Saturday, April 29, 2017

महाराष्ट्र दिनी मुंबईतील ट्रान्सफॉर्म महाराष्ट्रमध्ये
एसजीजीएसचे 100 विद्यार्थी सहभागी होणार
नांदेड, दि. 29 :- यंदाचा 58 वा महाराष्ट्र दिन ट्रान्सफॉर्म महाराष्ट्रदिवस म्हणूनही साजरा करण्यात येणार आहे. महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याच्या आर्थिक, शैक्षणिक, सामाजिक विकासात योगदान देणाऱ्या युवा पिढीशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमामध्ये नांदेड येथील श्रीगुरुगोबिंद सिंघजी अभियांत्रीकी व तंत्रशास्त्र संस्था विष्णुपुरी (एसजीजीएस) मधील शंभर विद्यार्थ्यांना आमंत्रित केले गेले आहे. ही बाब नांदेडसाठी आणि आमच्या संस्थेसाठी अभिमानास्पद असल्याची प्रतिक्रीया संस्थेचे संचालक डॅा. एल. एम. वाघमारे यांनी व्यक्त केली आहे.
राज्याच्या विकासाबाबत आजच्या युवकांच्या कल्पना जाणून घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून साकारलेल्या कार्यक्रमाचा समारोप सोहळा वरळी येथील एनएससीआय येथे होणार आहे. या कार्यक्रमासाठी राज्यातील जवळपास आठ हजार युवक सहभागी होणार असून आपल्या ट्रान्सफॉर्म महाराष्ट्राबाबतच्या संकल्पना सादर करणार आहेत. या कार्यक्रमाला रतन टाटा, मेजर जनरल अनुज माथुर, अक्षय कुमार यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
आपल्या देशाची खरी संपदा असलेल्या तरूणाईशी, विविध क्षेत्रातील मान्यवर तज्ज्ञांशी महाराष्ट्र दिनी राज्यापुढील महत्त्वाच्या समस्यांवर चिंतन करण्याचे त्यातून समस्यांची उकल करण्याचे आणि त्यावर उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी ट्रान्सफॉर्म महाराष्ट्र हा उपक्रम हाती घेतला आहे, असे मुख्यमंत्र्यांच्या विशेष कार्य अधिकारी निधी कामदार यांनी सांगितले.
ट्रान्सफॉर्म महाराष्ट्रसाठी डिसेंबर महिन्यात राज्यस्तरीय स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेसाठी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकडून महाराष्ट्रातील 11 सामाजिक-आर्थिक क्षेत्रातील बदल घडविण्यासाठी युवकांनी आपल्या संकल्पना/उपाय सादर कराव्यात, असे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार राज्यभरातील जवळपास 11,500 विद्यार्थ्यांकडून 2500 प्रवेश आले. तर तब्बल 6 लाख विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. आता महाराष्ट्र दिनी आयोजित कार्यक्रमात प्रत्येक क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट संकल्पना सादर करणाऱ्या युवकांना सादरीकरण करण्याची संधी मिळणार आहे.
ट्रान्सफॉर्म महाराष्ट्रमध्ये एनोव्हेशन एक्झिबिशन
ट्रान्सफॉर्म महाराष्ट्र कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये कॅप्टन अमोल यादव यांनी साकारलेले स्वदेशी विमान एनोव्हेशन एक्झिबिशनमध्ये असणार आहे. शिवाय वेगवेगळ्या युवकांनी केलेले इनोव्हेशनही या एक्झिबिशनमध्ये पहायला मिळतील. याबरोबरच पर्यटन, कौशल्य विकास, सांस्कृतिक कार्य, गृह, शिक्षण, माहिती व जनसंपर्क, समृद्धी महामार्ग, एमएमआरडीए-मेट्रो रेल, महाराष्ट्र ट्रान्स हार्बर लिंक, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ-स्टार्ट अप योजना, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, कृषी, पाणीपुरवठा आणि स्वच्छता असे विभाग सहभागी होण्याबरोबरच महाराष्ट्र विकासासंबंधित बुथ, स्टॉल्स, प्रदर्शने मांडणार आहेत. आजच्या युवकांनी राज्याच्या विकासाच्या केलेल्या प्रारुपाचाही या प्रदर्शनामध्ये समावेश असणार आहे.
ट्रान्सफॉर्म महाराष्ट्रमध्ये सहभागी होणारीएसजीजीएस-नांदेडची टीम
टीम H20 - रोहित जंगले, उज्वदीप पाटील, मयूर पाटील, शिवरंजनी कदम, पराग नगराळे, ज्ञानेश्वर काळे या विद्यार्थ्यांच्या दुष्काळावर मात करण्यासाठीच्या संकल्पनेला तिसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक मिळाले आहे. त्यांना प्रा. मिलिंद वाईकर, प्रा. मिलिंद राजूरकर यांनी मार्गदर्शन केले.
टीम सूर्या- अजिंक्य धारिया, शिवानी सानितीकर, शांतनू बदमोरे, ऐश्वर्या कुलकर्णी, करिष्मा इस्मयील या विद्यार्थ्यांच्या दुष्काळावर मात करण्यासाठीच्या संकल्पनेला चौथ्या क्रमांकाचे पारितोषिक मिळाले आहे. त्यांना प्रा. माणिक रोडगे, प्रा. डी. एस. मेहता व प्रा. विनोद तुन्गीकर यांनी मार्गदर्शन केले.
टीम परिवर्तन- सागर उज्जैनकर वैभव पाटेवार, धनश्री घुगे, सुप्रतिक देशपांडे, सिद्धेश्वर रेवतकर, मयुरी लकशेटे या विद्यार्थ्यांच्या "भविष्याची गरज ओळखून ग्रामीण शिक्षणातील आवश्यक बदल" या संकल्पनेला चौथ्या क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. त्यांना प्रा. अरुण पाटील यांनी मार्गदर्शन केले.
ट्रान्सफॉर्म महाराष्ट्रची काही वैशिष्ट्ये
  • राज्याच्या विकासासंबंधित संकल्पना जाणून घेण्यासाठी ट्रान्सफॉर्म महाराष्ट्र अभियान
  • गेल्या 26 डिसेंबर 2016 रोजी या अभियानाची सुरुवात
  • 1 मे रोजीच्या कार्यक्रमात आठ हजाराहून अधिक युवक सहभागी होणार
  • 6 लाखांहून अधिक ऑनलाईन व्होटर्सनी ट्रान्सफॉर्म महाराष्ट्र अभियानात सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली.
ट्रान्सफॉर्म महाराष्ट्रमधील नाविन्यपूर्ण प्रदर्शन NSCI वरळी येथे जनतेसाठी सकाळी 9 पासून खुले असणार असून अधिकाधिक नागरिकांनी तेथे भेट द्यावी, असे आवाहन मुख्यमंत्र्यांच्या विशेष कार्य अधिकारी निधी कामदार यांनी केले आहे.

000000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...