Tuesday, April 18, 2023

 विद्यार्थ्यांनी आवश्यक दाखले

व प्रमाणपत्र वेळेत काढून घेण्याचे आवाहन

नांदेड (जिमाका) दि. 18 :- इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक प्रवेशासाठी विविध दाखल्यांची आवश्यकता असते. निकालानंतर प्रवेशासाठी कालावधी मर्यादित असतो. त्यासाठी विद्यार्थ्यांनी आवश्यक असलेली दाखले व प्रमाणपत्र वेळेत काढून घेण्यासाठी सेतु सुविधा केंद्रामार्फत ऑनलाईन अर्ज करावेत, असे आवाहन तहसिलदार नांदेड यांनी केले आहे.

 

तहसिल कार्यालयामार्फत उत्पन्नाचा दाखला, रहिवासी दाखला, रहिवासी प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र, नॉन क्रिमीलियर प्रमाणपत्र, राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र, शेतकरी असल्याचे प्रमाणपत्र, भूमिहिन प्रमाणपत्र इ. दाखले वितरीत करण्यात येतात. निकालानंतर पुढील प्रवेशासाठी असणारा मर्यादित कालावधी, त्याच वेळी तहसिल कार्यालयात विविध दाखल्यासाठी प्राप्त होणाऱ्या अर्जाचे प्रमाण मोठया प्रमाणात असते. त्यामुळे सर्व अर्जाची तपासणी करण्यास वेळ लागतो. केलेल्या अर्जात काही त्रुटी असल्यास त्याची पुर्तता करण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नाही. तसेच सेतु केंद्रामार्फत मोठया प्रमाणात प्रमाणपत्रांची आवक वाढून ऑनलाईन प्रमाणपत्र ज्या सर्व्हरद्वारे देण्यात येतात ते सर्व्हर युजर्सच्या संख्या जास्त असल्यामुळे हँग होणे, स्लो होणे अशा अडचणी निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पुढील प्रवेशासाठी लागणाऱ्या प्रमाणपत्रासाठी तात्काळ अर्ज करुन वेळेआधीच प्रमाणपत्र प्राप्त करुन घ्यावेत, असे तहसिल कार्यालयाच्या वतीने कळविण्यात आले आहे.  

 

मागील आर्थिक वर्षात 1 एप्रिल 2022 ते 31 मार्च 2023 कालावधीत तहसिल कार्यालयामार्फत उत्पन्न प्रमाणपत्र 39 हजार 573, रहिवासी दाखला 4 हजार 812, वय अधिवास व राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र 13 हजार 100 व इतर प्रमाणपत्र 16 हजार 687 असे एकूण 74 हजार 172 प्रमाणपत्र उपविभागीय अधिकारी व तहसिलदार नांदेड यांचे मार्गदर्शनाखाली नायब तहसिलदार काशिनाथ डांगे, अव्वल कारकून विद्यासागर पिंलगुडे, तलाठी गणेश जोंधळे यांनी प्रमाणपत्र निर्गमित करण्यासाठी परिश्रम घेतले आहेत.

0000

 

No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...