वृत्त क्रमांक 355
नांदेडचे बसस्थानक 12 एप्रिल पासून कौठा मैदानावर स्थलांतरीत होणार
नागरिकांनी, ऑटोचालकांनी नोंद घेण्याचे आवाहन
नांदेड, दि. ५ एप्रिल :- नांदेडच्या बस स्थानकाला रेल्वे स्टेशन पासून जोडणारा मुख्य रस्ता दुरुस्त करण्यासाठी मर्यादित कालावधी करिता नांदेड बस स्टॅन्ड बंद करण्यात येत आहे. ते कौठा मैदानावर स्थानांतरीत करण्यात येत आहे,याची नागरिकांनी नोंद घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.
या नव्या निर्णयानुसार 12 एप्रिल पासून जुने बसस्थानक रस्त्यासाठी बंद करण्यात येणार आहे. नागरिकांनी या निर्णयासाठी सहकार्य करावे व संबंधित यंत्रणेने ठरलेल्या वेळेच्या आधी रस्त्याचे काम पूर्ण करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
नांदेड रेल्वेस्थानक ते मध्यवर्ती बसस्थानक हा रस्ता अत्यंत खराब झाला आहे. बराच काळाचा निर्णय प्रलंबित होता. तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी यासंदर्भात दोन वेळा बैठका घेतल्या होत्या. 12 मार्च रोजी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी बसस्थानकाला प्रत्यक्ष भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर तातडीने हा निर्णय घेण्यात आलेला आहे.
यामुळे प्रवाशांना काही प्रमाणात असुविधा होऊ शकते. ऑटो चालकांनी या काळात प्रवाशांना मदत करावी. तसेच ऑटो चालक व अन्य प्रवासी वाहतुकीला आवश्यक पूरक व्यवस्था कौठा मैदान येथे निर्माण करण्यात येत आहे.
विशिष्ट कालमर्यादेत हे काम पूर्ण व्हावे, यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही लक्ष देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
मुख्य बसस्थानक येथील रस्त्यांच्या दुरूस्तीच्यावेळी ड्रेनेजलाईन, पाईपलाईन, फायबर केबल यासंदर्भातील सर्व अडथळे तातडीने दुरूस्त करण्याबाबत बैठकीमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
याशिवाय नव्या बसस्थानकाची तात्पुरती व्यवस्था होताना प्रवाशांची सुरक्षितता, तात्पुरते शौचालय, स्वच्छता गृहे व अन्य अनुषंगिक व्यवस्था तसेच वाहतुकीमध्ये होणाऱ्या बदलामुळे कि.मी. अंतरातील नवे टप्पे निश्चित करण्याचे काम सर्व संबंधित विभागाने वेळेच्या आत करावे, अशी सूचना त्यांनी दिली आहे. यासंदर्भात निवासी उपजिल्हाधिकारी, नांदेड तहसिलदार, आगार व्यवस्थापक, पोलीस वाहतुक शाखा, प्रादेशिक परिवहन विभाग व महानगरपालिका कर्मचाऱ्यांनी वेळोवेळी आढावा घेऊन विक्रमी वेळेत हा रस्ता पूर्ण करावा, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
0000
No comments:
Post a Comment