Monday, October 16, 2017

दिवाळी पहाट कार्यक्रमात 18 ते 20 ऑक्टोबरपर्यंत
गोदावरीच्या बंदाघाटवर नांदेडकरांना बहारदार कार्यक्रमांची मेजवानी
        नांदेड, दि. 16 :- जिल्हा प्रशासन नांदेड, नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका आणि गुरुव्दारा बोर्ड व नांदेड नागरी सांस्कृतिक समितीच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी घेतला जाणारा व दिवसेंदिवस लोकप्रिय होत असलेला बंदाघाट येथील गोदावरीच्या रम्य काठावरील त्रिदिवसीय दिवाळी पहाट यावर्षी 18, 19, 20 ऑक्टोबर रोजी गोदावरीच्या बंदाघाटवर सकाळी साडेपाच वाजता संपन्न होत आहे. यावर्षीच्या दिवाळी पहाट या कार्यक्रमात नांदेडकरांना दिवाळी निमित्त विविध कार्यक्रमांची मेजवानी मिळणार आहे.
दिनांक १८ ऑक्टोबर रोजी सकाळी 5 वा. गुरुभजन व शबद कीर्तन तसेच पहाटे 5.30 वा. सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमाची संकल्पना व निवेदन सुप्रसिध्द निवेदक डॉ.नंदकुमार मुलमुले यांचे असून सुप्रसिध्द सिनेकलावंत व टीव्हीस्टार म्हणून प्रसिध्द असलेले  त्यागराज खाडीलकर यांचेसह सौ.आरती दिक्षीत पुणे व टिव्ही गायिका पल्लवी अनदेव यांचा सहभाग आहे. त्याच रोजी सायंकाळी ६.३० वाजता नांदेडमध्ये प्रथमच मराठी गझलचा बहारदार मुशायरा गझल दिवाळी होणार आहे. यात डॉ.सुनंदा शेळके, जयसिंगपूर, शरद धनगर, धुळे, डॉ.संतोष कुलकर्णी, उदगीर आतम गेंदे, पालम, प्रपुâल्ल कुलकर्णी, नांदेड, संजय बामणीकर नांदेड, प्रा.सौ.सुहासिनी देशमुख, नांदेड हे मान्यवर गझलकार सहभागी होणार असूनर, गझल निवेदन गझलकार व कवी बापू दासरी नांदेड यांचे असणार आहे. यात प्रमुख उपस्थिती संत बाबा बलविंदरसिंगजी आणि  प्रख्यात ज्येष्ठ साहित्यिक कविवर्य लक्ष्मीकांत तांबोळी यांच्या हस्ते शमा प्रज्वलीत केली जाईल.
गुरुवार 19 ऑक्टोबर रोजी सकाळी पाच वाजता गुरुव्दारा शबद किर्तन व सकाळी ५.३० वाजता कोलकत्याचे सुप्रसिध्द गायक पंडित ब्रजेश्वर मुखर्जी यांची शास्त्रीय उपशास्त्रीय संगीताची पहाटे मैफल होणार आहे.
शुक्रवार 20 ऑक्टोबर रोजी दिवाळी पाडवा पहाट हा कार्यक्रम पहाटे ५.३० वाजता लेकी माहेराच्या या संगीत मैफिलीत नांदेड माहेर असलेल्या गायिकांचा आगळावेगळा कार्यक्रम सादर होणार आहे. या कार्यक्रमाची संकल्पना व निर्मिती दिग्दर्शन पत्रकार विजय जोशी यांचे असून निवेदन अ‍ॅड. गजानन पिंपरखेडे यांचे लाभणार आहे. यात सौ.प्रज्ञा देशपांडे- पळसोदकर, सौ.वर्धिनी जोशी- हयातनगरकर, सौ.विद्या कोलते- एडके, सौ.देवश्री साने-पाठक,हर्षा देशमुख या गायिका सहभागी होणार आहेत.
या सर्व दिवाळी मुहूर्तावरील सुश्राव्य कार्यक्रमांचा आस्वाद नांदेडच्या रसिकांनी घ्यावा, शक्यतो शहरात एकाच व्यासपीठावर दिवाळी पहाटचे कार्यक्रम आयोजित केले असल्याने अन्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येऊ नये, असे आवाहन नांदेडचे जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, नांदेड मनपाचे आयुक्त गणेश देशमुख, अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी, गुरुव्दारा बोर्डाचे अधीक्षक ठाणसिंग, उपायुक्त रत्नाकर वाघमारे तसेच सांस्कृतिक समन्वयक तथा अप्पर कोषागार अधिकारी निळकंठ पाचंगे यांनी केले असून, हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी दैनिक प्रजावाणीचे माध्यम सहकार्य लाभले आहे. तसेच शंतनू डोईफोडे, अ‍ॅड.गजानन पिंपरखेडे, बापू दासरी, विजय जोशी, गोवर्धन बियाणी, लक्ष्मण संगेवार, वसंत मैय्या, सुरेश जोंधळे, हर्षद शहा, उमाकांत जोशी, विजय होकर्णे, गोविंद पुराणिक, प्रमोद देशपांडे  आदी सर्व सदस्य परिश्रम घेत आहेत.
0000000


No comments:

Post a Comment

  वृत्त क्र. 1133 नांदेड जिल्ह्यातील 9 विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीत  भाजपचे 5, शिवसेनेचे 3 तर राष्ट्रवादी काँग्रेसचा 1 उमेदवार विजयी  नां...