Tuesday, November 30, 2021

 शेतकऱ्यांसाठी रब्बी हंगामातील पीक स्पर्धा 

नांदेड (जिमाका) दि. 30 :-  शेतकऱ्यांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे. अधिकाधिक उत्पादन घेण्यासाठी व स्पर्धात्मक वातावरणाची निर्मिती करण्यासाठी पीक स्पर्धा आयोजित केली आहे. रब्बी हंगामातील ज्वारी, गहू, हरभरा, करडई, जवस, तीळ या सहा पिकांचा रब्बी हंगाम पीक स्पर्धेमध्ये समावेश करण्यात आला आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी रब्बी हंगामासाठी अर्ज दाखल करण्यासाठी अंतिम मुदत 31 डिसेंबर 2021 असून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पीक स्पर्धेमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी आर. बी. चलवदे यांनी केले आहे. 

शेतकऱ्यांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अधिकाधिक उत्पादन घेण्यासाठी स्पर्धात्मक वातावरणाची निर्मिती करणे व प्रोत्साहन मिळण्यासाठी राज्य, जिल्हा, विभाग व तालुका पातळीवर पिकस्पर्धाचे आयोजन करण्यासाठी कार्यपध्दतीमध्ये शासन निर्णयानुसार सुधारणा केली आहे. पिक स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी शेतकऱ्यांकडे संबंधित पिकाखालील किमान दहा आर. (०.१० हेक्टर) सलग क्षेत्रावर लागवड करणे आवश्यक आहे. पिकस्पर्धेसाठी तालुका हा घटक निश्चित केला आहे. ज्या पिकाखालील संबधित तालुक्यातील एकूण लागवड क्षेत्र एक हजार हेक्टर किंवा त्याहून अधिक आहे, अशा पिकांसाठी पिकस्पर्धा आयोजित केली जाणार आहे. ही स्पर्धा सर्वसाधारण व आदिवासी शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र आयोजित केली जाणार आहे. पिकस्पर्धेसाठी तालुका पातळीवर सर्वसाधारण गटातील किमान 10 स्पर्धक तर आदिवासी गटातील किमान ५ स्पर्धकांचा सहभाग आवश्यक आहे.  स्पर्धेत भाग घेण्यासाठी  तीनशे रुपये प्रति शेतकरी पिक याप्रमाणे प्रवेश शुल्क आकारले आहे. तालुका पातळीवरील स्पर्धेच्या निकालावरून पुढे जिल्हा, विभाग व राज्यपातळीवरील बक्षिसे जाहीर केली जाणार आहेत. 

एक शेतकरी एकापेक्षा अधिक पिकासाठी स्पर्धेत भाग घेऊ शकेल. पुर्वी जिल्हा व राज्यपातळीवर सरसकट सर्वाना भाग घेता येत नव्हता. जिल्हा व राज्यपातळीवर वेगवेगळे शुल्क आकारण्यात येत होते. आता सर्व पातळीवर एकदाच थेट सहभाग घेता येणार आहे. त्यासाठी एकदाच तीनशे रुपये प्रति शेतकरी प्रति पिक प्रवेश शुल्क भरून पिककापणी प्रयोगातून आलेल्या उत्पादकतेच्या आकडेवारीनुसार त्याची तालुका, जिल्हा, विभाग व राज्यपातळीवर निवड केली जाणार आहे. याशिवाय पारितोषिकाच्या रक्कमेमध्ये भरीव वाढ करण्यात आली आहे.

स्पर्धापातळी  सर्वसाधारण आणि आदिवासीगटासाठी बक्षिस रुपये पुढील प्रमाणे आहे. तालुकापातळीसाठी पहिले बक्षिस 5 हजार, दुसरे 3 हजार तर तिसरे 2 हजार आहे. जिल्हा पातळीसाठी पहिले बक्षिस 10 हजार, दुसरे 7 हजार तर तिसरे 5 हजार आहे. विभाग पातळीसाठी पहिले बक्षिस 25 हजार, दुसरे 20 हजार तर तिसरे 15 हजार आहे. राज्य पातळीसाठी पहिले बक्षिस 50 हजार, दुसरे 40 हजार तर तिसरे 30 हजार याप्रमाणे आहे, असेही जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालयाने प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

00000

No comments:

Post a Comment

    वृत्त क्र. 1136 जिल्हास्तरीय   युवा महोत्सवाच्या तारखेत बदल युवा महोत्सवाचे आयोजन 1 व 2 डिसेंबर 2024 नांदेड दि.   25   नोव्हेंबर  :-   ज...