Friday, September 2, 2016

जलयुक्तच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे
मराठवाडा दुष्काळमुक्ती दृष्टीपथात – एकनाथ शिंदे
मांजरम, जुन्ना शिवारात जलपूजन संपन्न

नांदेड, दि. 2 :- जलयुक्त शिवार अभियान प्रभावीपणे राबविल्याचे परिणाम आता दृश्य स्वरुपात दिसू लागले आहेत. लोकप्रतिनिधी, लोकसहभाग आणि जिल्हा प्रशासनाने समन्वयाने केलेल्या कामांमुळे मराठवाडा दुष्काळमुक्त करण्याचे उद्दीष्ट साध्य होत असल्याचे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे यांनी नायगाव तालुक्यातील मांजरम येथे केले. मांजरम ते सांगवी या नाल्याच्या खोलीकरण, रुंदीकरण आणि सरळीकरणामुळे उपलब्ध झालेल्या जलसाठ्याचे जलपूजन श्री. शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. श्री. शिंदे यांनी नांदेड जिल्ह्यातील जलयुक्त शिवार अभियानाच्या कामांसाठी जिल्हा प्रशासनाचे अभिनंदनही केले. 
मौजे मांजरमच्या शिवारात झालेल्या या कार्यक्रमास खासदार राजन विचारे, मांजरमचे  सरपंच प्रकाश शिवारेड्डी, उपसरपंच गणपतराव गायकवाड यांच्यासह जिल्हाधिकारी सुरेश काकाणी, उपविभागीय अधिकारी शरद पवार, डी. दानापुरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पद्माकर केंद्रे, तहसिलदार व्यंकटेश मुंडे, गटविकास अधिकारी एम. एस. चव्हाण, कार्यकारी अभियंता व्ही. पी. शाहू, शिवसेनेचे पदाधिकारी भुजंग पाटील, मिलिंद देशमुख आदींची उपस्थिती होती.
याप्रसंगी बोलताना श्री. शिंदे म्हणाले की,  गतवर्षी दुष्काळी परिस्थितीचा पाहणी दौरा केला होता. दुष्काळमुक्तीसाठीच जलयुक्त शिवार अभियानाची अंमलबजावणी सुरु झाली. आता या योजनेचा शेतकऱ्यांना चांगलाच फायदा झाल्याचे जाणवते. सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या सिंचनासाठी पाणी उपलब्धतेची शाश्वती या योजनेतून निर्माण झाली आहे. लोकसहभाग स्थानिक लोकप्रतिनिधी समन्वय आणि लोकसहभागामुळे या योजनेत नांदेड जिल्ह्यातही प्रभावी काम झाल्याचे दिसून येते आहे. शेतकऱ्यांच्या समस्यांवर कायमस्वरुपी उपाय योजता आल्या पाहिजेत, अशी सरकारची भुमिका आहे. आता यामुळे भुजलस्तर उंचावण्यासाठी मदत होणार आहे. यावर्षी पाऊस चांगला झाला आहे. त्यामुळे सध्यातरी पाणी टंचाई भासणार नाही, पण यापुढेही पाणी टंचाई भासू नये यासाठीही सरकार प्रयत्न करत राहील. त्यासाठी जिल्हा प्रशासनालाही काम करावे लागेल.
यावेळी श्री. शिंदे यांनी मांजरम ते सांगवी या 29 किलोमीटर अंतराच्या नाल्याचे दहा किलोमीटरचे काम लोकसहभाग, स्वयंसेवी संस्था आणि जिल्हा प्रशासन यांनी प्रभावीपणे पुर्ण केल्याबद्दल अभिनंदन केले. या नाल्यामध्ये आता 343.70 सघमी पाणीसाठा  होणार आहे. या जलयुक्त शिवार अभियानात समाविष्ट दोन गावांसाठीच्या या कामांमुळे अकरा गावांना फायदा होणार आहे.
सुरवातीला पाण्याचे विधीवत जलपूजन श्री. शिंदे आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.कुसूमताई चव्हाण कन्या विद्यामंदिराच्या मुलींनी स्वागत गीत सादर केले. राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेतील धनादेशांचे सुनिता आढाव, रमाबाई हनुमंते, पद्मिनी साखळे, बाबाराव कदम, मेहताबी शेख यांना वितरण करण्यात आले. यावेळी मांजरम, कुंटूर आणि परिसरातील शेतकरी उपस्थित होते. यानंतर श्री. शिंदे यांनी नजिकच्या शेतात राबणाऱ्या शेतकऱ्यांशी संवाद साधला व पीक परिस्थिती जाणून घेतली. 

जुन्ना-बेरळी नाल्यावर श्री. शिंदे यांच्या हस्ते जलपूजन
नांदेड लघुपाटबंधारे उपविभागाच्यावतीने मुखेड तालुक्यातील जुन्ना शिवारातील जुन्ना-बेरळी नाल्यावर श्री. शिंदे यांच्या हस्ते जलपूजन संपन्न झाले. याप्रसंगी आमदार डॅा. तुषार राठोड यांच्यासह परिसरातील नागरिक तसेच जिल्हाधिकारी सुरेश काकाणी, कार्यकारी अभियंता श्री. शाहू आदींची उपस्थिती होती.

00000

No comments:

Post a Comment

वृत्त क्र.   93 दहावी परीक्षेच्या ऑनलाईन प्रवेशपत्राबाबत सूचना   नांदेड दि. 23 जानेवारी :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्ष...