Saturday, September 3, 2016

परिस्थितीशी मुकाबला करा... सरकार , जनता आपल्या पाठीशी
- सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे
मार्कंड, शेलगाव बुद्रूकमधील शेतकरी कुटुंबियांना आर्थिक मदतीचे वाटप

नांदेड, दि. 3 :- सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे यांनी आज नांदेड तालुक्यातील मार्कंड तसेत अर्धापूर तालुक्यातील शेलगाव बुद्रूक येथील आत्महत्त्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांची विचारपूस करून त्यांना आर्थिक मदत सुपूर्द केली. खचून न जाता परिस्थितीशी मुकाबला करा , सरकार आणि महाराष्ट्रातील जनता आपल्या सोबत आहे , अशी दिलाश्याची भावनाही त्यांनी या शेतकरी कुटुंबियांशी बोलताना व्यक्त केली.
याप्रसंगी आमदार हेमंत पाटील, आमदार नागेश पाटील-आष्टीकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यु काळे, तहसीलदार पी. के. ठाकूर तसेच शिवसेनेचे पदाधिकारी भुजंग पाटील आदींची उपस्थिती होती. 
मार्कंड येथील विठ्ठलराव लामदाडे यांच्या पत्नी गिन्याबाई विठ्ठलराव लामदाडे तसेच प्रभाकर येवले यांच्या पत्नी कान्होपात्रा येवले यांना मंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते आर्थिक मदतीचे धनादेश सुपूर्द करण्यात आले. यावेळी शिंदे यांनी कुटुंबियांशी आस्थेवाईक संवाद साधत त्यांची विचारपूस केली. तसेच प्रशासनाला या कुटुंबियांना विविध योजनांद्वारे सहाय्य करण्याचेही निर्देशित केले. मार्कंड येथे जनाबाई माधवराव बोकारे यांना तातडीचे मदत म्हणून रोख रक्कमही मंत्री श्री. शिंदे यांनी सुपूर्द केली.
शेलगाव बुद्रूक येथील बळीराम राजेगोरे यांचा मुलगा केशव राजेगोरे यांना आर्थिक मदत मंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते देण्यात आली. यावेळी आमदार श्री. पाटील, आमदार नागेश पाटील-आष्टीकर आदींचीही उपस्थिती होती. श्री. शिंदे यांनी शेलगाव गावातील ज्येष्ठ नागरिकांशीही संवाद साधला, पीक परिस्थिती आणि विविध बाबींची चर्चा केली.
मार्कंड शिवारातील जयप्रकाश हणमंतराव येवले यांच्या सोयाबीन पिकाचे किडीमुळे झालेल्या नुकसानीचीही श्री. शिंदे यांनी पाहणी केली. याबाबत कृषी विभागाकडे सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. शेलगाव शिवारातील शेतकऱ्यांच्या पिकांचीही पाहणीही त्यांनी केली व चर्चा केली.

000000

No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...