Monday, March 6, 2023

 नांदेड जिल्हा कृषी महोत्सवास उदंड प्रतिसाद

 

नांदेड (जिमाका) दि. 6 :- राज्य शासनाचा कृषी विभाग, आत्मा आणि महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने नांदेड येथे दिनांक 1 ते 5 मार्च 2023 रोजी भव्य असा कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवात जवळपास 300 स्टॉल धारकांनी सहभाग घेतला. यामध्ये विशेषतः कृषी निविष्ठाधारक, ठिबक/तुषार कंपनीचे तसेच शेतीसाठी आवश्यक औजारे, मशिनरीचे स्टॉल व इतर कृषी संलग्न विभागांचे स्टॉल लावण्यात आले होते. रविवार 5 मार्च रोजी या कार्यक्रमाला समारोपीय समारंभासाठी आमदार राम पाटील रातोळीकर, आमदार  मोहनअण्णा हंबर्डे  यांची उपस्थिती होती.

 

यावेळी मान्यवरांच्या हस्ते सहभागी शेतकरी स्टॉल धारक, महिला बचतगट, शेतकरी उत्पादक कंपनी यांना प्रमाणपत्राचे वितरण करून त्यांचा गौरव करण्यात आला. समारोपीय कार्यक्रमात आमदार राम पाटील रातोळीकर यांनी शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञान माहिती होण्याकरिता या महोत्सवाच्या आयोजनाबाबत समाधान व्यक्त केले. आमदार मोहनआण्णा हंबर्डे यांनी शेतकऱ्यांना विक्री करता कायमस्वरूपी शेतकरी मॉल उभारण्याची संकल्पना मांडली व त्याकरिता पाठपुरावा करून निधी उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करू अशी ग्वाही दिली. उत्कृष्ट आयोजनाबाबत सर्व मान्यवरांनी कृषि विभागाचे कौतुक करून अशा पद्धतीचा कृषी महोत्सव भविष्यात सतत व्हावेत अशी अपेक्षा व्यक्त केली.

 

महोत्सवात आपला शेतमाल विक्री करता शेतकरी महिला बचतगट, शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकरीगट यांनी आणला होता. यामधून सुमारे एक कोटी रुपये किंमतीची उलाढाल झाली असून जवळपास 20 लाख किंमतीचा शेतमालाचे ॲडव्हान्स बुकिंग झाले आहे. सलग पाच दिवस चाललेल्या  महोत्सवामध्ये  विविध विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. याकरिता उत्कृष्ट मान्यवर वक्ते मार्गदर्शनांसाठी लाभले असून शेतकरी व महिलांचा  चांगला प्रतिसाद दिसून आला. त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षाचे औचित्य साधून पाककला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये 70 उत्सुक महिलांनी आपला सहभाग नोंदवून आपली पाककला सादर केली.

00000



No comments:

Post a Comment

वृत्त क्र.   93 दहावी परीक्षेच्या ऑनलाईन प्रवेशपत्राबाबत सूचना   नांदेड दि. 23 जानेवारी :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्ष...