Tuesday, October 29, 2024

वृत्त क्र. 1001

सावधान ! उमेदवारांच्या सोशल मिडीया खात्यांची तपासणी होणार

·         कोणत्याही परिस्थितीत आचारसंहितेचा भंग होऊ देऊ नका

·         आक्षेपार्ह पोस्टस, फेकन्यूज, अफवा पसरविणाऱ्यांवर करडी नजर

नांदेड दि. 29 ऑक्टोबर :- नांदेड लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीला गती आली असून आता उद्या 30 ऑक्टोबर रोजी छाननी व 4 नोव्हेंबर पर्यंत अर्ज परत घेतले जाणार आहेत. या उमेदवारांना अर्ज दाखल करतांना त्यांचे कोणते समाज माध्यम आहेत हे देखील नमूद करावे लागते. या सर्व समाज माध्यमांची दररोज तपासणी एमसीएमसीच्या समाज माध्यम शाखेकडून होणार आहे. त्यामुळे उमेदवारांनी आचारसंहितेचा भंग होणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. 

लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत एकदा उमेदवार निश्चित झाल्यानंतर उमेदवारांची जबाबदारी वाढणार आहे. भारत निवडणूक आयोगाने खर्च, प्रसिद्धी, प्रचार, सभा, रॅली, प्रचाराचा कालावधी, वृत्तपत्रात द्यावयाच्या जाहिराती, समाज माध्यमांवरील जाहिराती तसेच आदर्श आचारसंहितेचे पालन करण्याबाबत कडक नियम केले आहेत. नांदेड जिल्ह्यामध्ये याची प्रभावी अंमलबजावणी होत आहे. त्यामुळे अन्य बाबींप्रमाणेच आपले सोशल मिडिया हॅन्डल ज्यामध्ये फेसबूक, टिव्टर, इन्स्ट्राग्राम, युट्यूब, व्हॉटसॲप या सर्व खात्यांना हाताळतांना अतिशय जबाबदार लोकांची नेमणूक करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. 

जिल्ह्यामध्ये मोठ्याप्रमाणात उमेदवार विधानसभा निवडणूक व लोकसभा पोटनिवडणुकीत सहभागी होण्याची अपेक्षा आहे. या पार्श्वभूमीवर यासंदर्भातील प्रशासनाचे आवाहन महत्व्ीपूर्ण ठरले आहे. कोणतीही सार्वत्रिक पोस्ट टाकायची असल्यास व्हिडिओ ऑनलाइन पाठवायचा असल्यास जिल्हाधिकारी कार्यालयातील माध्यम प्रमाणिकरण व सनियंत्रण समिती अर्थात एमसीएमसी समितीची लेखी परवानगी घेणे आवश्यक आहे. उमेदवाराने  नेमलेल्या अधिकृत प्रतिनिधीमार्फत ही परवानगी घेता येईल. त्यामुळे परवानगी घेऊन पोस्ट करा. व्यक्तीगत पोस्ट करतांना परवानगीची गरज नाही. मात्र आचारसंहितेचा भंग होणार नाही याची काळजी घ्यावी, असेही आवाहन प्रशासनाने केले आहे.

नागरिकांसाठी सूचना

याशिवाय या काळामध्ये सामान्य नागरिकांनी देखील अतिशय सजगतेने समाज माध्यमांचा वापर करावा. गेल्या निवडणुकीत जवळपास 26 गुन्हे दाखल झालेले आहेत.  समाज माध्यमांवरील पोस्ट हेच प्रथमदर्शनी पुरावे असल्यामुळे यामध्ये गंभीर गुन्हे दाखल होतात. त्यामुळे निवडणुकासंदर्भात व्यक्त होतांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

00000


No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...