Friday, March 20, 2020


कोरोना विषाणू प्रसारावरील प्रतिबंधात्मक उपाय
कार्यालयातील उपस्थिती
नियंत्रित करण्याबाबत आदेश
नांदेड दि. 20 :- कोरोना विषाणू प्रसारावरील प्रतिबंधात्मक उपाय म्हणून राज्य शासकीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांची उपस्थिती नियंत्रित करण्याबाबत आदेश जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष डॉ. विपीन इटनकर यांनी काढले आहेत.
नांदेड जिल्ह्यातील शासकीय कार्यालयाचे तातडीचे व महत्वाचे काम चालू राहण्याचे दृष्टीने संबंधीत विभाग प्रमुख, कार्यालय प्रमुखांनी त्यांचे नियंत्रणाखालील सर्व अधिकारी, कर्मचारी यांना दररोज कार्यालयात न बोलवता त्यांना आळीपाळीने 50 टक्के बोलवावे. (यामध्ये सुट देत असताना भेदभाव होणार नाही याअनुषंगाने अधिकारी, कर्मचाऱ्यांची जन्म दिनांकाची सम / विषम दिनांक लक्षात घ्यावी परंतू यामध्ये 50 टक्के पेक्षा जास्त  कर्मचारी उपस्थित राहणार नाही याची देखील दक्षता घ्यावी). सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी त्यांचा संपर्क पत्ता, मोबाईल क्रमांक, ईमेल आयडी, कार्यालयास उपलब्ध करुन दयावा. तसेच त्या पत्त्यावर ते उपलब्ध आहेत याची दक्षता घ्यावी. कार्यालयात उपस्थित राहण्याच्या सुचना प्राप्त झाल्यास त्यांना त्यानुसार कार्यालयात उपस्थित राहणे अनिवार्य राहील.
हा आदेश सार्वजनिक आरोग्य विभाग तसेच वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग तसेच त्यांच्या प्रशासकिय नियंत्रणाखालील कार्यालयांना लागू राहणार नाही. त्याचप्रमाणे क्षेत्रिय स्तरावर ज्या अधिकारी, कर्मचारी त्यांच्या कामकाजाचा भाग म्हणून कार्यालयाबाहेर भेटी देणे आवश्यक असते अशा कार्यालयांना त्याचप्रमाणे आपत्कालीन, अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कार्यालयांना हा आदेश लागू राहणार नाही.
सामान्य प्रशासन विभागाचा 18 मार्च 2020 रोजीचा शासन निर्णयात नमूद अटी व शर्तीचे पालन करणे संबंधीत अधिकारी, कर्मचाऱ्यांना बंधनकारक आहे. हा आदेश नांदेड जिल्ह्यासाठी राज्य शासकीय कार्यालयांना 31 मार्च 2020 पर्यंत आपतकालीन परिस्थिती म्हणून लागू राहील, असेही आदेशात नमूद केले आहे.
000000

No comments:

Post a Comment

वृत्त क्र.   1148 राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलाकार मानधन सन्मान योजनेतील लाभार्थ्यांनी 5 डिसेंबरपर्यत आधार पडताळणी करुन घ्यावी...