Friday, June 5, 2026

 वृत्त क्रमांक 

लोकप्रशासनाच्या क्षेत्रात संशोधन, प्रशिक्षण व प्रशासकीय सुधारणेला दिशा मिळणार

आय.आय.पी.ए. व स्वा. रा. ती. म. विद्यापीठ यांच्यात

शैक्षणिक व प्रशासकीय सहकार्यासाठी सामंजस्य करार संपन्न 

नांदेड दि.५ जून:- इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक एडमिनीस्ट्रेशन,नवी दिल्ली ही  भारत सरकारच्या कर्मचारी, लोकतक्रार व निवृत्तीवेतन मंत्रालयाअंतर्गत  लोकप्रशासनाच्या क्षेत्रात संशोधन, प्रशिक्षण व प्रशासकीय सुधारणा विषयी कार्य करणारी लोकप्रशासन क्षेत्रातील सर्वोच्च संस्था आहे. नांदेडचे जिल्हाधिकारी  तथा IIPA नांदेड शाखेचे पदसिद्ध अध्यक्ष राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली या राष्ट्रीय संस्थेची नांदेड येथे शाखा   स्थापन  करण्यात आली आहे.    लोकप्रशासन विषयात  संशोधन , प्रशिक्षण  व प्रशासकीय सुधारणा या क्षेत्रातील सहकार्य वृद्धिंगत करण्यासाठी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक एडमिनीस्ट्रेशन (IIPA) आणि स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड यांच्यात सामंजस्य करार (MoU) करण्यात आला आहे. 

विद्यापीठाच्या कुलगुरू महोदयांच्या दालनात संपन्न झालेल्या एका कार्यक्रमात IIPA नांदेड शाखेचे पदसिद्ध अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी राहुल कर्डिले  (भा.प्र.से.) व स्वा.रा.ती.म. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांनी या सामंजस्य करारावर स्वाक्षरी  केली आहे.  यावेळी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. अशोक महाजन, कुलसचिव डॉ. डी. डी. पवार, IIPA नांदेड शाखेचे सचिव तथा देगलूर महाविद्यालयातील लोकप्रशासन विभागप्रमुख प्रा. डॉ. बी.आर.कतुरवार , विद्यापीठातील नवोपक्रम विभागाचे संचालक डॉ. एस.जे.वाढेर, आयक्यूएसी समन्वयक डॉ.सुरेंद्रनाथ रेडडी, IIPA  कोषाध्यक्ष व प्रतिभा निकेतन महाविद्यालयातील लोकप्रशासन विभागप्रमुख डॉ.दीपक वाघमारे , यशवंत महाविद्यालयातील लोकप्रशासन विभागप्रमुख डॉ.मीरा फड , म.फुले महाविद्यालय मुखेड येथील लोकप्रशासनाचे प्रा.  डॉ.चांदोबा कहाळेकर उपस्थित होते.

