Thursday, August 15, 2024

मला मिळालेले तीन हजार तीन लाखासारखे
 
मुख्यमंत्री ‘सर’ नाही तर ‘भाऊ’ असा आवाज देणार...

मुख्यमंत्र्यांची बहीण म्हणून कुटुंबात आता माझी नव्याने ओळख...

मुख्यमंत्री ‘भावा’शी राज्यातील लाडक्या बहिणींचा मनमोकळा संवाद

बहिणींना रक्षाबंधनापूर्वी ओवाळणी जमा झाल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले समाधान

मुंबई, दि. 15: ‘मी आता तुम्हाला मुख्यमंत्री सर म्हणणार नाही तर भाऊ म्हणेन..’, ‘घरखर्चासाठी आता नवऱ्याकडे रोज हात पसरणार नाही.. सख्खा भाऊ मला विचारत नाही..पण मुख्यमंत्री साहेब माझ्या पाठीशी सख्ख्या भावाप्रमाणे उभे राहीले’, ‘मला मिळालेल्या तीन हजाराची किंमत ही तीन लाखा एवढी आहे..’, ‘माझ्या अपेक्षेपेक्षा जास्त लवकर पैसे माझ्या खात्यात जमा झाले. रक्षाबंधनापूर्वी मला ओवाळणी मिळाली…!’ राज्यभरातील भगिनींनी आपल्या मुख्यमंत्री भावाकडे व्यक्त केलेल्या या भावना आहेत.  या भावनांनी मुख्यमंत्रीही हेलावले आणि तुमच्या लाखो भगिनींचं आशीर्वादाचं बळ माझ्या पाठिशी आहे.. अशा शब्दांत त्यांनीही भगिनींच्या प्रेमाचा स्वीकार केला.


कालपासून (दि. १४ ऑगस्ट) मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या दोन हप्त्यांची एकत्रित रक्कम (तीन हजार रुपये) भगिनींच्या खात्यात जमा होण्यास सुरूवात झाली आहे. आजपर्यंत सुमारे ८० लाख भगिनींच्या खात्यात प्रत्येकी तीन हजार रुपये जमा झाले असून आज या लाभार्थ्यांशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रातिनिधीक स्वरूपात संवाद साधला. त्यावेळी लाभार्थी भगिनींनी आपल्या भावना व्यक्त करताना, मी आता मुख्यमंत्र्यांची बहीण आहे.. अशी नवीन ओळख निर्माण झाल्याचे सांगत मनमोकळेपणाने आपल्या मुख्यमंत्री भावाशी संवाद साधला.

राज्यभरातील भगिनींच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून समाधान वाटल्याचे सांगत ही योजना केवळ निवडणुकीपुरती नाही ती कायम आहे. योजनेकरिता या आर्थिक वर्षासाठी पूर्णपणे तरतुद करण्यात आली असून तुम्हाला योजनेचा लाभ मिळत राहील, अशी ग्वाही मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांनी आपल्या राज्यभरातील बहिणींना दिली.

‍मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचे पैसे भगिनींच्या बँक खात्यात जमा झाल्याचा आनंद होत असल्याचे सांगून मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, भावाने बहिणीला दिलेला हा माहेरचा आहेर आहे. तुमचा भाऊ आज मुख्यमंत्री आहे. तो खंबीरपणे तुमच्या पाठिशी आहे. लाडक्या बहिणींना दिलेली ही मदत फक्त त्यांच्या पुरती मर्यादीत नाही तर त्यांच्या कुटुंबासाठीही मोलाची अशी ही भेट आहे. यामुळे तुम्हाला कोणाकडे हात पसरावा लागणार नाही. मुलांच्या शालेय साहित्यासाठी, तुमच्या औषधांसाठी, तसेच तुमचा सुरु असेलेला छोटा, मोठा व्यवसाय वाढवण्यासाठी या पैशांचा तुम्हाला उपयोग होणार आहे. घर कसे सांभाळावे हे महिलांना चांगले ठाऊक असते. त्यामुळे या योजनेच्या माध्यमातून त्यांच्या हाताला बळ देण्याचे काम शासनाने केले आहे. या योजनेच्या माध्यमातून तुम्ही व्यवसाय वाढवालच त्यामुळे अर्थव्यवस्थेलाही बळ मिळणार आहे. त्यातून तुम्ही नोकरी देणारे व्हा. त्यामुळे रोजगाराच्या अनेक संधी निर्माण होतील. महिलांच्या सक्षमीकरणासाठी शासन कटीबद्ध आहे. महिलांसाठी शासनाने 108 योजना सुरु केल्या आहेत. या सर्व योजनांची माहिती घेऊन त्याचा लाभ बहिणींनी घ्यावा असे आवाहनही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी केले.

            मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, आज या योजनेच्या माध्यमातून बहिणींसोबत एक जिव्हाळ्याचे नाते निर्माण झाले आहे. सर्वसामान्य, दुर्बल, गरीब, शेतकरी, ज्येष्ठ नागरिक, युवक - युवती, कामगार यांच्यासाठी सरकार शक्य ते सर्व करत आहे. या सर्वांसाठी राबवण्यात येत असलेल्या योजनांचा लाभ लाभार्थ्यांना मिळाला की केलेल्या कामाचे सार्थक झाले असे वाटते. महिलांच्या सक्षमीकरणासाठी उमेदच्या माध्यमातून बचतगट सक्षम करण्याचे काम सरकार करत आहे. पुर्वी बचत गटांसाठी असलेली कर्ज मर्यादा वाढवून 20 लाख रुपयांपर्यंत वाढवली आहे. आता त्यामध्ये 50 लाख रुपयांपर्यंत वाढ करण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडे पाठपुरावा करणार आहे. शिक्षणापासून मुली वंचित राहू नयेत, शैक्षणिक फीसाठी त्यांचे शिक्षण अर्धवट राहू नये यासाठी मुलींना शिक्षणामध्ये 100 टक्के फी माफ करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

            मुख्यमंत्री श्री. शिंदे पुढे म्हणाले, युवक – युवतींच्या हाताला काम मिळावे यासाठी मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना राबवण्यात येत आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्यात कुशल मनुष्यबळ निर्माण करण्यात येत आहे. याचा फायदा उद्योगांनाही होणार आहे. राज्यात सध्या मोठ्या प्रमाणावर उद्योग उभारले जात आहेत. त्या उद्योगांना कुशल मनुष्यबळ उपलब्ध होणार आहे. महिलांना एसटी प्रवासात 50 टक्के सवलत दिली आहे. त्यामुळे एसटी फायद्यातच आली आहे. याशिवाय वारकऱ्यांना शासन मदत करत आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी वयोश्री योजना, मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजना, मुख्यमंत्री तिर्थदर्शन योजना अशा अनेक लोककल्याणकारी योजना राबवण्यात येत आहेत. फक्त रस्ते, पुल बांधणे, दळण वळण उभारणे महत्वाचे नाही तर लोककल्याणकारी योजना राबवणेही महत्वाचे आहे. यासाठी शासन कटीबद्ध असून राज्यातील प्रत्येक घटकासाठी शासन योजना राबवत आहे.

            शेतकऱ्यांचे कृषी पंपाचे वीज बील माफ करण्यात आले आहे. 45 लाख कृषी पंप धारकांना याचा लाभ झाला आहे. तसेच नमो सन्मान योजनेमध्ये केंद्राच्या 6 हजार रुपयांव्यतिरिक्त राज्य शासनाचे 6 हजार रुपये आणखी भर घालून आता 12 हजार रुपये शेतकऱ्यांना देण्यात येत आहेत.

            एखादी योजना सुरु करणे सोपे काम नाही. तसेच ती एका दिवसातही तयार होत नाही. लाडकी बहीण योजना तयार करण्याचे काम 1 वर्षापासून सुरु होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच महिला व बाल कल्याण मंत्री अदिती तटकरे यांच्यासह सर्व विभागांचे अपर मुख्य सचिव, सचिव  यांच्या परिश्रमामुळे ही योजना यशस्वी झाली आहे. गडचिरोली सारख्या जिल्ह्यापर्यंत योजना पोहचवल्याबद्दल सर्व अधिकारी वर्गाचे मी अभिनंदन करतो.

            महिलांना सक्षम  व आत्मनिर्भर बनवणे हा शासनाचा उद्देश आहे. त्यासाठी शासन व प्रशासन अहोरात्र काम करत असल्याचेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यावेळी म्हणाले.

            यावेळी महिला व बाल कल्याण विभागाचे सचिव अनुपकुमार यादव यांच्यासह राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि लाभार्थी महिला दूरदृष्य प्रणालीद्वारे उपस्थित होत्या.
00000






No comments:

Post a Comment

वृत्त क्र. 1060 राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून तीन दिवसात 8 लाख 17 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त नांदेड जिल्हयाच्या दलाकडून 7 ते 9 नोव्हेंबर ...