Monday, May 11, 2026

 नांदेड तालुकास्तरीय मान्सून पूर्व आढावा बैठक संपन्न

नांदेड, दि. ११ मे : आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना प्रभावीपणे करण्यासाठी तसेच जीवित व वित्तहानी टाळण्याच्या दृष्टीने नांदेड तालुकास्तरीय मान्सून पूर्व आढावा बैठक आज नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड येथे पार पडली. सदर बैठकीच्या अध्यक्षस्थानी उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ हे होते.

बैठकीस तहसीलदार संजय वारकड, सार्वजनिक बांधकाम विभाग, पाटबंधारे विभाग (इरिगेशन), महावितरण (एमएसईबी), कृषी विभाग, ग्रामविकास विभाग, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, तलाठी, मंडळ अधिकारी, पोलीस प्रशासन, नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिका तसेच नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित विविध तालुकास्तरीय विभागांचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सदर बैठकीमध्ये आगामी मान्सून दरम्यान उद्भवू शकणाऱ्या अतिवृष्टी, पूर परिस्थिती, नदी-नाल्यांना येणारे पाणी, शहर व ग्रामीण भागातील साचणारे पाणी, वीजपुरवठा खंडित होणे, धोकादायक व जीर्ण इमारती, रस्ते व पुलांची स्थिती, नाल्यांचे खोलीकरण व स्वच्छता, झाडे पडण्याच्या घटना, शेती पिकांचे नुकसान, नागरिकांचे सुरक्षित स्थलांतर तसेच आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ मदत व बचाव कार्य याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ यांनी सर्व विभागांनी समन्वयाने कार्य करून आपत्तीपूर्व तयारी पूर्ण करावी, अशा सूचना दिल्या. विशेषतः शहर व ग्रामीण भागातील संवेदनशील ठिकाणांची यादी तयार करून तेथे आवश्यक उपाययोजना तात्काळ राबवाव्यात, असे निर्देश त्यांनी दिले. 

तसेच पूरप्रवण भाग, नदीकाठची गावे, नाल्यालगतची वस्ती, धोकादायक इमारती तसेच पाणी साचणारे भाग यावर विशेष लक्ष केंद्रित करण्याचे आदेश देण्यात आले.

तहसीलदार संजय वारकड यांनी महसूल विभाग, तलाठी, मंडळ अधिकारी तसेच ग्रामस्तरावरील यंत्रणांनी सतर्क राहून आपत्कालीन परिस्थितीत त्वरित प्रतिसाद देण्याचे निर्देश दिले. तसेच प्रत्येक विभागाने आपापल्या नियंत्रण कक्षांची माहिती अद्ययावत ठेवून आवश्यक मनुष्यबळ व साहित्य सज्ज ठेवावे, असे सांगितले.

नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिकेस शहरातील नाले, गटारी व पावसाच्या पाण्याचा निचरा होणाऱ्या मार्गांची तात्काळ स्वच्छता व दुरुस्ती करण्याच्या सूचना देण्यात आल्या. सार्वजनिक बांधकाम विभागास धोकादायक रस्ते व पुलांची पाहणी करून आवश्यक दुरुस्ती करावी, तर महावितरण विभागास वीजवाहिन्या व विद्युत खांबांची तपासणी करून आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवण्याचे निर्देश देण्यात आले.

यावेळी कृषी विभागास शेतकऱ्यांना हवामानाबाबत मार्गदर्शन करणे, संभाव्य पिकनुकसान टाळण्यासाठी उपाययोजना सुचविणे तसेच ग्रामपातळीवरील कर्मचाऱ्यांनी आपत्तीच्या प्रसंगी नागरिकांना तात्काळ माहिती देण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. पोलीस प्रशासनास वाहतूक नियंत्रण, बचाव कार्य व आपत्कालीन परिस्थितीत समन्वय राखण्याबाबत निर्देशित करण्यात आले.

बैठकीदरम्यान विविध विभागांकडून करण्यात आलेल्या मान्सूनपूर्व तयारीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. तसेच सर्व संबंधित यंत्रणांनी आपापसातील समन्वय अधिक मजबूत ठेवून नागरिकांच्या सुरक्षिततेस सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले.

सदर बैठकीमुळे आगामी पावसाळ्यात संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा प्रभाव कमी करण्यासाठी प्रशासन अधिक उपाययोजनांवर भर देत आहे.

0000




No comments:

Post a Comment

  राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये 1680 प्रकरणे निकाली 7 कोटीं 68 लाख रुपयांची तडजोड नांदेड, दि. 12 मे  : महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंब...