Friday, September 23, 2022

लेख

                                                                           

पिकांना उपद्रव करणाऱ्या गोगलगायीचे नियंत्रण !

गोगलगायी जून ते सप्टेंबर या काळात अत्यंत सक्रीय असतात. अनुकूल वातावरण आणि खाद्याच्या उपलब्धतेमूळे त्यांची वाढ झपाटयाने होते. सद्यपरिस्थितीत बऱ्याच ठिकाणी सोयाबिन, कापूस, भाजीपाला व विविध फळबागेमध्ये शंखी गोगलगायीचा प्रादुर्भाव मोठया प्रमाणात दिसून येत आहे. सोयाबिन, कापूस यासारख्या पिकांमध्ये रोप अवस्थेतच गोगलगायीचा प्रादुर्भाव होत असल्याने मोठया प्रमाणात नुकसान होत आहे. ही कीड अनेक पिकांना उपद्रव करत असल्यामूळे गोगलगायीचे एकात्मिक व सामुहिक पध्दतीने नियंत्रण करणे गरजेचे आहे. त्यावर कृषि विभागाने काही उपाययोजना सूचविल्या आहेत जेणेकरुन नुकसान टाळता येईल.

गोगलगायीची ओळख :  गोगलगाय मृदुकाय, अपृष्ठवंशीय, उदरपाद वर्गातील प्राणी आहे. तीच्या 35 हजारापेक्षा अधिक जातींची नोंद करण्यात आली आहे. गोगलगायी गर्द, करडया, फिक्कट किंवा हिरव्या काळपट रंगाच्या असतात. काही जातींमध्ये शरीरावर कवच असते. यालाच शंखी असेही म्हणतात. या गोगलगायी जायंट स्नेल नावाने परिचित आहेत. शास्त्रीय नाव अचेटीना पुलिका आहे. त्या विषारीही असू शकतात.

जीवनक्रम : प्रौढ शंखीची लांबी 15 ते 17 सें.मी. असते. जीवनक्रम साधारणत: तीन वर्षाचा असून या कालावधीत मादी एक हजार अंडी घालते. प्रत्येक मादी शंखी पिकाच्या खोडा शेजारील मुळाजवळ किंवा बांधाला 3 ते 5 सेंमी खोलीचे छिद्र करते. याद्वारे माती भूसभूसीत बनवून तीन ते चार दिवसात 100 ते 400 अंडी घालते. 17 दिवसापर्यंत अंड्यातून पिले बाहेर येतात. त्यांची वाढ पूर्ण होण्यास 8 महिने ते 1 वर्षाचा कालावधी लागलो. या काळात पिले पिकांचे अतोनात नुकसान करतात. त्यांची कार्यक्षमता रात्रीच्या वेळी अधिक असून, दिवसा सावलीत पानांखाली किंवा ओल्या जागी आढळतात.

प्रसार : याचा प्रसार शेतात वापरण्यात येणारी अवजारे, बैलगाडी, यंत्रसामग्री, ट्रॅक्टर ट्राली, प्लॉस्टीक ट्रे, शेणखत, विटा, माती, वाळू, कलम रोप, बेणे तसेच अन्य निविष्ठाद्वारे होते. गोगलगाय जमिनीखालील रहिवासी आहेत. खोड किंवा जंतूनी तयार केलेल्या भेगा आणि बोगदे वापरुन त्या पसरतात. पावसाळयात ढगाळ वातावरणात कमी प्रकाश, जास्त पाऊस म्हणजे आर्द्रता कमी तापमान (0 ते 32 अंश सेल्सिअस) या किडीला पोषण आहे. दव पडलेल्या रात्री किंवा पावसानंतर संक्रमन जास्त होते. बहुतेक प्रजाती थोडी थंडी सहन करुन करु शकतात आणि वसंत ऋतूत पुन्हा सक्रीय होतात. शंखी गोगलगायी चार ते पाच महिने अन्न पाण्याशिवाय जगू शकतात.

नुकसानीचा प्रकार : गोगलगाय विविध 500 वनस्पतीवर उपजिवीका करते. जमीनीवर पडलेली पिवळी पाने , फुले, फळे, जनावरांचे शेण, शेणखत, कागदी पूठ्ठा तसेच कुजलेल्या कचऱ्यावरही जीवनक्रम व्यतीत करतात. विशेषत: कोवळया पिकांवर गोगलगायीचा प्रादूर्भाव जास्त प्रमाणात दिसून येतो.

