Friday, June 4, 2021

विशेष लेख

 

वृक्ष लागवडीतून

झाडांनाही श्वास देऊ यात !

पर्यावरण दिनाच्या निमित्ताने

 

जगातील जवळपास सर्व वैद्यकीय चिकीत्सा आणि हॉस्पिटल गत वर्षभरापासून ऑक्सिजन उपलब्धतेच्या तणावाखाली राहिली. त्यावरुन आता प्रत्येकाला शुद्ध हवेचे मोल लक्षात आले आहे. कोविड-19 सारख्या आजाराने जो त्याच्या तावडीत सापडला, त्याच्या श्वसन यंत्रणेवर, फुफ्फुसावरच घाला घालून कोरोना मोकळा झाला. लाखो लोकांना आपल्या प्राणास मुकावे लागले. ज्या श्वासावर आपले जीवन सुरू असते ती श्वासाची प्रक्रिया प्रत्येकाचे शरीर विनातक्रार सुरु ठेवत असते. श्वास आला काय आणि सोडला काय याची जाणीवही माणसाने कधी समजून घेतली नाही. जेंव्हा श्वास अडकायला लागला तेंव्हा प्रत्येकाला त्याचे मोल लक्षात यायला लागले.

 

श्वसन प्रक्रियेचे एक स्वतंत्र गणित आहे. स्वत:ची जाणिव न होऊ देता प्रत्येक शरीरात श्वसन यंत्रणा आपले गणित चालू ठेवते. असेच गणित निसर्गाचे आहे. आपल्या भवताली असलेल्या झाडांचे आहे. शरिराला लागणारी शुद्ध हवा ही झाडांची पाने आपल्याला देत राहतात. वातावरणातील विशुद्ध हवा घेणे आणि शुद्ध हवा सोडणे ही निरंतर चालणारी प्रक्रिया निसर्गातील झाडे विनातक्रार करत असतात. ज्या झाडांपासून आपण शुद्ध हवा घेतो त्या झाडांकडे कृतज्ञतेच्या भावनेतून आपण पाहतो का हा प्रश्न ज्याचा त्याने एकदा का होईना, स्वत:ला विचारला पाहिजे. जी गोष्ट आपण आपल्या श्वसन यंत्रणेकडे दुर्लक्षून असतो तीच स्थिती झाडांच्या बाबतीत आहे, हे नाकारता येणार नाही.

 

आपल्या भारतात गतवर्षातील 30 जानेवारीला पहिला रुग्ण सापडला. तेंव्हा पासून आजच्या घडीला ही संख्या 2 कोटी 3 लाखांपेक्षा अधिक झाली. अजूनही यातून सुटकारा नाही. पूर्ण लसीकरण हा याच्यावरचा आजच्या घडीतील सर्वोत्तम उपाय असल्याचे संपूर्ण जगाने स्विकारले आहे. जे आजारी होते ज्यांना कोविड-19 ची बाधा झाली, ज्यांचे श्वास गुदमरले त्यांना आरोग्याचे महत्व पटले. ऐरवी निसर्गातून कोणतेही अपेक्षा न ठेवता आयुष्याला पुरुन उरणार एवढे ऑक्सिजन आपण निसर्गाला कोणताही मोबदला न देता घेत असतो त्याच ऑक्सिजनची किंमत किती असू शकते हे जे पॉझिटिव्ह होते त्यांनी मोजली आहे.

 

उत्तम आरोग्य ठेवण्यासाठी केवळ चांगला आहार ठेवून भागत नाही, आहाराबरोबर चांगला व्यायाम ठेवूनही सर्व व्याधीपासून, कोरोनासारख्या साथीच्या आजारापासून सुटका होईलच याची शाश्वती राहिली नाही. या सर्वांसोबत ज्या पर्यावरणात, भवतालात आपण राहतो त्याच्याही आरोग्याची काळजी घेतल्या शिवाय दुसरा मार्ग नाही.

