Thursday, November 17, 2022

ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांना रिफ्लेक्टीव्ह टेप लावण्याचे निर्देश

नांदेड (जिमाका) दि. 17 :- जिल्ह्यातील ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांना रस्ता सुरक्षेच्या दृष्टीने सुरक्षितपणे ऊस वाहतूक करण्यासाठी कापडाचे परावर्तक किंवा रिफलेक्टीव टेप (रेडीयम) लावण्यात यावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिले आहेत.

जिल्ह्यात ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांनी त्यांच्या वाहनास कापडाचे परावर्तक किंवा रिफलेक्टीव टेप (रेडीयम) लावल्याशिवाय वाहतूक करु नये. ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये होणाऱ्या वाहतूकीमध्ये दोन ट्राली एकत्र करुन होणारी वाहतूक धोकादायक व बेकायदेशिर असून वाहनामध्ये अतिरिक्त भार झाल्यास त्यांचे संतुलन बिघडून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरच्या हेड समोर मोठया प्रमाणात शोभेच्या वस्तु लावण्यात येतात. त्यामुळे वाहनचालकास वाहन चालविताना समोरचे वाहन पाहण्यास अडचणी येतात. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा वाहनावर कारवाई करण्यात येणार आहे. वाहनधारकांनी त्यांच्या वाहनासमोरील भागामध्ये शोभेच्या वस्तु लावण्यात आलेल्या असल्यास त्या काढून टाकाव्यात.

रस्ता सुरक्षेच्या दृष्टीने प्रत्येक ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनास रिफलेक्टीव टेप (रेडीयम) किंवा कापडाचे परावर्तक शुक्रवार 18 नोव्हेंबर पर्यत लावावेत. शनिवार 19 नोव्हेंबरपासून प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत तपासणी मोहिम राबविण्यात येणार आहे. ज्या वाहनास रिफलेक्टीव टेप (रेडीयम) किंवा कापडाचे परावर्तक लावलेले नाही त्यांचे विरुध्द मोटार वाहन कायदयानुसार कारवाई करण्यात येईल. ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांनी वाहनामध्ये ऊस भरीत असताना वाहन रस्त्यावर उभे करु नये. वाहनामध्ये ऊस भरत असताना अनेक ठिकाणी वाहने रस्त्यावर वाहन उभे करण्यात येतात त्यामुळे अशा ठिकाणी अपघात होतात. त्याबाबत वाहनधारकांनी योग्य ती दक्षता घेऊनच योग्य रीतीने वाहन चालवावे, असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी कळविले आहे.
00000

No comments:

Post a Comment

  ​ वृत्त क्रमांक 38   ​ उमरीच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत राष्ट्रीय युवा दिनाचे रविवारी आयोजन   नांदेड दि.   10   जानेवारी :- उमर...