जागतिक पर्यावरण दिनापासून
लोकसहभागातून वृक्ष लागवडीच्या मोहिमेचा शुभारंभ
नांदेड, दि. (जिमाका) 3 :- दिवसेंदिवस वृक्षतोडीमुळे पर्यावरणाचा झालेला ऱ्हास हा आता सर्वांच्या लक्षात यायला लागलेला आहे. मागील काही वर्षांपासून पर्यावरण जनजागृती आणि वृक्षलागवड यासाठी अनेक सेवाभावी संस्था शासनासमवेत पुढे आले आहेत. तथापि वृक्षलागवडीची चळवळ ही आता कोविड-19 पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या ऑक्सिजन सारख्या प्रश्नापासून नव्या भूमिकेतून पुढे जाणे गरजेचे आहे. बदलते संदर्भ लक्षात घेत औरंगाबाद विभागीय आयुक्त कार्यालयामार्फत वृक्ष लागवड मोहिमेची चळवळ ही अधिकाधिक लोकसहभागातून प्रत्येकाच्या श्वासाशी निगडीत व्हावी यादृष्टिने येत्या 5 जून पासून संपूर्ण मराठवाडाभर राबविली जात आहे. अर्थात 5 जून जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून प्रत्येक नागरिकाने किमान 3 वृक्ष लावून त्यांचे संगोपन करावे, असे आवाहन मराठवाडा विभागाचे आयुक्त सुनिल केंद्रेकर यांनी केले आहे.
पर्यावरण संतूलनात लहान झूडपापासून मोठ्या वृक्षापर्यंत असलेली जैव विविधता, नदि, छोटे नाले, ओहोळ अर्थात नदिची परिसंस्था व या सर्वांचे तेवढेच महत्व असते. कोविड-19 च्या प्रादुर्भावानंतर ऑक्सिजनची निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता पुन्हा एकदा या आजाराने अप्रत्यक्ष प्रत्येक मानव जातीला निसर्गाकडे जबाबदारीने पाहण्याची व निसर्गाला आपल्याकडून पुन्हा काही वापस करण्याची संधी दिली आहे. मागील वर्षाच्या 30 जानेवारी पासून ते आतापर्यंत आपल्या देशात जवळपास 2.3 कोटी लोकांना बाधा होऊन गेली. यात 2.22 लाख लोकांना आपल्या प्राणास मुकावे लागले. अजूनही 34 लाख 78 हजार लोकांवर उपचार सुरु आहेत. यातील कित्येकजण मृत्यूशी झूंज देत आहेत.
हा आजार आपल्या श्वसनयंत्रणेवर, शरिरातल्या ऑक्सिजनवर घाला घालणारा ठरल्यामुळे पुन्हा एकदा प्राणवायुचे मोल व त्याची किंमत आपल्या लक्षात आली आहे. पहिल्या लाटेत देशाला 28 हजार मे. टन कृत्रिम प्राण वायुची गरज प्रतिदिन पर्यंत पोहचली होती. दुसऱ्या लाटेत हीच गरज 5 हजार मेट्रीक टनपर्यंत पोहचली.
कृत्रिम वायु हा जो हवेत उपलब्ध आहे तोच गोळा केला जातो, निर्माण केला जातो. काही प्रमाणात ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर वापर करुन स्थानिक पातळीवर थोडी बहुत गरज भागविली गेली. तथापि कृत्रिम माध्यमातून ऑक्सिजन निर्मिती ही अप्रत्यक्ष खर्चिक व न परवडणारी आहे हे लक्षात आले. निसर्गात निर्माण होणारे ऑक्सीजन / प्राणवायु हा वृक्षाच्याच माध्यमातून होतो. झाड केवळ शोभा देत नाही तर निसर्गातील प्रदुर्षण शोषून घेवून हवेमध्ये प्राणवायु सोडण्याचे काम करतो. एका व्यक्तीला वर्षभरात जेवढा प्राणवायू लागतो तेवढा 7 ते 8 वृक्षांच्या माध्यमातून उपलब्ध होऊ शकतो.
निसर्गाची ही देण
लक्षात घेता प्रत्येक नागरिकांनी वृक्ष लागवडीसाठी उर्त्स्फूत सहभाग घेवून येत्या
5 जून जागतिक पर्यावरण दिनाच्या औचित्याने वृक्ष लागवडीच्या या महालोक सहभाग
चळवळीत सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.
00000
No comments:
Post a Comment