Friday, February 28, 2025

 वृत्त क्रमांक 244

साहित्यातून जगण्याची दिशा मिळते -जेष्ठ साहित्यिक श्रीकांत देशमुख

 वाचन संस्कृतीला बळ देण्यासाठी ग्रंथ वाचन आवश्यक

 शालेय शिक्षणापासून वाचन संस्कृती जोपासावी- ॲड.गंगाधर पटने 

नांदेड दि. 28 फेब्रुवारी :- मध्ययुगीन काळातील चक्रधर स्वामीच्या लीळाचरित्र आद्यग्रंथापासून मराठी साहित्यांची परंपरा आपल्याला लाभलेली आहे.जेष्ठ साहित्यिकांच्या साहित्यातूनच जीवनमूल्यांची शिकवण, आध्यात्मिक साहित्य, तत्वज्ञान यांचा वारसा आपल्याला लाभलेला आहे. यातून सहिष्णूता, जगण्याचे तत्वज्ञान आपल्याला मिळत आहे. स्वातंत्र्योत्तर काळात महात्मा फुले, सावित्रीबाई फुले,डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या साहित्यातून समाज सुधारणेचे बळ मिळालेले आहे. अशा महान संत, महात्म्याचे साहित्य प्रत्येकांनी आपल्या घरात ठेवले पाहिजे, ते प्रत्येकांनी वाचले पाहिजे यामुळे पुढील पिढी सुसंस्कृत निर्माण होईल, असे प्रतिपादन जेष्ठ साहित्यिक श्रीकांत देशमुख यांनी केले. 

ग्रंथोत्सव 2024 चे आयोजन जिल्हा ग्रंथालयात करण्यात आले होते. यावेळी बोलत होते. यावेळी अध्यक्ष भगवंत क्षीरसागर,जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष तथा माजी.आ.ॲड.गंगाधर पटने, सहाय्यक ग्रंथालय संचालक, छत्रपती संभाजीनगर सुनील हुसे, जिल्हा माहिती अधिकारी प्रवीण टाके, जिल्हा ग्रंथालय अधिकारी अनिल सुर्यवंशी, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष संभाजीराव धुळगुंडे, प्रकाशक निर्मलकुमार सूर्यवंशी, संपादक डॉ. राम शेवडीकर आदी मान्यवरांची उपस्थिती होती. 

थोर साहित्यिकांचे विचार, साहित्य प्रत्येकांच्या घरात आवश्यक आहे. ग्रंथात परिवर्तन करण्याची शक्ती आहे. सामाजिक विकृतीचा अभ्यास जाणून घ्यायचा असेल तर ग्रंथ वाचले पाहिजे. ग्रंथाचे सामर्थ्य प्रचंड असून त्यांची जाणीव प्रत्येकाला असणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन श्रीकांत देशमुख यांनी केले. 

वाचन संस्कृतीचे संवर्धन, वाचन संस्कृतीला बळ देणारा ग्रंथोत्सव आहे. आताच्या काळात एआय, सोशल मिडीया यामुळे वाचन संस्कृतीला खूप मोठे आवाहन आहेत. परंतु या आव्हानाच्या काळातळी वाचन संख्या दिवसेंदिवस वाढविणे हे आपले कर्तव्य आहे. सध्या साहित्य मराठी परिषदेवर सर्व पुस्तके उपलब्ध आहेत. लोकांच्या स्पर्धासाठी पुस्तके आसुसलेले आहेत. गावातील ग्रंथालयात असलेली पुस्तकांची माहिती सर्व नागरिकांना होण्यासाठी ग्रंथालयांनी धार्मिक कार्यक्रमात यांची माहिती सांगावी. सोशल मिडीयावर याबाबत प्रसार करावा.उठा जागे व्हा ग्रंथालय चळवळीत जागे व्हा, असे आवाहन सहाय्यक ग्रंथालय संचालक सुनील हुसे यांनी केले. 

वाचन संस्कृती शालेय स्तरापासून झाली पाहिजे. वाचनाबाबत शिक्षकांमध्ये जनजागृती असली पाहिजे. तर वाचन संस्कृती टिकेल असे मत माजी.आमदार ॲड.गंगाधर पटने यांनी व्यक्त केले. 

माणसाच्या जडणघडणीत ग्रंथाचे अन्यय साधारण महत्व आहे. ग्रंथ माणस घडवितात. ग्रंथ आहेत म्हणून आपण आहोत. ग्रंथालयात ज्ञानाच्या शाखा असून ते आपल्या आयुष्याचे मार्गदर्शक आहेत. संत परंपरा, शिकवण ग्रंथाच्या माध्यमातून मिळत असते असे मत कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. भगवंत क्षीरसागर यांनी केले. 

नांदेड ग्रंथोत्सवाला आज पासून सुरुवात झाली. 28 फेब्रुवारी व 1 मार्च दोन दिवस हा ग्रंथोत्सव होत आहे. सकाळी 8.30 ला उपजिल्हाधिकारी अजय शिंदे ज्येष्ठ पत्रकार राम शेवडीकर व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत ग्रंथ दींडी काढण्यात आली. ग्रंथ पूजन करण्यात आले. ग्रंथदिंडी मध्ये विद्यार्थी विविध सांस्कृतिक मंडळे आणि भजनी मंडळे देखील सहभागी झाले होते. आयटीआय चौकातून निघालेली ही ग्रंथदिंडी लक्षवेधी ठरली होती.

शनिवारी पुस्तक प्रदर्शनाला भेट दया 

या ठिकाणी शुक्रवार व शनिवारी मोठया प्रमाणात पुस्तक प्रदर्शन लागले आहे. तसेच विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. नांदेडकरांनी या ग्रंथोत्सवाचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.

दुसऱ्या दिवशीच्या कार्यक्रमात  परिसवांद “मराठी भाषा सवंर्धन आणि घराघरातील प्रयत्न”चे आयोजन करण्यात येईल. दुपारच्या सत्रात “ग्रंथचळवळीतील दलित व ग्रामीण,बाल साहित्याचे योगदान” हा परिसवांद घेण्यात येणार आहे. समारोप अध्यक्ष माजी खासदार तथा साहित्यिक डॉ.व्यंकटेश काब्दे, माजी अध्यक्ष जिल्हा परिषद नांदेड, संभाजीराव धुळगुंडे, माजी आमदार तथा अध्यक्ष जिल्हा ग्रंथालय संघाचे ॲड . गंगाधर पटने, निर्मल प्रकाशनचे प्रकाशक निर्मलकुमार सुर्यवंशी यांची उपस्थिती राहणार आहेत. नांदेड मधील नागरिकांनी या ग्रंथ प्रदर्शनाचा लाभ घ्यावा मोठ्या प्रमाणात पुस्तक खरेदी करावे व ग्रंथोत्सवाला प्रोत्साहन द्यावे असे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी यांनी केले आहे.

ग्रंथोत्सवात विविध नामांकित प्रकाशकांचे पुस्तक विक्री व प्रदर्शनी दालने राहणार आहेत. या महोत्सवाचे लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी अनिल सुर्यवंशी यांनी केले आहे.कार्यक्रमचे सूत्रसंचलन ज्येष्ठ साहित्यिक नारायणराव शिंदे यांनी केले.

०००००












No comments:

Post a Comment

  वृत्त क्रमांक 245 बालकांची विशेष आरोग्य तपासणी मोहिम सुरु आज उपमुख्यमंत्री अजित पवार व आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते होणार राज...