Tuesday, March 7, 2017

उष्माघात प्रतिबंध आराखड्याबाबत बैठक संपन्न
वाढत्या तपमानाबाबत नागरिकांना सतर्कतेचे आवाहन
नांदेड दि. 7 :- तपमानातील बदलाबाबतची पूर्व सूचना आणि उष्माघात होऊ नये यासाठी वेळीच  प्रतिबंधात्मक उपाय केल्यास उष्माघात व त्यामुळे निर्माण होणाऱ्या आरोग्याच्या प्रश्नांवर मात करता येते. त्यादृष्टिने जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेला सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहिती आज येथे देण्यात आली. नांदेड जिल्ह्यासह राज्यातील सहा जिल्हे उष्माघात-प्रवण म्हणून सूचित करण्यात आले आहेत. त्याअनुषंगाने पूर्वतयारी म्हणून उष्माघात प्रतिबंधक आराखड्या विषयीची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. त्यावेळी या बैठकीत अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एच. आर. गुटुंरकर यांनी ही माहिती दिली.
बैठकीस मनपा आरोग्य अधिकारी डॉ. सुमती ठाकरे, पोलीस उपअक्षीक विश्वनाथ नांदेडकर तसेच वैद्यकीय अधिकारी आदींची उपस्थिती होती.
नांदेडसह राज्यातील नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, जळगाव आणि भंडारा या सहा जिल्ह्यांची आरोग्य विभागाने उष्माघात-प्रवण म्हणून निवड केली आहे. गतवर्षी पासून नांदेड जिल्ह्यात या उष्माघात प्रतिबंधक आराखड्याची अंमलबजावणी करण्यात येते. त्यानुसार उष्माघाताबाबत जनजागरण आणि आरोग्य विभागातील विविध घटकांना उष्माघाताच्या अनुषंगाने प्रथमोपचार आदींबाबत प्रशिक्षण कार्यवाही सुरु झाली आहे. जिल्ह्यातील उपजिल्हा रुग्णालयात तसेच ग्रामीण रुग्णालयात उष्माघात कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. राष्ट्रीय बालस्वास्थ कार्यक्रमांतर्गत रुग्ण वाहिकेचा फिरते पथक म्हणून वापर करण्यात येणार आहे. मनपा क्षेत्रात महापालिका आरोग्य विभाग प्रतिबंधक आराखड्याची कार्यवाही करणार आहे. जिल्ह्यात उष्माघात उपचारासाठी आवश्यक औषधे उपलब्ध असल्याची माहितीही बैठकीत देण्यात आली. 
उष्माघाताबाबत जनतेने सतर्क राहून वाढत्या तपमानाच्या परिस्थितीत घ्यावयाची काळजी विविध माध्यमातून पोहचविण्यात येत असल्याची माहितीही देण्यात आली.

0000000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...