एकात्मिक नियंत्रण : प्रतिबंधात्मक उपाय-गोगलगायीचे वास्तव मुख्यत: बांधावरील गवतावर असल्याने शेताचे बांध स्वच्छ ठेवावेत, पालापाचोळा, तण काढून शेत नेहमी स्वच्छ ठेवावेत. आडवी -उभी नांगरट करुन सुप्तावस्थेतील गोगलगायींना जमिनीच्या पृष्ठभागावर आणावे. म्हणजे त्या सुर्याच्या उष्णतेने मरतील वा पक्षी त्यांचे भक्षण करतील. प्राणघातक नसणारे सापळे उदा. जुने ओले केलेले गोणपाट आणि लाकडी फळया लावाव्यात. फळझाडाच्या खोडाला 10 टक्के बोडो पेस्ट लावल्यास गोगलगायी झाडावर चढत नाहीत.

मशागतीय उपाय : संध्याकाळी व सुर्योदयापूर्वी बाहेर आलेल्या तसेच दिवसा झाडावर लपलेल्या गोगलगायी प्लॉस्टीकचे हातमोजे घालून गोळा करुन साबणाच्या द्रावणात बुडवाव्यात किंवा रॉकेल मिश्रीत पाण्यात बुडवून माराव्यात. अंडी खोडा शेजारील मूळाजवळ किंवा बांधाला तसेच ढिगाखाली 100 ते 200 च्या पुजंक्याने घातलेली असतात. ती पाढंरट रंगाची साबुदाण्याच्या आकाराची असतात. ती नष्ट करावीत. शेतात ठराविक अंतरावर गवताचे ढीग किंवा गोणपाट गुळाच्या पाण्याच्या द्रावणात बुडवून संध्याकाळी अंथरावेत. सकाळी पोत्याखाली गोळा झालेल्या गोगलगायी जमा करुन नष्ट कराव्यात.

शेतातील मुख्य पिकांवर प्रादुर्भाव करण्यापासून परावृत्त करण्यासाठी तंबाखूची किंवा चुन्याची भुकटी यांचा चार इंच लांबीचा पटृा किंवा राखेचा सुमारे दोन मीटर लांबीचा पट्टा बांधाच्या शेजारी पसरुन टाकावा. पाऊस असल्यास किंवा जमिन ओली असल्यास हा उपाय फारसा प्रभावी ठरत नाही.

जैविक उपाय :  गोगलगायींच्या नैसर्गिक शत्रुंचे संवर्धन करावे. उदा. कोंबडी, बदक, घुबड

रासायनिक उपाय : लहान शंखी गोगलगायी असल्यास त्यावर मिठाची फवारणी किंवा कॅल्शियम क्लोराईडचा वापर करावा. मेटाल्डिहाईड 5 टक्के पावडरची पिकांवर धुरळणी करावी अथवा त्याच्या गोळया शेतात ठेवाव्यात. शंखी गोगलगायी प्रामुख्याने पपई व झेंडुच्या रोपांकडे आकर्षित होतात. त्यामूळे  मेटाल्डिहाईड गोळया पपईच्या पिवळया पानांजवळ ठेवतात. सेंद्रिय शेतीत नियंत्रणासाठी फेरिक फॉस्फेटवर आधारित गोळया वापराव्यात.

सामुहिक उपाय महत्वाचे : गोगलगायींची भिन्नता जीवन चक्रामूळे केवळ रासायनिक नियंत्रणाद्वारे गोगलगायी नियंत्रणात येत नाहीत. शिवारातील सर्व शेतकऱ्यांनी गोगलगायींचा उपद्रव टाळण्यासाठी सामूहिकरीत्या व एकात्मिक पध्दतीने निर्मूलन करणे हाच सर्वात प्रभावी मार्ग आहे.

 

अलका पाटील, 

माहिती सहाय्यक,

जिल्हा माहिती कार्यालय नांदेड

0000                                             

No comments:

Post a Comment

  ​   वृत्त क्र. 88 राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे नांदेड विमानतळावर आगमन  दीक्षांत समारंभासाठी परभणीकडे प्रस्थान नांदेड दि. २३ जानेवारी :...