Friday, August 31, 2018


महसूल दिन उत्साहात संपन्न

शासनाच्या विविध योजनांची प्रामाणिकपणे अंमलबजावणी करुन
नागरिकांपर्यंत योजना पोहचवाव्यात
--- जिल्हाधिकारी अरुण डोंगरे  


नांदेड दि. 31 :-   महसूल विभाग हा महत्वाचा भाग असून सर्व अधिकारी / कर्मचारी यांनी शासनाच्या विविध विभागांच्या योजनांची प्रामाणिकपणे अंमलबजावणी करुन नागरिकांपर्यंत योजना पोहचवाव्यात. तसेच समन्वय ठेवून कामे करावीत, असेही जिल्हाधिकारी डोंगरे यांनी सांगितले.
  विशेष पोलीस महानिरीक्षक फत्तेसिंह पाटील म्हणाले की, विविध कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून लोकांच्या कल्याणाकरिता प्रयत्न करावेत. ग्रामीण भागातील नागरिकांना शासनाच्या योजनांची माहिती देण्यात यावी. या महत्वपूर्ण योजना तळागाळापर्यंत पोहचाव्यात व त्यादृष्टीने प्रयत्न करावेत, असेही विशेष पोलीस महानिरीक्षक श्री. पाटील यांनी यावेळी सांगितले.  
जिल्‍हाधिकारी कार्यालयाच्यावतीने महसूल दिन डॉ. शंकरराव चव्‍हाण प्रेक्षागृह नांदेड येथे आज उत्साहात संपन्न झाला. महसूल दिन कार्यक्रमाचे उद्घाटन नांदेड परिक्षेत्र विशेष पोलीस महानिरीक्षक फत्तेसिंह पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी अरुण डोंगरे हे उपस्थित होते. मनपा आयुक्त लहुराज माळी, पोलीस अधीक्षक संजय जाधव, अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी संतोष वेणीकर यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांनी उपस्थित अधिकारी, कर्मचाऱ्यांना महसूल दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
       
  यावेळी जिल्ह्यातील 27 सेवानिवृत्‍त अधिकारी, कर्मचारी यांचा शाल व श्रीफळ देऊन सपत्‍नीक सत्‍कार करण्‍यात आला. महसूल विभागातील अधिकारी, कर्मचारी यांच्‍या एकुण 12 गुणवंत पाल्‍यांना डिक्शनरी व प्रशिस्‍तीपत्र देऊन सन्‍मान करण्‍यात आला. तसेच जिल्‍हयातील एकूण 55 उत्‍कृष्‍ट अधिकारी कर्मचारी यांचा प्रशिस्‍तीपत्र देऊन गौरव करण्‍यात आला. कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक निवासी उपजिल्‍हाधिकारी संतोष वेणीकर यांनी  केले.
           सुत्रसंचलन नायब तहसिलदार मुगाजी काकडे स्‍वामी यांनी केले. कार्यक्रमास जिल्‍हयातील महसूल अधिकारी, कर्मचारी बहुसंख्‍येने उपस्थित होते. शेवटी तहसिलदार अरविंद नर्सीकर यांनी आभार मानले.
            याप्रसंगी महसूल दर्पण या त्रैमासिकाचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विमोचन करण्यात आले.  
****

No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...