Thursday, April 20, 2023

 लेख                                                                                              दि. 20 एप्रिल 2023

समता पर्वाने दिले योजनांच्या अंमलबजावणीला बळ !

सामाजिक न्याय विभागातर्गत संपूर्ण राज्यात 1 एप्रिल ते 1 मे 2023 या कालावधीत समता पर्व अभियान राबविण्यात येत आहे. समाज कल्याण विभागाच्या विविध योजना लाभार्थ्यांपर्यत पोहोचविण्यावर यात भर दिला जात आहे. समाज कल्याण विभागाचे आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी राज्यातील सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण अधिकारी, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालयाना या अभियानात विविध उपक्रम राबविण्याबाबत निर्देश दिले आहेत.

 

प्रत्येक जिल्ह्यात जिल्ह्याचे पालकमंत्री, जिल्हाधिकारी यांच्या हस्ते सामाजिक न्याय पर्वाचे उदघाटन करण्यात आले आहे. या अभियानात अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्तींना भेटी देवून योजनांची जनजागृती करणे, जात प्रमाणपत्र व जातीचे वैधता प्रमाणपत्र वाटप करण्यासाठी विशेष मोहिमचे आयोजन करणे असे उपक्रम हाती घेतले आहेत. शिक्षण विभागाशी समन्वय साधून मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शाळेत जात प्रमाणपत्र देणे, सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनाची माहिती सर्वसामान्य जनतेपर्यत पोहोचविणे, महाविद्यालय, आश्रमशाळा, निवासी शाळा व शासकीय वसतीगृहांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबरोबर इतरही महापुरुषांच्या विचारांवर आधारित वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा व पथनाटय तसेच इतर कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात येत आहे.

 

तालुका व जिल्हास्तरावर स्वाधार शिष्यवृत्ती, मिनी ट्रॅक्टर लाभार्थी, कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजनेचे लाभार्थी यांना प्रातिनिधीक स्तरावर साहित्य वाटप करणे व योजनाची माहिती देणे, समता दुत याच्या मार्फत ग्रामीण व शहरी भागात पथनाट्य व लघुनाट्य नाटकाद्वारे जनतेला सामाजिक योजनांची माहिती देणे व सामाजिक प्रबोधनाचे कार्य या मोहिमेअंतर्गत केले जात आहे. अनुसूचित जाती, जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याविषयी कार्यशाळा आयोजित करणे, जागतिक आरोग्य दिनानिमित्त जिल्ह्यातील सर्व आश्रमशाळा, शासकीय वसतिगृह, निवासी शाळा, जेष्ठ नागरिक, तृतीयपंथी, ऊसतोड कामगार यांच्यासाठी आरोग्य अधिकारी यांच्यामार्फत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यावर भर दिला जात आहे. तसेच जेष्ठ नागरिकांसाठी जनजागृती व नागरिकांचे मेळावे घेणे, सफाई कामगार व त्यांचे पुनवर्सन कायदा 2013 अंतर्गत जनजागृती करणे, कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण योजनेच्या लाभार्थ्यांची कार्यशाळा घेणे, ऊसतोड कामगारांची नाव नोंदणी व ओळखपत्र वाटप तसेच ऊसतोड कामगारांसाठी पुर्नगामन शिबिर आयोजित करणे, त्यामध्ये आरोग्य तपासणी व धान्य महोत्सव यांचा समावेश आहे.

 

याचबरोबर ग्रामीण व शहरी भागातील अनुसूचित जाती वस्त्यांमध्ये स्वच्छता करणे, संविधान जनजागृती कार्यक्रम तसेच प्रत्येक तालुक्यात एक आदर्श वस्ती निर्माण करणे, नवउद्योजकता शिबिर आयोजित करणे, समान संधी केंद्रमार्फत नशा मुक्त भारत अभियानअंतर्गत व्यसनमुक्त व शिष्यवृत्ती योजनांची जनजागृती करणे, तृतीयपंथी व्यक्तीसाठी शिबिर आयोजित करणे व ओळखपत्र वाटप करणे आदी उपक्रम या कालावधीत घेण्यात येणार आहेत.

 

अंधश्रध्दा निर्मूलन कायद्याबाबत जनजागृती करणे, शासकीय वसतीगृह, निवासी शाळेतील विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधणे, महाराष्ट्र दिन साजरा करणे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पुर्वसंध्येला समता रजनी कार्यक्रमाचे आयोजन करणे, दिव्यांग बांधवाना व जेष्ठ नागरिकांना सामाजिक सुरक्षा योजना उपलब्ध होण्याच्या अनुषंगाने कार्यशाळा आयोजित करणे अशा विविध उपक्रमाद्वारे लाभार्थ्यांना योजनाची माहिती व प्रत्यक्ष लाभ देण्याची कार्यवाही या समता पर्वानिमित्त समाज कल्याण कार्यालयाच्यावतीने करण्यात येत आहे.

 

अलका पाटील

उपसंपादक, 

जिल्हा माहिती कार्यालय,

नांदेड

00000  

No comments:

Post a Comment

वृत्त क्र.   93 दहावी परीक्षेच्या ऑनलाईन प्रवेशपत्राबाबत सूचना   नांदेड दि. 23 जानेवारी :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्ष...