन व्यवस्थापन समिती, स्वच्छता व्यवस्थापन समिती, वैद्यकिय सेवा व्यवस्थापन समिती, विद्युत आणि ध्वनी व्यवस्थापन समिती, प्रसिद्धी व मीडिया व्यवस्थापन समिती, कार्यक्रम सादरीकरण व्यवस्थापन समिती, ध्वज व सजावट व्यवस्थापन समिती, आर्थिक व्यवस्थापन समिती, शासकीय परवानगी व्यवस्थापन समिती, जुताघर व्यवस्थापन समिती, जल आपूर्ती व्यवस्थापन समिती, महिला सेवा व्यवस्थापन समिती, ज्येष्ठ नागरिक मार्गदर्शन समिती, जिल्हा समन्वय समिती, स्वरुपा व्यवस्थापन समिती, सुरक्षा आणि तपासणी व्यवस्थापन समिती, निवास व्यवस्थापन समिती, राखीव आदी समित्यांच्या यात समावेश आहे.

मुख्य सचिव राजेश कुमार यांनी व्हीसीद्वारे घेतला कार्यक्रमाच्या पूर्व तयारीचा  आढावा

आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात राज्याचे मुख्य सचिव राजेश कुमार यांनी नांदेड, नागपूर, नवी मुंबई, जि. ठाणे येथे “हिंद-की-चादर” श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या 350 व्या शहीदी समागम वर्षानिमित्त होणाऱ्या कार्यक्रमाचा व्हीसीद्वारे आढावा घेतला. यावेळी त्यांनी नांदेड येथे 16 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या भव्य कार्यक्रमाची पार्श्वभूमी व आढावा जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्याकडून घेतला. यावेळी त्यांनी या कार्यक्रमाच्या अनुषंगाने असलेले प्रस्ताव तात्काळ सादर करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला दिल्या. 

या कार्यक्रमाच्या अनुषंगाने नांदेड येथे विविध मान्यवरांची उपस्थिती राहणार असून यादृष्टीने योग्य नियोजन करण्याच्या सूचनाही मुख्य सचिव राजेश कुमार यांनी दिल्या. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर, गुरुद्वारा सचखंड बोर्डाचे प्रशासक डॉ. विजय सतबीर सिंघ, कार्याध्यक्ष सरजीत सिंघ गील, तसेच विविध विभागाचे  वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

00000










No comments:

Post a Comment

वृत्त क्रमांक 1277   जिल्हा माहिती कार्यालयातील रद्दी विक्रीसाठी उपलब्ध   नांदेड (जिमाका) ,  दि .   5 :-   जिल्हा माहिती कार्यालय ,   नांदे...