Saturday, April 29, 2017

जनतेचे जीवनमान उंचाविण्यासाठी योजनांची
प्रभावी अंमलबजावणी करा - जिल्हाधिकारी डोंगरे
मनरेगा, जलयुक्त, पाणीटंचाई उपायांबाबत सर्वंकष आढावा
नांदेड दि. 29 :- विकासाच्या योजना या थेट नागरिकांच्या जीवनाशी निगडीत असतात. त्यामागे मोठा विचार-धोरण असते. त्यामुळे जिल्ह्यातील जनतेचे जीवनमान उंचाविण्यासाठी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करा, असे निर्देश जिल्हाधिकारी अरूण डोंगरे यांनी आज येथे दिले. जिल्ह्यातील मनरेगा अंतर्गत समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण योजना, जलयुक्त शिवार अभियानातील कामांचा तसेच पाणी टंचाईवरील उपाय योजनांचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून जिल्हाधिकारी डोंगरे बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणातील डॅा. शंकरराव चव्हाण नियोजन भवनातील कॅबिनेट सभागृहात बैठक संपन्न झाली. बैठकीत योजनांमधील विविध बाबी, टंचाई उपाययोजनांचा जिल्हाधिकारी डोंगरे यांनी तपशीलवार व सर्वंकष आढावा घेतला.
बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे, सहायक जिल्हाधिकारी तथा किनवट एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी डॅा. राजेंद्र भारूड, अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी अंकुश पिनाटे, जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष वेणीकर, उपजिल्हाधिकारी बी. एम. कांबळे, लघू सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता व्ही. पी. शाहू तसेच सर्व उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, मनरेगांतर्गत सहायक प्रकल्प अधिकारी आदींची उपस्थिती होती.  
बैठकीत मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी डोंगरे म्हणाले की, एखाद्या गावात होणाऱ्या विकास कामाच्या मागे अनेक यंत्रणांच्या समन्वय महत्त्वाचा ठरतो. विकासाच्या योजना या जनतेच्या जीवनावर प्रभाव टाकणाऱ्या असतात. त्या राबविण्यामागे विचार तसेच धोरण असते. त्यातून नागरिकांचे जीवनमान उंचवावे, अशी अपेक्षा असते. त्यामुळे विविध यंत्रणांनी समन्वय राखला तरच अशा योजना लोकांपर्यंत पोहचतात, यशस्वी होतात. त्यामुळे महसूल असो वा अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांशी संबंधित यंत्रणा, या सर्वांनी समन्वयाने प्रयत्न करणे महत्त्वाचे ठरते. योजनांच्या अंमलबजावणीत अनेक घटकाचे योगदान महत्त्वाचे असते. त्यामुळे या घटकांना दीशा देण्यासाठी, योग्यवेळी योग्य नेतृत्त्व देण्याचे प्रयत्नही अधिकाऱ्यांनी करावेत, असेही त्यांनी सांगितले.
बैठकीत समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण योजनेतील विविध स्वरुपांची कामे, त्यांचे प्रस्ताव ग्रामसभेतून निवडणे, तांत्रिक मान्यता, प्रशासकीय मान्यता आणि वेळेत कामे पुर्ण करण्याबाबतही निर्देश देण्यात आले. जलयुक्त शिवार अभियानातील गावांचा समावेश आणि करण्यात आलेल्या कामांचा तालुकानिहाय आढावा घेण्यात आला. पाणीटंचाई उपाय योजना आणि त्यातील विविध मुद्यांवर सविस्तर आढावा घेण्यात आला. यावेळी झालेल्या चर्चेत मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. शिनगारे, अप्पर जिल्हाधिकारी श्री. पाटील, उपजिल्हाधिकारी श्री. कांबळे तसेच उपस्थित उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, गटविकास अधिकारी यांनी सहभाग घेतला.

000000

No comments:

Post a Comment

 लक्षवेध :नांदेड जिल्ह्यातील विधानसभा निहाय मतदानाची अंदाजीत अंतिम आकडेवारी लक्षवेध : नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीतील अंदाजीत अंतिम आकडेवारी वि...