 

आजवर आपण प्रत्येक गावकुसात खळखळून वाहणाऱ्या लहान-मोठ्या ओहळापासून ते नद्या प्रदुषित होणार नाहीत अशी एकही कृती शिल्लक ठेवली नाही. प्रत्येक जिल्ह्यात जसे वातावरण आहे त्याला अनुरुप असलेली वनसंपदा व जैवविविधता जी हजारो वर्षांपासून आजवर जगत आली, वाढत आली तीही आपण शिल्लक ठेवली नाही. असंख्य प्रकारची परोपकारी वृक्षवल्ली केंव्हा दूर झाली त्याकडेही कोणाचे लक्ष गेले नाही. निसर्गाचे एक जीवनचक्र असते. आकाशातल्या ओझोनच्या थरापासून ते पर्वत-डोंगरांचा माथा, पायथा आणि पुढे सपाट प्रदेशातून समुद्राच्या किनाऱ्यापर्यंत हे चक्र जाते. ऐरवी माथ्यापासून पावसात पाण्याचा सुरु झालेला ओघळ थोडे खाली गेले की ओहळामध्ये रुपांतरीत होते. ओहळाचे हे पाणी थोडे खाली आले की मोठ्या ओहळात त्याचे रुपांतर होऊन नदीचे पहिले रुप आपल्याला दिसते. अश्या असंख्य उपनद्यातून, ओहळातून नदी आकार घेते. नदीच्या पोटात जे काही येते ते त्या-त्या भागातील माथ्यापासून हजारो वर्षांपासून चरा-चराने जे जपलेले असते तेच नदीत उतरत जाते. म्हणून प्रत्येक भागात नदी एक वेगळे रुप देते. नदी घनदाट झाडांच्या मुळांना पाणी देत त्याच्याच कुशीतून वाहत जाते. आता ती आपण कुसही ठेवली नाही, त्यात वाळूही ठेवली नाही आणि झाडेही ठेवली नाहीत.

 

झाडे जगली तर श्वास जगेल, झाडे जगली तर पाऊस पडेल, झाडे जगली तर निसर्ग जगेल हे आजवर अनेकांनी सांगितले. सुंदरलाल बहुगुणा यांनी झाडाला कवेत घेऊन, झाडाला घट्ट मिठ्ठी मारुन एका साध्या चिपको आंदोलनातून संपुर्ण जगाला एका नवा विश्वास दिला. या आंदोलनाने फक्त झाडेच वाचली असे नाही तर आपल्या उत्तरदायित्त्वाची जाणीव अप्रत्यक्ष त्यांनी शासकीय यंत्रणासह मानवाला करुन दिली.

 

आज आपण ऑक्सिजन म्हटले की, ज्या गांभीर्याने लगेच पाहतो ते गांभीर्य पुन्हा एकदा कोविड-19 सारख्या आजाराने आपल्या लक्षात आणून दिले आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेत ऑक्सिजनची गरज 2 हजार 800 मे. टन पर्यंत आपल्या भारतात गेली. दुसऱ्या लाटेत बाधितांची संख्या वाढल्याने 5 हजार मे.टन प्रति दिवसापर्यंत प्राणवायूची गरज पोहचली हे विसरुन चालणार नाही. आपले असंख्य बाधित झालेले बांधव, माता-भगिनी, युवक हे प्राणवायुसाठी झगडत होते हे सत्य स्विकारावे लागेल.

 

एका व्यक्तीला वर्षभरात जेवढा प्राणवायु लागतो तो साधारणत: 7 ते 8 झाडे ही वर्षभरात पुरवतात. मानवा व्यतिरिक्त या चराचरात जेवढे प्राणी आहेत त्यांनाही प्राणवायुची आवश्यकता असते. आजवर ज्या गतीने बेसुमार वृक्षतोड झाली ती लक्षात घेता श्वासाचे, प्राणवायुचे आणि झाडाचे नाते नेमके काय आहे हे लक्षात घेऊन प्रत्येकांना जेवढी झाडे लावता येतील, जगवता येतील ते सारे प्रयत्न मानवाकडून होणे अपेक्षित आहे. एकुण भौगोलिक क्षेत्राचा विचार करता त्यावर 33 टक्के हरित अच्छादन असणे आवश्यक आहे. मराठवाड्यात हे प्रमाण अवघ्या 5 टक्यापर्यंतच आहे. मी ज्या गल्लीत, भागात राहतो त्या भागात जर प्रत्येकाने हे 33 टक्क्याचे प्रमाण जपण्याचा प्रयत्न केला तरच राष्ट्रीय पातळीवर हे गणित साध्य होईल. अन्यथा उद्याच्या पिढीला आपण निर्मळ श्वास किती ठेवू हा प्रश्नच आहे.

