Wednesday, June 3, 2020

रुंद सरी वरंबा पद्धतीने सोयाबीन पेरणीचे प्रात्यक्षिक



नांदेड (जिमाका) दि. 3 :- नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत गंगाबेट गावाची सन 2020-21 साठी निवड करण्यात आली. गंगाबेट गावामध्ये प्रक्षेत्रावर रुंद सरी वरंबा पद्धतीने सोयाबीन पेरणीचा प्रात्यक्षिक कार्यक्रम आज आयोजीत करण्यात आला होता.
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे यांच्या मार्गदर्शनाखाली गावांमध्ये या प्रकल्पांतर्गत विविध उपक्रम राबविण्याचे नियोजन असून त्याचाच एक भाग म्हणून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
     यावेळी नांदेड उपविभागीय कृषी अधिकारी आर. टी.  सुखदेव यांनी शेतकऱ्यांना रुंद सरी वरंबा पद्धतीद्वारे पेरणी केल्याने एकरी आठ ते दहा किलो बियाण्याची बचत होते. जमिनीतील अतिरिक्त पाण्याचा सरी मधून निचरा होतो. अवर्षण प्रवण कालावधीत पिकांस ओलावा उपलब्ध होतो. सोयाबीन पिकांची वाढ झाल्यास फवारत असताना सापा पासून संरक्षण मिळते असे सांगितले.
नांदेड तालुका कृषी अधिकारी बी. एस. शिंगाडे यांनी ट्रॅक्टरवरील बीबीएफ पेरणी यंत्र उपलब्ध नसताना तिफणीने तीन ते चार ओळीनंतर एक सरी पाडावी. बियाणे उगवण क्षमता तपासूनच पेरणी करावी, असे सांगितले.
नांदेड तालुक्यातील प्रगतिशील शेतकरी आनंदराव तिडके यांनी प्रत्यक्ष ट्रॅक्टरवर बीबीएफद्वारे (रुंद सरी वरंबा) पेरणीचे प्रात्यक्षिक करुन दाखवले. शेतकऱ्यांनी बीज प्रक्रिया करुन पेरणी करावी. बीज प्रक्रिया मुळे बुरशीजन्य रोगांचा प्रार्दुभाव कमी होतो. उगवण चांगली होते असे आपल्या मार्गदर्शनातून सांगितले.
या कार्यक्रमाचे आयोजन मंडळ कृषी अधिकारी एस. एम. सावंत, गंगाबेटचे कृषी सहायक वसंत जारीकोटे, समूह सहायक बेग ए. एम. यांचेकडून शेतकरी वीरभद्र अडगावकर यांच्या शेतावर करण्यात आले.
या प्रशिक्षण कार्यक्रमास कृषी सहायक भंडारे चंद्रकांत, गंगाबेटचे सरपंच संभाजी गोडबोले, पोलीस पाटील शिवाजी सोनटक्के, उपसरपंच बसवेश्वर मुक्तापुरे, तंटामुक्ती अध्यक्ष कोंडीबा सोनटक्के, वीरभद्र अडगावकर, लहूसोनटक्के, बळीराम सोनटक्के, राधाकिशन गोडबोले, महेश सोनटक्के, सदाशिव सोनटक्के, गजानन मोरे यांच्यासह मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची उपस्थिती होती.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वसंत जारीकोटे यांनी केले तर आभार समूह सहायक बेग यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बसवेश्वर मुक्तपुरे, लहू सोनटक्के, वीरभद्र अडगावकर आदींनी प्रयत्न केले.
00000

No comments:

Post a Comment

 लक्षवेध :नांदेड जिल्ह्यातील विधानसभा निहाय मतदानाची अंदाजीत अंतिम आकडेवारी लक्षवेध : नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीतील अंदाजीत अंतिम आकडेवारी वि...