देहदान सर्वश्रेष्ठ दान
मुलीने केले आईचे देहदान
नांदेड (जिमाका) दि. 19 :- मृत्यूनंतर देह हा जाळून, पुरुन नष्ट होण्यापेक्षा तो शैक्षणिक कार्यासाठी उपलब्ध करून देणे हे खऱ्या अर्थाने सामाजिक कार्य आहे. यासाठी नागरिकांनी देहदानाच्या चळवळीत सहभाग घेण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन अधिष्ठाता डॉ. वाकोडे यांनी केले आहे.
असाच दृष्टीकोन समोर ठेवून किनवट तालुक्यातील बोधडी बु. येथील सविता माधव श्रीरामवार वय 58 वर्ष यांचा मृत्यूपश्चात देह डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील शरीररचनाशास्त्र विभागात दान केला आहे. अधिष्ठाता डॉ.एस.आर.वाकोडे यांनी त्यांच्या कुटुंबीयांचे प्रशस्तीपत्र देऊन आभार व्यक्त केले. यावेळेस डॉ.अनुजा देशमुख, डॉ.अनिस रहेमान तसेच डॉ.इनामदार (जनऔषधी विभाग), नियोजन अधिकारी डोळे हे उपस्थित होते. डॉ.अनुजा देशमुख आणि डॉ. रहेमान तसेच शरीररचनाशास्त्र विभागातील संपूर्ण टीमने देहदानासाठी परिश्रम घेतले.
सविता माधव श्रीरामवर यांची देहदान करण्याची इच्छा होती ती त्यांची कन्या रुपाली माधव श्रीरामवार यांनी पुढे येऊन पूर्ण केली. त्या एक आशा वर्कर सुपरवायझर आहेत आणि त्यांच्या या कार्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. कोविडच्या कठीण काळात शरीररचनाशास्त्र विभागात मृतदेह हा स्वीकारता येत नव्हता. त्या कारणाने विभागात मृतदेहाची कमतरता भासत होती. कोविड नंतर देहदाना प्रती जनजागृती निर्माण होऊन बरेचजण आता पुढे येत आहेत. त्यामुळे ही पोकळी भरुन येत आहे. आणि याचा शैक्षणिक तसेच सामाजिक कार्यात खुप मोठा हातभार लागत आहे. समाजातील लोकांनी सविता माधव श्रीरामवार यांचा आदर्श समोर ठेवून देहदानाच्या चळवळीत सहभाग घ्यावा, असे अधिष्ठाता डॉ.वाकोडे यांनी कळविले आहे.
00000
No comments:
Post a Comment