या सामंजस्य कराराची प्रमुख उद्दिष्ट्ये लोकप्रशासनाच्या विद्यार्थ्यांना प्रशासकीय व्यवस्थेचे प्रात्यक्षिक ज्ञान देणे, विद्यापीठ  व जिल्हा प्रशासन यांच्यातील संरचित व शाश्वत भागीदारी प्रस्थापित करणे,  लोकप्रशासन व सामाजिक शास्त्रात केल्या जाणा-या संशोधनाचा उपयोग प्रशासकीय सुधारणा व विविध विकासात्मक योजनांची प्रभावीपणे अमलबजावणीसाठी करता यावा, बी.ए.व एम.ए. लोकप्रशासनाच्या विद्यार्थ्यांना जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, महानगरपालिका येथे आँन जॉब ट्रेनिंग,  इंटर्नशिप, क्षेत्र भेटी व प्रकल्प  अभ्यासाच्या माध्यमातून प्रत्यक्ष कामकाजाचा अनुभव मिळणार आहे. IIPA व विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने प्रशासकीय अधिकारी,कर्मचारी,  प्राध्यापक,  विद्यार्थी, संशोधक यांच्या  शैक्षणिक,प्रशासकीय  व व्यावसायिक संवर्धनासाठी विशेष व्याख्याने, चर्चासत्र,परिसंवाद कार्यशाळा व मॉक इंटरव्ह्यू आयोजित केले जाणार  आहेत. विद्यार्थ्यांना UPSC/MPSC च्या तयारीसाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरणार आहे.  विद्यापीठाच्या पायाभूत सुविधांचा  व शैक्षणिक वातावरणाचा उपयोग लोकप्रशासन व्यवस्थेत संशोधन, प्रशिक्षण, प्रशासकीय सुधारणा व समाज उपयोगी  कार्यासाठी करता येणार आहे.  भविष्यकाळात नांदेड विद्यापीठ व जिल्हा प्रशासन यांच्या सहयोगातून नांदेड प्रशासकीय सुधारणा,  संशोधन व प्रशिक्षणाचे केंद्र म्हणून विकसित होईल. प्रशासन व्यवस्था अधिक गतिमान होण्यासाठी,  प्रभावी सुशासन  विकसित करण्यासाठी  संयुक्त संशोधन प्रकल्प राबवले जाणार आहेत. यातून निघणाऱ्या निष्कर्षांच्या आधारे केंद्र व महाराष्ट्र शासनाला धोरणात्मक शिफारशी केल्या जातील. 

याप्रसंगी बोलताना कुलगुरू डॉ. मनोहर चासकर  म्हणाले, "हा करार केवळ कागदावरचा न राहता, मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना शासन स्तरावर धोरणनिर्मिती, सुशासन व प्रशासकीय सुधारणा कार्याशी जोडणारा दुवा ठरेल.  व लोकप्रशासन विषयात केल्या जाणाऱ्या संशोधनाच्या उपयोग शासन स्तरावर प्रभावी धोरण निर्मितीसाठी होईल.  IIPA  नांदेड शाखेचे पदसिद्ध अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी राहुल कर्डिले  (भा.प्र.से.) असे म्हणाले की,  विद्यापीठात केल्या जाणाऱ्या  संशोधन कार्य अथवा प्रकल्प शीर्षक ठरविताना प्रशासकीय अधिकारी वर्गाला येणाऱ्या समस्यांचा अभ्यास विद्यापीठ स्तरावर होणे आवश्यक आहे. तसेच त्यातून निघणारे निष्कर्ष व शिफारशी हे विविध  शासकीय योजनांच्या प्रभावी अमलबजावणीसाठी झाला पाहिजे. नागरिकांना दैनदिन जीवनात विविध प्रमाणपत्र काढताना व शासकीय योजनांचा लाभ घेताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते त्यासाठी समाजास व शासन प्रशासनास  उपयुक्त असे संशोधन कार्य झाले पाहिजे, समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी विद्यापीठात पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेऊन बाहेर पडणारा विद्यार्थी गुणवत्तासंपन्न व सर्व द्र्ष्टीने परिपूर्ण  बनला  पाहिजे, त्यासाठीच कॉपीमुक्त परीक्षा आयोजनाला महत्व देण्यात आले आहे. आय.आ.पी.ए. व स्वा. रा. ती. म. विद्यापीठ यांच्यातील  सामंजस्य करार हा लोकप्रशासन विषयात केले  जाणारे संशोधन हे प्रशासकीय सुधारणेसाठी व सुशासनाच्या विकासासाठी उपयुक्त ठरणार आहे. सामंजस्य करार कार्यक्रमाचे प्रास्ताविक आय.आय.पी.ए.चे  सचिव  डॉ.बी.आर.कतुरवार  यांनी केले तर आभार विद्यापीठातील नवोपक्रम विभागाचे संचालक डॉ. एस.जे.वाढेर यांनी मानले.

00000




No comments:

Post a Comment

  वृत्त क्रमांक   लोकप्रशासनाच्या क्षेत्रात संशोधन, प्रशिक्षण व प्रशासकीय सुधारणेला दिशा मिळणार आय.आय.पी.ए. व स्वा. रा. ती. म. विद्यापीठ यां...