वृत्त क्रमांक 356
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतली कृष्णा राऊतच्या शिक्षणाची जबाबदारी
मृतांच्या कुटुंबियांना विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी गुंज येथे रविवारी विशेष सहायता शिबीर
नांदेड जिल्ह्यातील आलेगाव येथील घटनाक्रमानंतर शासनाकडून कुटुंबांचे सांत्वन
नांदेड व हिंगोली जिल्हाधिकाऱ्यांकडून दुसऱ्या दिवशीही आढावा
नांदेड /हिंगोली, दि.५ एप्रिल: वसमत तालुक्यातील गुंज येथील शेतमजुरांना घेऊन जाणारी ट्रैक्टर ट्रॉली विहिरीत पडून झालेल्या दुर्घटनेतील मृतांचा मुलगा कृष्णा राऊत याच्या शिक्षणाची जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे. तर मृताच्या कुटुंबियांना विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून रविवारी (दि.६) गुंज येथे विशेष सहायता शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
शुक्रवारच्या दुर्घटनेची दखल प्रधानमंत्री कार्यालय तसेच मुख्यमंत्री कार्यालयाने घेतली आहे. घटनेतील कुटुंबांच्या पाठीशी शासन उभे राहिले असून आज नांदेड व हिंगोली येथील जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व संबंधित अधिकाऱ्यांमार्फत पुन्हा या घटनाक्रमाचा आढावा घेतला.
नांदेड जिल्ह्यातील आलेगाव येथे शुक्रवारी ४ एप्रिल रोजी सकाळी ७.३० वाजता ही दुर्घटना घडली होती. या दुर्घटनेत वसमत तालुक्यातील गुंज त.आसेगाव येथील ९ महिला व एक पुरुष शेतमजूर आलेगाव शिवारातील शेत गट क्र.२०१ मध्ये शेती कामासाठी जात होते. सदरील शेताजवळ आले असता पाण्याने भरलेल्या विहिरीत हे शेतमजूर ट्रॅक्टरसह पडल्यामुळे त्यातील ७ महिलांचा मृत्यू झाला.
त्यातील एका मयत महिलेचा मुलगा कृष्णा तुकाराम राऊत याचा समाज माध्यमांवरील व्हिडीओ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाहिला असता, त्यांनी व्हिडीओची तात्काळ दखल घेतली. त्या व्हिडीओमधील लहान मुलाची वेदना व भावना समजून घेत मुख्यमंत्र्यांनी कृष्णाच्या पुढील शिक्षणाची जबाबदारी स्वतः घेत असल्याचे जाहीर केले. तसेच मयतांच्या वारसांना प्रत्येकी पाच लक्ष रुपयाची आर्थिक मदतही जाहीर केली आहे.
तसेच आज शनिवारी (दि.५) रोजी जिल्हाधिकारी अभिनव गोयल व नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी दिलेल्या निर्देशानुसार वसमतचे उपविभागीय अधिकारी विकास माने, तहसीलदार शारदा दळवी यांनी मौजे गुंज त. आसेगाव येथील मयतांच्या वारस, नातेवाईकांना प्रत्यक्ष भेटून त्यांचे सांत्वन केले. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भावना त्यांच्यापर्यंत पोहचवल्या. त्यांना संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, घरकुल योजने अंतर्गत घरकुल योजनेचे लाभ, पुरवठा विभागातील शिधापत्रिका व स्वस्त धान्याबाबतचे लाभ, शिक्षणाशी संबंधित विविध प्रमाणपत्रांचे लाभ, व इतर अनुषंगीक प्राथमिक गरजा पूर्ण करणारे लाभ मिळवून देण्याबाबतची सर्व माहिती मयतांच्या वारसांना अथवा नातेवाईकांना जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिका-यांकडून देण्यात आली.
तहसीलदार श्रीमती दळवी यांच्याकडून दुर्घटनेतील मयतांच्या वारसांना शासकीय योजनेचे लाभ देण्याच्या उद्देशाने उद्या रविवार (दि.६) रोजी गुंज त. आसेगाव येथे विशेष सहाय्य योजनेच्या शिबाराचे आयोजन ही करण्यात आलेले आहे. त्यामध्ये निवासी नायब तहसीलदार वसमत, मंडळ अधिकारी, विभाग गिरगाव व ग्राम महसूल अधिकारी, पळसगाव त. माळवटा यांना आदेश देण्यात आले असल्याचे उपविभागीय अधिकारी विकास माने यांनी कळविले आहे.
***
No comments:
Post a Comment