Wednesday, August 10, 2016

सुदृढ बालक जन्माला येण्यासाठी जिल्हयात
छोटा भीम योजना हा अभिनव उपक्रम सुरु
                                   - अभिमन्यु काळे
          नांदेड, दि. 10 : डासमुक्त गाव अभियानासोबतच जिल्हयात जन्माला येणारे बालक हे 3 कि.ग्रॅ. पेक्षा जास्त वजनाचे जन्मास यावे, यासाठी गरोदर मातांना देण्यात येणाऱ्या सेवांचे निकटचे संनियंत्रण आरोग्य विभागामार्फत करण्यात येत असून, जिल्हयात या मोहिमेच्या अनुषंगाने छोटा भीम ही योजना गावपातळीवर राबविण्यात येत आहे. अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यु काळे यांनी दिली.
ग्रामीण भागामध्ये गरोदर मातेच्या आरोग्य विषयक तपासणी, प्रयोगशाळेतील तपासण्या, लसीकरण, औषधोपचार करणे, संस्थेत प्रसुतीसाठी प्रवृत्त करुन घेणे, जननी सुरक्षा योजनेंतर्गत आर्थिक लाभ देणे, जननी शिशु सुरक्षा योजना कार्यक्रमातून संदर्भ सेवांची उपलब्धता समजावून सांगणे, गरोदर मातेची सर्वागीण काळजी घेऊन जन्माला येणारे बाळ हे 3 कि.ग्रॅ. पेक्षा जास्त वजनाचे होईल याकडे लक्ष देण्यासाठी  जानेवारी, 2016 पासून जिल्हयात ही योजना राबविण्यात येत आहे.
छोटा भीम या योजनेंतर्गत जिल्हयातील एएनएम, आशा/आंगणवाडी कार्यकर्त्यांमार्फत गरोदर मातांना प्रत्येक सोमवार, बुधवार व शुक्रवारी गृहभेटी देण्यात येवून त्यांना व त्यांच्या कुटुंबियांना आरोग्य, आहार, पोषण व विश्रांती याबाबत समुपदेशन व आरोग्य शिक्षण देण्यात येत आहे. त्यांच्या वजनवाढीवर देखरेख करणे, जोखमीच्या व अतिजोखमीच्या गरोदर मातांना दर बुधवारी आयोजित  मातृत्व संवर्धन दिनात तसेच प्रधानमंत्री मातृत्व सुरक्षित अभियानांतर्गत दर महिन्याच्या 9 तारखेस प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये संदर्भ सेवा देऊन, त्यांची तपासणी, उपचार करणे या सेवा देण्यात येत आहेत. तसेच एएनएम मार्फत जोखमीच्या व अतिजोखमीच्या मातांना दरमहा प्राथमिक आरोग्य केंद्रात नेऊन त्यांची तपासणी, उपचार व इतर समस्येवर समुपदेशन करण्यात येत आहे. मातेची प्रसुती ही दवाखान्यातच झाली पाहिजे हे सांगण्यात येत आहे. यासोबतच जन्माला येणारे बालक सुदृढ व 3 कि.ग्रॅ. पेक्षा जास्त वजनाचे जन्मास येण्याचे फायदे याबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे.
 या योजनेंतर्गत जानेवारी ते जून, 2016 अखेर एकुण 11296 बालकांचा जन्म झाला असून त्यापैकी 3 कि.मी. पेक्षा जास्त वजनाची 5292 (47 टक्केपेक्षा जास्त) बालके जन्माला आली, 5320 बालके 2.5 ते 3 कि.ग्रॅ. मध्ये (47 टक्के) व उर्वरित 684 (6 टक्के) बालके 2.5 कि.ग्रॅ. पेक्षा कमी वजनाची जन्मली आहेत.
जिल्हयातील ग्रामीण भागातील गरोदर मातांच्या कुटुंबियांना, जन्मत: बाळाचे वजन 3 कि.ग्रॅ. पेक्षा जास्त असणेबाबत गरोदर मातेची नोंदणी 12 आठवड्यांच्या आत करुन घ्यावी, गरोदरपणाच्या काळात प्रतिमाह किमान 1 किलो किंवा त्यापेक्षा जास्त वजन वाढले पाहीजे याकडे लक्ष द्यावे, आंगणवाडी/आशा कार्यकर्त्यांमार्फत दिल्या जाणाऱ्या नियमित आठवडी गृहभेटी मध्ये पोषण आहाराबाबत दिलेल्या सल्ल्याचे पालन करावे, तसेच एएनएम मार्फत  तपासणी करुन आवश्यक त्या तपासण्या, औषधोपचार, लसीकरण या सेवा नियमीत घ्याव्यात.
गरोदर मातेची वजनवाढ व्यवस्थित होत नसल्यास व इतर काही जोखमीची लक्षणे दिसून आल्यास नजिकच्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत तपासणी करुन घ्यावी. जिल्हयात जन्माला येणारी प्रत्येक बालके 3 कि.ग्रॅ. पेक्षा जास्त वजनाची असावीत या करीता सर्वांनी सहकार्य करावे असे अवाहन ही श्री. काळे यांनी केले आहे. 

0000000

No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...