Thursday, September 29, 2022

 ते ही आपल्यातलेच आहेत या संवेदनेने

किन्नरांना समाजात सामावून घेण्याची गरज

- कुलगुरू डॉ. उद्धव भोसले

·       मिशन गौरी लघूपटाद्वारे युवकांमध्ये जाणीव जागृती

·       विद्यापीठातील सामाजिक शास्त्रे संकुलात गौरीने साधला संवाद   

नांदेड (जिमाका) दि. 29 :- अत्यंत आव्हानात्मक परिस्थितीत आपल्यातलाच एक घटक जीवन जगण्यासाठी संघर्ष करतो. या घटकाला अर्थात किन्नरांना आपण सार्वजनिक ठिकाणी कधी सहानभूती तर कधी हेटाळणीही करतो. माणुस म्हणून त्यांचा जगणाचा अधिकार व घटनेने त्यांना आपल्यासारखेच मिळालेले अधिकार याचा आपण आदर करून त्यांनाही आपल्या प्रवाहात सामावून घेतले पाहिजे, असे अग्रही प्रतिपादन स्वामी रामानंद तीर्थ विद्यापिठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांनी केले. या विद्यापिठाअंतर्गत किन्नरांना उच्च शिक्षणासाठी ज्या काही सुविधा लागतील त्या आम्ही आनंदाने उपलब्ध करून देऊ असेही त्यांनी अश्वासीत केले.

 

जिल्हा माहिती कार्यालय नांदेड यांच्यावतीने निर्मिती करण्यात आलेल्या मिशन गौरी या किन्नरांच्या विकास प्रवाहावर आधारित लघुपटाच्या सामुहिक अवलोकनानंतर ते बोलत होते. यावेळी  प्र. कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन, जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार, सामाजिक न्याय विभागाचे सहाय्यक आयुक्त तेजस माळवदकर, संचालक प्रा. घनशाम येळणे, उद्योजक भानुदास पेंडकर, प्रा. गोणारकर, प्रा. सुहास पाठक, डॉ. शालिनी कदम, डॉ. स्मिता नायर, डॉ. सुलोचना जाधव, प्रा. लोणारकर, प्रा. बोधगिरे, प्रा. बाबुराव जाधव व संकुलातील विद्यार्थी व प्राध्यापक वर्ग उपस्थित होते.

 

किन्नरांच्या जवळ समाज कधी जायला पाहत नाही. यामुळे त्यांच्या वेदनेचा, कष्टाचा, रोजच्या जगण्यातील आव्हानाचा आवाका सर्वसामान्यापर्यंत पोहचत नाही. ते सुद्धा आपल्यातलेच आहेत, त्यांनाही आपल्या सारखाच जगण्याचा अधिकार आहे, हे समाजापर्यंत बिंबवणे आवश्यक आहे. त्यांच्याप्रती असलेला संवेदनेचा धागा जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार यांनी मिशन गौरी या लघुपटामार्फत अत्यंत कुशलतेने हाताळल्याचे गौरउद्गार कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांनी काढले.   

 

एका बाजुला जगातील सर्वच विचारवंत विविध विषयावर आपली वैचारिक मांडणी करत आहेत. या मांडणीत शाश्वत विकास आणि पर्यावरणावर अधिक भर आपण पाहतो. पर्यावरणाचा जितका गांभीर्याने विचार करतो तेवढा समाजातील समतोल पर्यावरणाबाबतही आपण तेवढेच आग्रही असल्याचे प्रतिपादन प्र. कुलगुरू डॉ. जोगेंद्र सिंह बिसेन यांनी केले. सामाजिक पर्यावरणात किन्नरांच्या जगण्याच्या हक्कासह असे अनेक विषय आपण संवेदनेने जपले पाहिजे, असे त्यांनी सांगितले. यावेळी सामाजिक न्याय विभागाचे सहाय्यक आयुक्त तेजस माळवदकर, गौरी बकश, सेजल बकश यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तर दिली. कार्यक्रमाचे संचलन संचालक प्रा. घनशाम येळणे यांनी केले.

00000    








No comments:

Post a Comment

  ​   वृत्त क्र. 88 राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे नांदेड विमानतळावर आगमन  दीक्षांत समारंभासाठी परभणीकडे प्रस्थान नांदेड दि. २३ जानेवारी :...