 

मानवी जीवनात आपल्या भोवतालाचे असलेले हे महत्व लक्षात घेऊन, प्राणवायुची गरज लक्षात घेऊन, निसर्गाच्या शुद्धतेची गरज लक्षात घेऊन या जागतिक पर्यावरण दिनापासून शासनाने कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर वृक्षलागवड मोहिम हाती घेतली आहे. आपल्या औरंगाबाद विभागाचे विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर, नांदेडचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकुर यांनी पर्यावरण दिनाचे औचित्य साधून यात अधिकाधिक लोकसहभाग द्यावा, असे आवाहन नांदेड जिल्हावासियांना केले आहे.

 

आपल्या गल्लीतील, कॉलनीतील मोकळ्या जागेवर, शहरातील मोकळ्या जागेवर, शेतामध्ये, शेताच्या बांधावर, पडिक जमिनीवर, रस्त्याच्या दुतर्फा, कॅनॉलच्या दुतर्फा, नदी-नाल्यांच्या काठावर प्रत्येक व्यक्तींनी जिथे शक्य होईल तिथे किमान 3 झाडे लावावीत, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

 

येत्या जागतिक पर्यावरण दिनी अर्थात 5 जून पासून या मोहिमेचा शुभारंभ केला जात आहे. विविध संकल्पनांचा सदर वृक्षलागवड करतांना वापर करता येईल. यात घनवन लागवड म्हणजेच कमी क्षेत्रामध्ये जास्त वृक्षांची लागवड, गाव तेथे देवराई म्हणजेच देवस्थान परिसरामध्ये धार्मिक दृष्ट्या महत्वाच्या वृक्षांचे वन तयार करता येईल. रस्त्याच्या दुतर्फा झाडांची लागवड सार्वजनिक विहिरींच्या सभोवती वृक्ष लागवड, स्मृती वनांची निर्मिती, नदी-नाले यांच्या काठावर बांबु लागवड आदी उपक्रम विभागीय आयुक्त कार्यालयाने सुचविले आहे.

 

कोविड-19 मध्ये आपले जे आप्तेष्ट गेले त्यांना शेवटचा संस्कार करण्यापूर्वी साधे पाहताही आले नाही. जे बाधित गेले त्यांना या आजाराने जिवंत असतांना भेटूही दिले नाही. ज्या व्यक्तींचे या आजाराने श्वास कोंडल्या गेले त्यांचे शेवटचे कार्यही आप्तेष्टांना करता आले नाही. या आजाराने आप्तेष्टांना गळा भेट घेऊन कडकडून भेटताही आले नाही. दुसऱ्या बाजुला ज्या झाडांपासून आपण ऑक्सिजन घेतो त्या झाडांना कडकडून मिठी मारायची झाली तर कोणत्याच झाडाने पॉझिटिव्ह असले तरी नाकारले नाही. प्रत्येक झाडाने ते अबोल जरी असले तरी या आव्हानातून सावरण्याचा विश्वास दिला. नुकतेच निधन पावलेले चिपको आंदोलनाचे प्रणेते सुंदरलाल बहुगुणा यांना स्मरुन लोकसहभागातून वृक्ष लागवडीच्या या चळवळीत आपण प्रत्येकजण कटिबद्ध होऊ यात. झाडाला साक्षी ठेवून यावर्षी किमान 3 तरी झाडे लावून ती जगवू यात. ज्या प्रमाणात आपण निसर्गाकडून घेत आहोत त्या प्रमाणात त्याला वापस करण्याचा हा काळ सगळ्यांना खूप काही शिकवूण जाणारा आहे.

 

-         विनोद रापतवार, जिल्हा माहिती अधिकारी नांदेड.

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...