वृत्त क्रमांक 169
सेफर इंटरनेट डे - डिजिटल सुरक्षा व जबाबदारीच्या दिशेने एक पाऊल
नांदेड दि. 11 फेब्रुवारी :- आज सेफर इंटरनेट डे मोठ्या उत्साहात नांदेड येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या माहिती तंत्रज्ञान विभागात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांमध्ये सुरक्षित इंटरनेट वापर, सायबर सुरक्षा, आणि जबाबदारीने डिजिटल वर्तन याबद्दल जागरूकता निर्माण करणे हा होता. या कार्यक्रमास प्रमुख व्याख्याते म्हणून अति. जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी प्रदीप डुमणे उपस्थित होते. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना इंटरनेटच्या सुरक्षित वापराबाबत मार्गदर्शन केले. व्याख्यानात त्यांनी सायबर गुन्हे, फिशिंग हल्ले, ऑनलाइन फसवणूक, सुरक्षित पासवर्ड व्यवस्थापन आणि डिजिटल स्वच्छतेच्या (Digital Hygiene) मूलभूत गोष्टींवर सखोल चर्चा केली. तसेच डिजिटल माध्यमांचा जबाबदारीने आणि सुरक्षितपणे उपयोग कसा करावा, याविषयी उपयुक्त माहिती दिली. विद्यार्थ्यांनी या व्याख्यानात मोठ्या संख्येने सहभाग घेतला आणि आपल्या दैनंदिन जीवनातील इंटरनेटच्या वापराबाबत विविध प्रश्न विचारले. त्यांना सायबर सुरक्षेशी संबंधित विविध बाबींबाबत महत्त्वाची माहिती मिळाली.
जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड येथेही सेफर इंटरनेट डे निमित्त जनजागृतीसाठी विशेष डॅशबोर्ड प्रदर्शित करण्यात आला. या डॅशबोर्डद्वारे नागरिकांना डिजिटल सुरक्षिततेच्या विविध उपाययोजना, सायबर हल्ल्यांपासून संरक्षण करण्याचे मार्ग आणि सुरक्षित इंटरनेट व्यवहार याविषयी माहिती देण्यात आली. डॅशबोर्डवर प्रदर्शित केलेल्या व्हिडिओ आणि प्रतिमा नागरिकांसाठी अत्यंत माहितीपूर्ण ठरल्या. यामध्ये डिजिटल साक्षरता, सायबर गुन्ह्यांपासून बचाव, आणि इंटरनेट सुरक्षिततेबाबत जागरूकता निर्माण करणाऱ्या माहितीपटांचा समावेश होता. या उपक्रमामुळे नागरिकांना फसवणुकीच्या लिंक ओळखण्याचे तंत्र, सुरक्षित संकेतशब्द वापरण्याची गरज आणि ऑनलाइन व्यवहार करताना घ्यावयाची काळजी यासारख्या महत्त्वाच्या बाबी समजून घेण्यास मदत झाली.
कार्यक्रमाचे उद्दिष्ट आणि परिणाम:
या कार्यक्रमाद्वारे विद्यार्थ्यांसह नागरिकांना सायबर सुरक्षेच्या धोरणांबद्दल आणि जबाबदारीने डिजिटल साधने कशी वापरावीत याबद्दल जागरूकता मिळाली. इंटरनेटचा वाढता वापर आणि त्यासोबत वाढणारे सायबर गुन्हे लक्षात घेता, प्रत्येकाने स्वतःच्या डिजिटल सुरक्षिततेबाबत सजग राहणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
मुख्य उद्दिष्टे:
इंटरनेट सुरक्षितता : सायबर गुन्हे, फसवणूक, फिशिंग, मालवेअर आदींपासून संरक्षण करण्यासाठी जनजागृती करणे.
गोपनीयतेचे संरक्षण : वैयक्तिक माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी आवश्यक उपाययोजनांची माहिती देणे.
डिजिटल जबाबदारी : इंटरनेटचा जबाबदारीने वापर करण्यासह योग्य ऑनलाइन वर्तन शिकवणे.
सायबर धमकी आणि फसवणुकीपासून बचाव: ऑनलाइन छळ आणि फसवणुकीविरोधात जनजागृती करणे.
तंत्रज्ञानाचा सकारात्मक वापर : इंटरनेटचा शिक्षण, संशोधन, आणि सर्जनशीलता वाढवण्यासाठी कसा उपयोग करता येईल यावर भर देणे.
000000
No comments:
Post a Comment