Thursday, September 8, 2022

 वैज्ञानिक कुतूहल जोपासण्यासाठी जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन एक प्रभावी माध्यम

- जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे 

·49 व्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे ग्रामीण टेक्निकल कॅम्पसमध्ये थाटात उद्घाटन 

नांदेड (जिमाका) दि. 8 :-   विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक प्रतिभेला वाव देण्यासाठी तसेच वैज्ञानिक कुतूहल जोपासण्यासाठी जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन एक प्रभावी माध्यम आहे, असे प्रतिपादन जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाच्या उदघाटन प्रसंगी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी व्यक्त केले. 49 व्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे ग्रामीण टेक्निकल कॅम्पस मध्ये उद्घाटन नुकतेच संपन्न झाले यावेळी त्या बोलत होत्या.  यावेळी बेंगलोरचे सहसंस्थापक रुपेश किनीकर, माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर, प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. सविता बिरगे, उपशिक्षणाधिकारी माधव सलगर, उपशिक्षणाधिकारी बंडू आमदूरकर यांची उपस्थिती होती. 

प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक प्रतिभा असते. विद्यार्थ्यांमधील प्रतिभेला वाव देण्यासाठी विज्ञान शिक्षकांनी विद्यार्थ्यांमध्ये धाडस, आत्मविश्वास व सातत्य ही त्रिसूत्री रुजवावी असे त्यांनी यावेळी सांगितले. विज्ञान प्रदर्शनातून मांडलेल्या प्रयोगातून समाज उपयोगी प्रकल्पांची उभारणी व्हावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. प्रदर्शनात स्त्रियांच्या सुरक्षिततेसाठी मांडलेल्या ॲपचे व प्रकल्पाचे त्यांनी कौतुक केले. प्रकल्पांच्या उभारणीसाठी विद्यार्थ्यांच्या मनात प्रश्न व कुतूहल निर्माण झाले पाहिजेत कारण कुतूहलच विज्ञानाला जन्म देत असते. परिस्थितीशी संघर्ष करणाऱ्यांचा कधीच पराभव होत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी संघर्षाची प्रेरणा मनात जोपासावी. तसेच समाज माध्यमावर वेळ वाया न घालता वैज्ञानिक प्रकल्पांची निर्मिती करावी असे त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. 

यावेळी अँथम बायोसायन्सेस, बेंगलोरचे सहसंस्थापक रुपेश किनीकर यांनी उद्योगक्षेत्राला अभियंत्यांकडून असलेल्या अपेक्षा विशद केल्या. अभियंत्यांमध्ये जीवनभर शिक्षणाची वृत्ती, कल्पकता तसेच काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याची क्षमता निर्माण करावी असेही ते म्हणाले. यावेळी त्यांनी अभियांत्रिकी क्षेत्रातील त्यांचा प्रदीर्घ अनुभव विशद केला. 

यावेळी माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर यांनी ग्रामीण टेक्निकल अँड मॅनेजमेंट कॅम्पसने विज्ञान प्रदर्शनासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल संस्थेचे अभिनंदन केले. प्रास्ताविकातून प्राचार्य, डॉ. विजय पवार यांनी कोचिंग संस्कृतीवर भाष्य करत दहावी नंतर विध्यार्थ्यानी बायोलॉजीसह गणित विषयाची कास धरावी असा आग्रह व्यक्त केला. कारण गणिताची कास धरल्यास विद्यार्थ्यांना मेडिकलसह कृषी, फार्मसी व अभियांत्रिकी क्षेत्राची द्वारे खुली होतात असे मत मांडले.  

प्रदर्शनातून प्राथमिक गटातून 48, माध्यमिक गटातून 48, आदिवासी गटातील 8 व शिक्षकांचे 10 प्रकल्प असे एकूण 1400 प्रकल्पांची मांडणी करण्यात आली. यात वूमेन्स सेक्युरिटी ॲप, हायड्रोजेन फ्युएल जेनेरेटोर, गणितीय मॉडेल, वीज निर्मिती व पाणी उपसा यंत्र, स्वयंचलित उपसा जल यंत्र, कोरोना व्हायरस मॉडेल, हायड्रॉलिक पॉवर, स्वयंचलित पाणी मोटार नियंत्रक हे प्रकल्प आकर्षणाचे केंद्र ठरले. हे प्रदर्शन 6 व 7 सप्टेंबर 2022 असे भरविण्यात आले होते. दुसऱ्या दिवशी देखील मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांच्या शालेय भेटींचे आयोजन करावे असे आवाहन संस्थेचे प्राचार्य डॉ. विजय पवार यांनी केले आहे. सूत्रसंचालन डॉ. ओमप्रकाश दरक व आभारप्रदर्शन  प्रलोभ कुलकर्णी यांनी केले. जवळपास 26 परीक्षक हे परीक्षणाचे काम पाहत आहेत. विज्ञान प्रदर्शनी यशस्वी करण्यासाठी सहाय्यक शिक्षण उपनिरीक्षक पोकले हनुमंत, ग्रामीण टेक्निकल अँड मॅनेजमेंट कॅम्पस विष्णुपुरी नांदेडचे सुधीर शिंदे व सर्व शिक्षक वृंद व कर्मचारी वृंद परिश्रम घेत आहेत. कार्यक्रमाचा समारोप राष्ट्रगीताने करण्यात आला.

00000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...