Friday, December 8, 2023

 अभ्यासासोबत खेळांनाही महत्व द्या

-         मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल 

·          मतदार जागृती व स्वच्छता मोहिमेत युवकांचा सहभाग आवश्यक

 

नांदेड, (जिमाका) दि. 8 :- युवकांनी आयुष्याच्या यशस्वी वाटचालीसाठी समाजाचे दडपण न बाळगता निर्भयपणे आपल्या आवडीचे जे क्षेत्र आहे त्यात काम केले पाहिजे. आपला वेगळे मार्ग निवडले पाहिजेत. नव्या दिशा, नवीन संधी शोधून नवनवीन आव्हाने पेलण्याची क्षमता स्वत:च्या अंगी रुजवून निरोगी आरोग्यासाठी अभ्यासासोबत खेळाला ही प्राधान्य युवकांनी दिले पाहिजे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी केले.

 

डॉ. शंकरराव चव्हाण सभागृहात विभागीय युवा महोत्सवाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी त्या बोलत होत्या.  यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे, जिल्हा युवा अधिकारी चंदा रावळकर, राज्य निवडणूक दूत डॉ. सान्वी जेठवाणी आदी तसेच लातूर, धाराशिव, नांदेड जिल्ह्यातील युवा महोत्सवात सहभाग नोंदविलेल्या युवकांची मोठया प्रमाणात उपस्थिती होती.

 

सध्याचा युवक नैराश्य, समाजाचे दडपण घेवून शिक्षणाचे मार्ग शोधण्यावर भर देताना दिसून येत आहेत. युवकांच्या यशस्वी जीवनासाठी कामात कल्पकता, स्वावलंबन, निरोगी आरोग्य यातच यशस्वी जीवनाचा मार्ग असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी सांगितले. आपण स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष साजरे करीत आहोत. हे वर्ष साजरे करीत असताना सामाजिक जबाबदारीने मतदार जागृती व परिसराची स्वच्छता या मोहिमेत प्रत्येकांनी सहभाग नोंदवावा, असे त्यांनी सांगितले. आपल्या घरासह, परिसराची स्वच्छता व मतदान यादीत नाव नोंदविण्याचा प्रत्येकानी संकल्प करावा, असेही त्यांनी सांगितले.

 

युवा महोत्सवात युवकांचा सर्वागिण विकास करणे, देशाची संस्कृती व परपंरा जतन करणे, राष्ट्रीय एकात्मता वाढीस लावणे, तणधान्याचे महत्व, शिक्षण, उद्योग व्यवसाय या सोबतच शेती या व्यवसायाशी युवकाची ओळख करुन देणे, सामाजिक विकासात विज्ञानाचे महत्व पटवून देणे या बाबीवर युवा महोत्सव साजरा करण्यात येत आहे. या युवा महोत्सवात सामाजिक जाणीवासोबत तृणधान्याचे महत्व, तसेच या भागात जे पिकते तेच खाण्यावर प्रत्येकांनी भर दिला पाहिजे असे स्पष्ट मत डॉ. सान्वी जेठवाणी यांनी युवकांना सांगितले. यासोबत 18 वर्ष पूर्ण केलेल्या प्रत्येक युवकांनी मतदानासाठी जागरुक राहून मतदान ओळखपत्र काढून घ्यावे. तसेच मतदान करण्यासाठी जबाबदारीने पुढे यावे, असे आवाहन राज्य निवडणूक दूत डॉ. सान्वी जेठवाणी यांनी केले.

 

या विभागीय युवा महोत्सवात लातूर विभागातील धाराशिव, लातूर, नांदेड या तीन जिल्ह्यातील अंदाजे 300 युवक व युवती स्पर्धक सहभागी होणार आहेत असे जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले. कार्यक्रमाचे सुत्र संचालन श्रुती रावणगावकर यांनी तर आभार क्रीडा विभागाचे संजय बेत्तीवार यांनी मानले.

 

या विभागीय युवा महोत्सवात सांस्कृतिक कला प्रकार, कौशल्य विकास, संकल्पना आधारीत स्पर्धा, युवा कृती इत्यादी कलाकृतीचे सादरीकरण करण्यात येणार आहे. तसेच लावणी, गोंधळ, समुह लोकनृत्य, वैयक्तीक सोलो लोकनृत्य, लोकगीते यांचा समावेश असणार आहे. कथा लेखन, पोस्टर, वत्कृत्व, फोटोग्राफी स्पर्धा आणि संकल्पनावर आधारित स्पर्धा, युवा कृतीमध्ये हस्तकला, वस्त्रोद्योग, ॲग्रो प्रोडक्ट इत्यादी कलाकृतीचे सादरीकरण होणार आहे.

 

या विभागीय युवा महोत्सवासाठी विविध कलाप्रकाराचे परिक्षक म्हणुन प्रा.संदीप काळे, प्रा.पंकज खेडकर, डॉ.संदेश हटकर, प्रा.शुभम बिरकुरे, प्रा. शिवराज शिंदे, पांचाळ, डॉ. सिध्दार्थ नागठाणकर, श्रीमती कविता जोशी, डॉ.सिध्दार्थ नागठाणकर, कविता जोशी, जाहीर उमेर, डॉ. पुरण शेटटीवार, डॉ.बालाजी पेनुरकर, डॉ.मनिष देशपांडे, डॉ.संदपि काले, डॉ.पांडुरंग पांचाळ आदीनी काम पाहिले.

 

हा कार्यक्रम यशस्वी करणेसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका क्रीडा अधिकारी संजय गाढवे, क्रीडा अधिकारी संजय बेतीवार,.प्रवीण कोंडेकर, राज्य क्रीडा मार्गदर्शक तथा कार्यासन बालाजी शिरसीकर, चंद्रप्रकाश होनवडजकर, वरिष्ठ लिपीक संतोष कनकावार, व्यवस्थापक संजय चव्हाण, आनंद जोंधळे, हनमंत नरवाडे, उत्तम कांबळे, मोहन पवार,  सुभाष धोंगडे, चंद्रकांत गव्हाणे, सोनबा ओव्हाळ आदींनी परिश्रम घेतले. या युवा महोत्सवाचा नांदेड जिल्हयातील रसिकांनी लाभ घ्यावा, असे जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी कळविले आहे.

 0000






No comments:

Post a Comment

वृत्त क्र.   93 दहावी परीक्षेच्या ऑनलाईन प्रवेशपत्राबाबत सूचना   नांदेड दि. 23 जानेवारी :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्ष...