Saturday, February 22, 2025

वृत्त क्रमांक 213

दर्जेदार सांस्कृतिक कार्यक्रमाने पहिला दिवस गाजवला 

महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेमध्ये एकापेक्षा एक सादरीकरण 

नांदेड दि.२२ फेब्रुवारी : गायन, अभिनय, दिग्दर्शन,वादन सर्वच क्षेत्रात एकापेक्षा एक दमदार सादरीकरणामुळे महसूलच्या सांस्कृतिक कार्यक्रमाला वेगळीच रंगत चढली आहे.महसूल विभागाने काल दर्जेदार सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून सर्वांना थक्क केले.

२१, २२ व २३ फेब्रुवारीला राज्यस्तरीय महसूल व क्रीडा सांस्कृतिक स्पर्धा नांदेड येथे होत आहे. १० ते १२ वर्षाच्या कालावधीनंतर होणाऱ्या या स्पर्धांमध्ये सांस्कृतिक स्पर्धा देखील तेवढ्याच दर्जेदार होत असून काल नागपूर, कोकण,नाशिक आणि जमाबंदी आयुक्त कार्यालयाच्या चमुने सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण केले.

नागपूर विभागाने आदिवासी भागात लोकप्रिय असलेल्या रेला नृत्य सादर केले. वादन गायन या प्रकारातही नागपूरचे सादरीकरण अप्रतिम होते. कोकण विभागाने देखील अप्रतिम असे नाटक सादर केले. या नाटकामध्ये त्यांनी नृत्य, वादन ,गायन, सर्व प्रकार घेतले.

सध्याची पिढी मोबाईल आणि सोशल मीडियाच्या गर्तेत जगणे विसरून गेली आहे. अंतर्मुख झालेली पिढी मानसिक दृष्ट्या कमकुवत होत असल्याचे समाजातील कटू सत्य त्यांनी या नाट्यछटेतून व्यक्त केले. या सांस्कृतिक कार्यक्रमाला जिल्हाधिकारी राहुल कर्डिले,यापूर्वीचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, सातारा जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

काल दुपारी नागपूरचे जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर, यवतमाळचे जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिय,जालना जिल्हाधिकारी श्रीकृष्णनाथ पांचाळ, हिंगोली जिल्हाधिकारी अभिनव गोयल, रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी विविध कार्यक्रमाला उपस्थिती लावली.

जवळपास दोन हजाराच्या वर अधिकारी कर्मचारी या कार्यक्रमांसाठी व क्रीडा स्पर्धांसाठी नांदेडमध्ये आले आहे रात्री उशिरापर्यंत चालणारे सांस्कृतिक कार्यक्रम हा एक या कर्मचाऱ्यांसाठी गेट-टुगेदर सारखा कार्यक्रम असतो त्यामुळे यशवंत महाविद्यालयाच्या प्रांगणातील भव्य मंडप देखील अपुरा पळावा इतकी गर्दी या कार्यक्रमांना होत आहे.

शनिवारी सायंकाळी अमरावती, छत्रपती संभाजी नगर व पुणे विभागाचे सादरीकरण होणार आहे. रविवारी बक्षीस वितरणामध्ये अधिकृत विजेत्याची घोषणा केली जाणार आहे. पहिल्या दिवसाच्या सांस्कृतिक सोहळ्याचे उद्घाटन जथेदार गुरुद्वारा लंगर साहेबचे संत बाबा बलविंदर सिंग जी व सहआयुक्त राज्य वस्तू सेवा कर विभाग अभिजीत राऊत, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्यासह विविध विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झाले.

000000










No comments:

Post a Comment

महत्वाचे वृत्त  क्रमांक   216 प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा २ अंतर्गत  नांदेड जिल्ह्यातील १ लक्ष २० हजार लाभार्थीना पाहिला हप्ता वित...