Tuesday, June 22, 2021

 

शासकीय तंत्रनिकेतन येथे समुदेशन केंद्राचे उद्घाटन 

नांदेड (जिमाका) दि. 22 :- शासकीय तंत्रनिकेतन नांदेड येथे 2021-22 या वर्षासाठी दहावी / बारावी पदविका प्रवेश प्रक्रिया संबंधी मार्गदर्शन करण्यासाठी समुदेशन केंद्राचे उद्घाटन संस्थेचे प्राचार्य डॉ. जी. व्ही. गर्जे यांच्या हस्ते करण्यात आले. तंत्रशिक्षण संचालक अभय वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पदविका प्रवेश प्रक्रिया जास्तीत जास्त विद्यार्थीभिमुख करण्यात आली आहे. 

विद्यार्थ्यांनी विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी प्रवेशाच्या अनुषंगाने येणाऱ्या विविध अडचणी सोडविण्यासाठी तसेच पदविका शिक्षणाचे महत्व, भविष्यातील नोकरीच्या संधी याबाबतची माहिती पालकांना व विद्यार्थ्यांना देण्यासाठी समुदेशन केंद्र संस्था स्तरावर सुरू करण्यात येत आहेत. 

कोविड-19 ची पार्श्वभूमी असतानाही गतवर्षी तंत्रनिकेतन मधील प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने मोठ्या प्रमाणावर यशस्वी झाली. यावर्षी तंत्रनिकेतन मधील प्रवेशासाठी केवळ दहावीचे गुणच ग्राह्य धरण्यात येणार असून वेगळी प्रवेश परिक्षा (सीईटी) असणार नाही. प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे, प्रवेश प्रक्रियेबाबत सविस्तर मार्गदर्शन यासाठी शासकीय तंत्रनिकेतन नांदेड येथे समुदेशन केंद्राचे उद्घाटन केले आहे. 

तज्ज्ञ प्राध्यापक याठिकाणी मार्गदर्शन करणार आहेत. याचा लाभ विद्यार्थ्यांनी व पालकांनी घ्यावा असे प्राचार्य डॉ. गर्जे यांनी यावेळी सांगितले. यावेळी विज्ञान विभागातील प्राध्यापक व प्रवेश समितील अधिकारी प्रा. एस. आर. मुधोळकर, प्रा. डॉ. ए. ए. जोशी, प्रा. ए. एन. यादव, प्रा. ए. बी. दमकोंडवार, प्रा. व्ही. एम. नागलवार, प्रा. एन. एस. देशमुख, प्रा. डॉ. जी. एम. डक, प्रा. ए. बी. राठोड, प्रा. के. एस. कळसकर, प्रा. डॉ. एस. व्ही. बेटीगेरी, प्रा. डॉ. डी. कोल्हटकर, प्रा. एस. जी. दुटाळ, शेख. म. जाविद.अ. आर. के. देवशी उपस्थित होते.



00000

No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...