Thursday, June 18, 2020

सुधारीत विशेष वृत्त क्र. 548


जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांची
पॉझिटिव्ह बाधितांशी विचारपूस
कोविड डेडिकेटेड वार्डात जाऊन प्रत्यक्ष पाहणी  
नांदेड (जिमाका) दि. 18 :- वेळ दुपारी तीनची. पावसाची रीमझीम जोर धरुन सुरु झालेली. अशा या वातावरणात जिल्हाधिकारी डॉ. विपीन हे डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या कोविड डेडिकेटेड सेंटरला पोहचतात. अगोदर सर्व बाहेरील परिस्थितीची पाहणी करतात. त्यांच्या समवेत अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत म्हस्के, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर, वैद्यकीय अधीक्षक वाय. एच. चव्हाण, बालरोग विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. अरविंद चव्हाण, औषध वैद्यक शास्त्राचे प्राध्यापक डॉ. भुरके, सहयोगी प्राध्यापक डॉ. शितल राठोड हेही असतात. संपूर्ण परिसराची पाहणी करुन ते एका-एका गोष्टीचा आढावा घेतात. याठिकाणी पाणी पुरवठ्याची सुविधा अधिक परिपूर्ण व्हावी यासाठी महानगरपालिकाअंतर्गत स्वतंत्र पाईपलाईनची व्यवस्था तात्काळ कशी करता येईल याचे नियोजन सुरु असते. याच नियोजनात प्रत्यक्ष विष्णुपुरी प्रकल्पाला जावून तेथील प्रत्यक्ष पाहणी करण्याचे त्यांचे नियोजन होते.
तथापि कोविड डेडिकेटेड सेंटरला आपण आलोच आहोत तर प्रत्यक्ष बाधित पेशंट यांच्याशी चर्चा केल्यास नेमकी माहिती आपल्याला मिळेल म्हणून जिल्हाधिकारी डॉ. विपीन त्यांना भेटण्याचा निर्णय घेतात. त्यांच्यासोबत असलेल्या डॉक्टरांची काळजीवजा धांदल उडते. पीपीईकीट घालून सुरक्षिततेचे जे नियम आहेत त्याचे पालन करुन ते सरळ कोविड डेडिकेटेड वार्डात जाऊन पॉझिटिव्ह पेशंटशी चर्चा करतात. या वार्डात असलेल्या सर्व 17 बाधितांबरोबर ते मनमोकळ्या गप्पा मारतात. स्वत: जिल्हाधिकारी येथे येवून प्रत्यक्ष पाहणी करुन सुविधा कशा मिळतात याची सहानुभूतीने चौकशी करीत असल्याने काही पेशंटचे हात नकळत जोडले जातात. इथल्या सुविधा तुम्हाला चांगल्या वाटतात का ? काही अडचणी आहेत का ? आहार चांगला मिळतो का ? अशी ते पेशंटला सरळ विचारणी करतात. उपलब्ध असलेल्या सर्व सुविधा उत्तम असल्याचे सांगत कोविड पेशंट आपला कृतज्ञता भाव व्यक्त करतात. घाबरु नका, यातून तुम्ही शंभर टक्के बरे व्हाल असा विश्वास डॉ. विपीन प्रत्येकाच्या मनात पेरत सरळ शौचालयाच्या पाहणीसाठी वळतात. सोबत असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सुचना देवून जिल्हाधिकारी डॉ. विपीन विष्णुपुरी प्रकल्पाच्या पाहणीसाठी रवाना होतात.
0000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्रमांक   461 शेतकऱ्यांना बियाणे, खते, कीटकनाशके यांची कमतरता भासू देऊ नका  : पालकमंत्री अतुल सावे                                  ...