Thursday, October 28, 2021

आरोग्यवर्धक दिपावलीसाठी ज्यांनी लस घेतली नाही त्या येणाऱ्या नातेवाईकांसह नांदेडकरांनाही लसीकरणासाठी घ्यावा पुढाकार

- जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर 

नांदेड, (जिमाका) 28 :- जिल्ह्यातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी शासनातर्फे लसीकरणावर मोठ्या प्रमाणात भर दिला असून जिल्हा प्रशासनाच्या सर्व यंत्रणा यासाठी शर्थीचे प्रयत्न करीत आहेत. येत्या काळात सर्वांच्या मनात आनंद पेरणारा दिवाळी व इतर सण असल्याने स्वाभाविकच इतर ठिकाणावरून नातेवाईक येण्याची शक्यता अधिक आहे. अशा स्थितीत नांदेड जिल्ह्यातील रहिवासीयांनी सर्वांची दिवाळी आरोग्यवर्धक होण्यासाठी जर लसीकरण करून घेतले नसेल तर त्यासाठी पुढे येऊन लसीकरण करुन घेणे अधिक हिताचे आहे. याचबरोबर येणाऱ्या नातेवाईकांचे जर लसीकरण झाले नसेल तर त्यांनाही लसीकरण करुन घेणे बंधनकारक असल्याचे जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी स्पष्ट करुन आवाहन केले आहे. 

बाहेरील गावावरुन नांदेडमध्ये व जिल्ह्यात येणाऱ्या सर्व नांदेडकरांनी याबद्दल अधिक दक्षता घेतली पाहिजे. ज्यांना नांदेड सोडून बाहेरगावी जायचे आहे त्यांनीही लसीकरण करुनच बाहेर गेले पाहिजे, असेही शासनाच्यावतीने स्पष्ट करण्यात आले आहे. जिल्ह्यातील वैद्यकिय महाविद्यालय, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय, जिल्हा सामान्य रुग्णालय, स्त्री रुग्णालय, मनपा रुग्णालय, नगरपालिका रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, सर्व ग्रामीण रुग्णालय, सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, नागरी दवाखाणे, आयुर्वेद व युनानी दवाखाणे, ग्रामपंचायत कार्यालय, अंगणवाडी केंद्र या ठिकाणी दिनांक 30 नोव्हेंबर 2021 पर्यंत 24 तास लसीकरण सुरू राहणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिली आहे. हे लसीकरण दिवसभर चालू राहिल, असे स्पष्ट करुन त्यांनी जास्तीत जास्त लोकांनी लसीकरण करुन घेण्याचे आवाहन करण्यासमवेत कायदेशीर ताकीदही दिली आहे.

0000


No comments:

Post a Comment

  वृत्त क्र. 1133 नांदेड जिल्ह्यातील 9 विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीत  भाजपचे 5, शिवसेनेचे 3 तर राष्ट्रवादी काँग्रेसचा 1 उमेदवार विजयी  नां...