Friday, September 2, 2016

तांडा विकासासाठी, रोजगाराच्या स्थानिक संधी निर्माण
करण्यासाठी प्रयत्न – सार्वजनिक बांधकाम मंत्री शिंदे
शिकारातांडा येथे हृदय कार्यक्रमात शिंदे यांचा सत्कार
नांदेड, दि. 2 :- तांडा, वस्त्याचा विकास झाला पाहीजे. रस्ता, पाणी, वीज यासारख्या सुविधांसह रोजगाराच्या संधीही निर्माण व्हाव्यात यासाठी प्रयत्न केले जातील, असे राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे यांनी मुखेड तालुक्यातील शिकारातांडा येथे सांगितले. दुष्काळाच्या परिस्थितीत स्थलांतरित झालेल्या शिकारातांडावरील कुटुंबाना मंत्री श्री. शिंदे यांनी ठाणे येथे हिंदुहृदसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे दुष्काळग्रस्त छावणीत व्यवस्था केली होती. त्यांच्या निवासाची आणि रोजगाराची व्यवस्था केली होती. त्या कुटुंबाना श्री. शिंदे यांनी थेट शिकारातांडा येथे भेट देऊन, काही मुलांना शिष्यवृत्तीचेही वाटप केले. यामुळे शिकारातांडावरील या कुटुंबानी आपुलकीने श्री. शिंदे यांच्या स्वागताची मोठी तयारी केली. शिकारातांडाच्यावतीने श्री. शिंदे यांचा सत्कार करण्यात आला.
शिकारातांडा शिवारात झालेल्या या हृदय कार्यक्रमास खासदार राजन विचारे, आमदार डॅा. तुषार राठोड, जिल्हाधिकारी सुरेश काकाणी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पद्माकर केंद्रे, उपविभागीय अधिकारी प्रवीण धरमकर, शिवसेनेचे पदाधिकारी भुजंग पाटील, मिलिंद देशमुख, भगवान राठोड आदींचीही उपस्थिती होती.
सुरवातीला शिकारातांडा आणि जुन्ना ग्रामपंचायतीच्यावतीने श्री. शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. शिकारातांडाच्या सरपंच संगीताबाई इमरे, उपसरपंच रामेश्र्वर चिटगीरे, शिवाजी राठोड, उत्तम बनसोडे, वसंत संभुटवार आदींनी सत्कार केला.
याप्रसंगी बोलताना श्री. शिंदे म्हणाले की, दुष्काळी परिस्थितीतील दौऱ्यानंतर आता यावर्षी पुन्हा पाहणीसाठी दौरा करण्यात येत आहे. लोकसहभाग, प्रशासन, लोकप्रतिनिधी यांनी एकत्रित काम केले तर या भागाचा कायापालट होऊ शकतो हे या दौऱ्यातून दिसून आले. जलयुक्त शिवार अभियानात पावसाचा पडलेला थेंब शिवारात अडविला जाणार आहे.
शिकारातांडावासियांसोबत आता आपली कौटुंबिक नाते निर्माण झाल्याचे नमूद करून श्री. शिंदे म्हणाले की, रस्ता, पाणी, वीज या सुविधा तांडा-वस्त्यांना मिळाल्या पाहिजेत. या परिसरातील नागरिकांचे रोजगारासाठी स्थलांतर होऊ नये , अशी अपेक्षा आहे. त्यांना याच परिसरात काम मिळाले पाहिजे असा प्रयत्न असेल. तांडा विकास निधीच्या माध्यमातूनही या परिसरात सुविधा निर्माण करता येतील. तांड्यावरील मुलांना चांगले शिक्षण मिळाले पाहिजे. त्यासाठी शिष्यवृत्तीच्या माध्यमातून शालेय साहित्य मिळावे असा उद्देश आहे. मुलांना शिक्षणामुळे समाजाच्या मुख्यप्रवाहात आली पाहिजेत यासाठी प्रयत्न करा, असेही त्यांनी सांगितले.
सुरवातीला छत्रपती शिवाजी महाराज व हिंदूहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. श्री. संभूटवार यांनी प्रास्ताविक केले. यावेळी भातू तांडा व शिकारातांडा येथे माँसाहेब मिनाताई ठाकरे शिष्यवृत्ती योजनेतील निधीचेही वितरण करण्यात आले. पाठ्यपुस्तक व शालेय साहित्यासाठी हा निधी देण्यात आला. यावेळी आमदार डॅा. राठोड यांचे समयोचित भाषण झाले. अनुसयाताई चव्हाण यांनी दुष्काळी परिस्थितीत ठाणे येथे मंत्री श्री. शिंदे यांनी संवेदनशीलतेने केलेल्या मदतीबाबत आपल्या भावना व अनुभव मांडले. श्री. शिंदे यांनी तांड्यावरील कुटुंबियांशीही आस्थेवाईक संवाद साधला.

000000

No comments:

Post a Comment

वृत्त क्र.   93 दहावी परीक्षेच्या ऑनलाईन प्रवेशपत्राबाबत सूचना   नांदेड दि. 23 जानेवारी :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्ष...